टाटांचा २७ वर्षांचा असिस्टंट

इरावती बारसोडे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

ट्रेंडिंग
 

टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी नवीन असिस्टंट नेमला आहे. यात काय विशेष? एवढ्या मोठ्या लोकांचे असिस्टंट्स असतातच की. तर यात विशेष हे, की हा असिस्टंट फक्त २७ वर्षांचा आहे आणि स्वतः रतन टाटांनी त्याला जॉब ऑफर दिली. शंतनू नायडू असं याचं नाव. मुंबईचाच राहणारा. हा टाटांचा असिस्टंट कसा झाला याची गोष्ट ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आली. या पोस्टला २४ हजारांहून अधिक लाईक्स, एक हजारहून अधिक कॉमेंट्स आल्या आहेत, तर अडीच हजारांहून जास्त वेळा पोस्ट शेअर करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला शंतनू मीडियाचंही आकर्षण ठरला.  

शंतनूचा टाटांच्या असिस्टंट पदापर्यंतचा प्रवास घडला तो असा-
शंतनूनं २०१४ मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर टाटा ग्रुपमध्ये नोकरी करू लागला. त्याच्या भाषेत सांगायचं, तर त्याचं आयुष्य खूप सुरळीत चाललं होतं. पण एका संध्याकाळी ऑफिसमधून घरी जात असताना त्याला रस्त्याच्या मधोमध एका कुत्र्याचा मृतदेह दिसला. त्याला कुत्र्यांविषयी विशेष जिव्हाळा आहे आणि त्यानं काही कुत्र्यांना वाचवलंसुद्धा आहे. त्यामुळं त्या कुत्र्याला त्या अवस्थेत बघून त्याला खूपच वाईट वाटलं. कुत्र्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला आणावा असा विचार करत तो तिथंच उभा असताना आणखी एक चारचाकी कुत्र्याच्या अंगावरून गेली. हे दृश्‍य बघून त्याचा जीव वरखाली झाला. त्यानं ठरवून टाकलं, आपण काहीतरी करायला हवं. त्यानं त्याच्या काही मित्रांना गोळा केलं. त्यांनी रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी रिफ्लेक्टर्स असलेले गळपट्टे तयार केले, जेणेकरून वाहनचालकांना भटकी कुत्री लांबूनही दिसतील आणि कुत्र्यांच्या अंगावरून वाहन जाणार नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी आसपासच्या कुत्र्यांच्या गळ्यामध्ये हे पट्टे बांधले. त्यावेळी या पट्ट्यांचा उपयोग होईल की नाही हे त्यांना माहीत नव्हतं, फक्त आशा होती. दुसऱ्याच दिवशी शंतनूला एक मेसेज मिळाला की, त्या पट्ट्यामुळं एका कुत्र्याचा जीव वाचला होता... शंतनू म्हणतो, ‘त्यावेळी मला खूपच भारी वाटलं!’ 

लवकरच ही बातमी सगळीकडं पसरली. टाटा ग्रुप ऑफ कंपनीजच्या न्यूजलेटरमध्येही ही बातमी झळकली. लोकांना शंतनू आणि त्याच्या मित्रांनी तयार केलेले कुत्र्यांचे पट्टे खरेदी करायचे होते, पण त्यांच्याकडं ते तयार करण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा शंतनूच्या वडिलांनी सुचवलं, की त्यानं रतन टाटांना पत्र लिहावं, कारण त्यांनाही कुत्री आवडतात. सुरुवातीला शंतनूनं संकोच केला, पण मग नंतर विचार केला की काय हरकत आहे. मग त्यानं टाटांना स्वतःच्या हातानं पत्र लिहिलं. नंतर तो स्वतःच्या कामात व्यग्र झाला आणि या पत्राबद्दल विसरूनही गेला. तेव्हा त्याला याची कल्पनाही नव्हती, की दोन महिन्यांनंतर त्याचं आयुष्यच बदलणार आहे. दोन महिन्यांनी त्याला स्वतः रतन टाटा यांच्या स्वाक्षरीचं पत्र आलं. त्यामध्ये लिहिलं होतं, की त्यांना शंतनू आणि त्याच्या मित्रांचं काम खूप आवडलं आणि त्यांना मला भेटायचं होतं... यावर विश्‍वास ठेवायला शंतनूला थोडं कठीणच गेलं. 

काही दिवसांनंतर तो त्यांना त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये भेटला. ते शंतनूला म्हणाले, ‘मला तुझं काम खूपच मनापासून भावलं आहे.’ शंतनू सांगतो, ‘मी या भेटीचा जेव्हा जेव्हा विचार करतो, तेव्हा माझ्या अंगावर अजूनही काटा येतो. या भेटीनंतर त्यांनी मला त्यांची कुत्री दाखवण्यासाठी नेलं.. आणि हीच आमच्या मैत्रीची सुरुवात होती.’ रतन टाटांनी शंतनूच्या पट्ट्यांच्या ‘मोटोपॉज’ उपक्रमाला निधीही पुरवला. 

या घटनेनंतर शंतनू लगेच काही असिस्टंट झाला नाही. त्याला अजून त्याचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. तो लवकरच पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात गेला. पण, जाताना त्यानं टाटांना वचन दिलं, की परत आल्यानंतर मी टाटा ट्रस्टसाठी काम करेन... आणि टाटांनीही त्याची विनंती आनंदानं मान्य केली. 

शंतनू भारतात आल्यानंतर लगेचच टाटांचा फोन आला. ते म्हणाले, ‘माझ्या ऑफिसमध्ये बरंच काम करायचं आहे. तुला माझा असिस्टंट व्हायला आवडेल का?’ त्या क्षणी शंतनूला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळालं नाही. ‘मी एक दीर्घ श्‍वास घेतला आणि काही सेकंदात हो म्हणालो,’ असं तो सांगतो. 

गेले दीड वर्ष तो टाटांसाठी काम करतो आहे. अजूनही तो कधीकधी स्वतःला चिमटा काढून बघतो, हे स्वप्न तर नाही ना? शंतनू त्याच्या बॉसचं वर्णन खूप प्रेमानं करतो, ‘माझ्या वयाच्या अनेकांना चांगले मित्र, चांगला गुरू आणि चांगला बॉस मिळणं खूप कठीण असतं. माझा स्वतःच्या नशिबावर विश्‍वासच बसत नाही, की मला या तिन्ही व्यक्ती रतन टाटा नावाच्या सुपर ह्युमनमध्ये मिळाल्या. लोक त्यांना प्रेमानं बॉस म्हणतात, पण मी त्यांना ‘मिलेनियल डम्बलडोर’ म्हणतो... माझ्या मते हे नाव त्यांना शोभून दिसतं.’

संबंधित बातम्या