कोरोना ऑन सोशल मीडिया

इरावती बारसोडे
सोमवार, 13 एप्रिल 2020

ट्रेंडिंग
 

सध्या जगात कोरोना सोडून दुसरा विषयच नाही. हा विषाणू ज्या पद्धतीने आणि वेगाने पसरला किंवा पसरतो आहे, ते पाहता असे होणे साहजिकच आहे म्हणा! संपूर्ण जग सध्या लॉकडाऊनमध्ये असल्यामुळे सोशल मीडियावरही कोरोना पसरला आहे.

लॉकडाऊनमुळे सगळेच घरी अडकले आहेत. अशा वेळी नेटिझन्सची क्रिएटिव्हिटी मात्र लॉकडाऊन झालेली नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना आल्यामुळे ‘२०२० रिसेट करता येईल का, त्यामध्ये व्हायरस आहे...’ अशी अनेकांची भावना होती. तर, ‘पॉझिटिव्ह हा आत्ताचा सगळ्यात निगेटिव्ह शब्द आहे,’ या वाक्यावर कोणाचेही दुमत नसावे. तसेच ‘इतके दिवस दमून दमून झोपायचो... अन् आता झोपून झोपून दमतोय,’ अशीही अनेकांची अवस्था झाली असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेली ही काही वाक्ये...!

जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडायचे म्हणजे युद्धाला जाण्याची तयारी करावी लागते, अशा अर्थाचे मीमही व्हायरल झाले होते. तर सारख्या सारख्या बातम्या बघून भीतीनेही तुम्ही मराल किंवा घरातच पूर्ण पॅक होऊन बसायची वेळ येते, अशीही मीम्स व्हायरल झाली होती. तसेच फिरायचेच असेल तर गुगल मॅपवर फिरा, असा सल्लाही अनेकांनी अनेकांना दिला. तसेच मेमध्ये खायचा असेल आंबा, तर आत्ता घरीच थांबा असा सल्लाही व्हॉट्सॲपवर मिळत होता.  

रस्ते मोकळे असल्यामुळे वन्यप्राणी यथेच्छ फिरत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत, भारतातही आणि परदेशातही. तो धागा पडून अनेक मीम्स तयार झाले, ज्यामध्ये आधी माणूस बंदिस्त प्राण्यांना बाहेरून बघत होता आणि आता प्राणी बाहेरून बंदिस्त मानवाला बघताना दिसतात.

माणूस नको तेवढा रिकामा असला, की त्याला नको ते विचार आणि उद्योगही सुचतात. उदा. पत्त्यांमध्ये बदाम राजाला मिशी नाही याचा अनेकांना नव्याने शोध लागला. फरसाण आणि चिवड्यामधले सगळे पदार्थ वेगळे करणे हाही असाच एक रिकामटेकडा उद्योग... आणि हे व्हॉट्सॲपवर व्हायरल करणे हा आणखी एक रिकामटेकडा उद्योग! सध्या कामाच्या बायका येत नाहीत. त्यामुळे किती भांडी घासावी लागतील यावर स्वयंपाक काय करायचा हे तुम्ही ठरवत असाल, तर तो लॉकडाऊन इम्पॅक्ट असल्याचे मीम अनेक गृहिणींनी एकमेकींना पाठवले असणार हे नक्की.

मीम्स फ्रॉम होम...
फक्त भारतातच नाही, तर सगळे जगच सध्या वर्क फ्रॉम होम करत आहे. घरून काम करण्यामध्ये अडचणीही अनेक येतात, कधी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते, कधी मुले आणि पाळीव प्राणी त्रास देतात आणि मुख्य म्हणजे आळसही येतो. वर्क फ्रॉम होमवर अनेक मीम्स व्हायरल झाले... मीम्स तयार करणाऱ्यांनी नक्कीच घरी बसूनच केले असणार.

घरी मी व्यवस्थित आवरून काम करतो असे बॉसला वाटते, मी काम करतो पण आरामात पाय पसरून असे मला वाटते, माझ्या सहकाऱ्यांना वाटते मी नेटफ्लिक्स बघतो, पण प्रत्यक्षात मात्र मी झोपा काढतो... अनेकांनी मीमच्या माध्यमातून खरी परिस्थिती कबूल केली. एक्सपेक्टेशन आणि रिअॅलिटी हाही नेटिझन्सचा मीम्समधला एक आवडता प्रकार आहे. मला वाटले होते मी घरून ऑफिसचे काम करेन पण प्रत्यक्षात मात्र मी स्वयंपाकघरात काम करतो आहे, हे मीम त्यातलाच एक प्रकार.

मुंबईचे लोक लोकलने प्रवास करतात, पण सध्या घरी असल्यामुळे लोकलची त्यांना आठवण आली तर ते काय करत असतील... घरातलाच एखादा आडवा रॉड पकडून लोकलमध्ये उभे राहण्याची हौस भागवत असतील.. अशा अर्थाचे मीमही व्हायरल झाले होते. मुंबईकरांना हे मीम फारच भावले असणार.

एरवी फक्त १५ मिनिटे लागणाऱ्या कामाला घरून काम करताना जेव्हा तासाभरापेक्षा जास्त वेळ लागतो, तेव्हा बॉस म्हणत असणार, ‘दया, कुछ तो गडबड है...’ सीआयडीमधल्या एसीपी प्रद्युम्नचा हा फेमस डायलॉग या निमित्ताने पुन्हा मीममध्ये पाहायला मिळाला.

‘र’ला ‘र’ अन ‘ट’ला ‘ट’....
फेसबुकवर सध्या रोज नवीन चॅलेंजेसना पेव फुटते आहे. साडी चॅलेंज काय, कपल चॅलेंज काय.. एक ना अनेक. काही दिवसांपूर्वी आणखी एक क्रिएटिव्ह ट्रेंड फेसबुकवर पाहायला मिळाला. या ट्रेंडमुळे अनेकांच्या मनातील कवी जागा झाला... या ट्रेंडने फेसबुकवर धमाल उडवून दिली.
मित्रच मित्रांची जाहीर ‘इज्जत’ काढू लागतात (अर्थात खेळीमेळीच्या वातावरणात) तेव्हा आणखी मजा येते. काय होता हा ट्रेंड? तर अनेकांचे फेसबुकवर कैक वर्षांपूर्वी पोस्ट केलेले जुने फोटो अचानक पुन्हा दिसू लागले. त्याला कारण या व्यक्तींचे मित्रच होते.

हाच तर ट्रेंड होता... मित्राचा/मैत्रिणीचा कुठलातरी अतिशय जुना फोटो (साधारण दहा वर्षांपूर्वीचा वगैरे, ज्यामध्ये तो किंवा ती शक्यतो बावळट दिसत असेल; बावळट दिसणारा नसला तरी चालेल) बाहेर काढायचा आणि त्यावर आमचा मित्र कसा ‘हिरो’ अशा अर्थाची कॉमेंट करायची. कॉमेंट म्हणजे दोन ओळींची उगाचच ‘र’ला ‘र’ आणि ‘ट’ला ‘ट’ जोडून कविता करायची. त्याला काही अर्थ असलाच पाहिजे असे नाही, बहुतांश वेळा नसतोच.. हा खास मराठीमंडळींचा ट्रेंड आहे बर का! ही खालची काही उदाहरणे पाहाच-
काही दिवसांपूर्वी कनिका कपूर चांगलीच चर्चेत आली होती. ती आता कोरोनामुक्त होऊन घरीही गेली आहे, पण नेटिझन्सनी पुन्हा तिची आठवण काढलीच..

हिरवं गार जंगल, झुळझुळ वाहतो झरा
दादाचा नुसता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा

लोकांनी डोनाल्ड ट्रम्प, मार्क झुकेनबर्ग यांसारख्या लोकांनाही सोडले नाही...
पगार नाही मिळाला 
म्हणून कामगारांनी केला संप
    आणि आमच्या ताईच्या प्रेमात 
    पडला चक्क डोनाल्ड ट्रम्प

चॉकलेटमध्येपण व्हरायटी असते डार्क
    भाऊला बघून पोरी म्हणतात 
    हाच माझा मार्क

ज्या कोरोनामुळे हे उद्योग सुरू झाले, त्याला लोक कसे सोडतील...
चायनाला वटवाघूळ खायची 
आली लहर
अख्ख्या जगात करून ठेवला कहर
काही पण म्हणा 
आमच्या भावाचा लुक लई जहर...

आता यातल्या अनेक कविता (यांना कविता म्हणायचे का वादग्रस्त मुद्दा असू शकेल) स्वरचित असतील आणि काही कॉपी पेस्ट केलेल्या असतीलही, पण यांचे मूळ कुठे हा संशोधनाचा विषय ठरेल.

दूरदर्शन हाच खरा बॉस
लॉकडाऊन सुरू झाले आणि दूरदर्शनवर आधी रामायण, महाभारत परत आले, मग ब्योमकेश बक्षी, देख भाई देख, चाणक्य, सर्कस आणि शक्तिमानही परतले. रामायण, महाभारत तर सगळ्यांचे फेव्हरेट, पण शक्तिमानमुळे नव्वदीत जन्मलेली पिढी नॉस्टॅलजिक होऊन दूरदर्शनकडे वळाली. लोकांनी या सिरियल्स बघतानाचे फोटो व्हॉट्सॲपला स्टेटस म्हणून ठेवले. या सगळ्यातून कधी नव्हे तो दूरदर्शनचा भाव वाढला.... आणि तयार झाले भन्नाट मीम्स.

सध्या नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार यांसारख्या ॲप्सची बरीच चलती आहे. दूरदर्शन सुरू झाल्यामुळे यांची कशी जिरली या अर्थाचे अनेक मीम्स व्हायरल झाले होते. दंगल चित्रपटामध्ये अमीर खानचा एक डायलॉग आहे, ‘दिल छोटा मत कर। नॅशनल लेव्हल चँपियन से हारा है तू।’ याचा वापर करून नेटफ्लिक्स दूरदर्शनकडून हरले आहे, असे मीम व्हायरल झाले होते. तर, दुसऱ्या एका मीममध्ये नेटफ्लिक्स दूरदर्शनला म्हणते आहे, ‘दुकान जमा रहा था, आप लोग आके बेरोजगार कर दिए।’

पूर्वी दूरदर्शनवर सिरियल सुरू होण्यापूर्वी मुंग्या दिसायच्या. तशा मुंग्या पुन्हा सुरू करा, ९० च्या दशकातली फिलींग येत नाही, अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे दूरदर्शनच म्हणते आहे, ‘इतने प्यार की आदत नही मुझे।’ दूरदर्शनवर पुन्हा जुन्या मालिका सुरू झाल्याचे इतर चॅनल्सना दुःख झालेच, पण त्याहीपेक्षा जास्त दुःख प्राईम आणि नेटफ्लिक्सला झाले, अशा आशयाचे मीमही व्हायरल झाले होते.

रामायण, महाभारतामधल्या काही एपिसोड्सवरही मीम्स व्हायरल झाले होते. भारतीयांच्या मते मंथरा हीच एकमेव खरीखुरी व्हिलन आणि ‘गँगस्टा’ आहे. ललिता पवार यांनी मंथरेची भूमिका केली होती. त्यांचा फोटो असलेले अनेक मीम्स व्हायरल झाले होते. 

संबंधित बातम्या