‘क्रॅशिंग’ व्हायरल पोस्ट

इरावती बारसोडे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

ट्रेंडिंग

जेनिफर ॲनिस्टन ही हॉलिवूडमधील एक अतिशय नावाजलेली अभिनेत्री. दिसायलाही सुंदर आणि अभिनयातही उत्तम. भारतासह जगभरात तिचे लाखो-करोडो फॅन्स आहेत. तिच्यासारखे सेलिब्रिटी नेहमीच चर्चेत असतात. गेल्या महिन्यात जेनिफर पुन्हा चर्चेत आली. कारण? तिच्या एका पोस्टमुळं सोशल मीडियावर वादळ उठलं होतं. इतकं की इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तिच्यामुळं काही काळ क्रॅश झालं. तिनं काही आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त वगैरे पोस्ट केलेलं नव्हतं. इतरांप्रमाणं तिनंही फक्त तिच्या मित्रांबरोबर काढलेला एक फोटो पोस्ट केला. हा फोटोच इन्स्टाग्राम क्रॅश होण्यास कारणीभूत ठरला. 

जेनिफरनं १५ ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर ‘पदार्पण’ केलं. तिनं तिच्या ‘फ्रेंड्स’ या प्रसिद्ध मालिकेतील सहकलाकार लिसा कुड्रो, कोर्टनी कॉक्स, डेव्हिड श्‍विमर, मॅट लब्लांक, मॅथ्यू पेरी यांच्यासह काढलेला एक सेल्फी पोस्ट केला आणि लिहिलं, ''And now we''re Instagram FRIENDS too. HI INSTAGRAM.'' ही पोस्ट पाहण्यासाठी आणि जेनिफरला इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यासाठी फॅन्स तिच्या इन्स्टा अकाउंटवर अक्षरशः तुटून पडले. एकाच वेळी अनेकांनी तिच्या अकाउंटवर उडी मारल्यामुळं ते क्रॅश झालं. त्यामुळं लोकांना तिला फॉलोही करता येईना आणि पोस्टही लाइक करता येईना. अकाउंट पुन्हा सुरू झालं, तेव्हा काही तासांतच तिचे फॉलोअर्स लाखांच्या पटीत वाढले. फक्त पाच तास १६ मिनिटांमध्ये १० लाख फॉलोअर्स मिळवण्याचा विक्रमच तिनं केला. या विक्रमाची गिनिज बुकमध्येही अधिकृत नोंद झाली. याआधी हा विक्रम ब्रिटिश राजघराण्यातील ड्युक ऑफ सुसेक्स प्रिन्स हॅरी आणि डचेस मेगन मार्कल यांच्या नावे होता. एप्रिलमध्ये त्यांच्या @sussexroyal या इन्स्टा अकाउंटला पाच तास ४५ मिनिटांमध्ये १० लाखजणांनी फॉलो केलं होतं. 

जेनिफरची पहिलीच पोस्ट व्हायरल होण्यामागचं कारणं म्हणजे ती एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री तर आहेच; पण आणखीही एक कारण आहे. ते म्हणजे, तिनं पोस्ट केलेला फोटो आणि अतिशय समर्पक कॅप्शन. ‘नाऊ वी आर इन्स्टाग्राम फ्रेंड्स टू,’ या वाक्याचा खरा अर्थ त्यांनाच कळेल, ज्यांना ‘FRIENDS’ ही मालिका माहिती आहे. जेनिफर आणि तिच्या सेल्फीमध्ये दिसणारे इतर पाच कलाकार यांना लोक ‘फ्रेंड्स’मधील रिचल ग्रीन (जेनिफर), फिबी बुफे (लिसा कुड्रो), मोनिका गेलर (कोर्टनी कॉक्स), रॉस गेलर (डेव्हिड श्‍विमर), चॅण्डलर बिंग (मॅथ्यू पेरी) आणि जोई ट्रिबियानी (मॅट लब्लांक) म्हणून ओळखतात. ‘फ्रेंड्स’ ही विनोदी मालिका १९९४-२००४ या काळात १० सीझन्समधून प्रसारित झाली होती. अमेरिकेतल्या मॅनहॅटनमध्ये राहणाऱ्या सहा मित्रांची ही गोष्ट होती. त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार, सुख-दुःख, हास्यविनोदांनी १० वर्षं प्रेक्षकांना गुंतवून ठेवलं. या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला, त्याला या सप्टेंबरमध्ये २५ वर्षं पूर्ण झाली. ही मालिका संपूनही आज १० वर्षांहून अधिक काळ उलटला, पण आजही हे सहा मित्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत; फक्त अमेरिकेतच नाही, तर भारत आणि इतर देशांमध्येही! नंतरच्या पिढ्यांनाही हे सहा ‘फ्रेंड्स’ आपलेसे वाटले. अजूनही ही मालिका तेवढीच लोकप्रिय आहे आणि तिला प्रेक्षकवर्गही आहे. त्यामुळंच कदाचित जेनिफरनं पोस्ट केलेला फोटो बघून फॅनमंडळी आठवणींमध्ये हरवून गेली असावीत. हा फोटो आत्तापर्यंत एक कोटी ३५ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे, तर जवळपास पाच लाख लोकांनी या फोटोवर कॉमेंट्स केल्या आहेत. 

जेनिफरच्या फोटोनं सोशल मीडियावर तर हैदोस घातलाच, पण प्रसारमाध्यमांनीही याची दखल घेतली. जेनिफर ॲनिस्टननं इन्स्टाग्राम ठप्प केलं, अशा बातम्याही येऊ लागल्या. पहिल्या फोटोला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर दोनच दिवसांनी जेनिफरनं एक छोटासा विनोदी व्हिडिओ पोस्ट केला आणि खाली लिहिलं, ‘मला खरंच (इन्स्टाग्राम) बंद पाडायचं नव्हतं. या ‘ग्लिची’ वेलकमसाठी धन्यवाद.’ हा व्हिडिओ आत्तापर्यंत दीड कोटीहून अधिक लोकांनी बघितला आहे. जेनिफरनं पाच दिवसात एक कोटी ४० लाखाहून अधिक फॉलोअर्स मिळवण्यात यश मिळवलं आहे.

सोशल मीडियाचा प्रभावच असा आहे, की कोण, कधी, काय, कुठल्या कारणामुळं व्हायरल होईल सांगता येणं कठीण... 

संबंधित बातम्या