एका व्हिडिओसाठी काय पण...

इरावती बारसोडे
शुक्रवार, 29 मे 2020

ट्रेंडिंग
 

अमेरिकेतील एका टिकटॉक प्रँकस्टरने टिकटॉक व्हिडिओपायी तेथील मेट्रो ऑथोरिटी, स्वच्छता कर्मचारी आणि नागरिकांचाही रोष ओढावून घेतला आहे. कारण व्हिडिओ करण्याच्या नादात त्याने केलेले उद्योग नंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांना निस्तरावे लागले आहेत. 

जॉश पॉपकिन असे या टिकटॉक युजरचे नाव आहे. त्याचे टिकटॉकवर ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तो प्रँकस्टर म्हणून ओळखला जातो. प्रँकस्टर म्हणजे जाणूनबुजून खोड्या काढणारा मनुष्य. 

पॉपकिनने टिकटॉक व्हिडिओ तयार करताना न्यूयॉर्कच्या सबवे कारमध्ये सेरल आणि दूध सांडून राडा केला आणि तो तसाच सोडून निघून गेला. त्याला वाटले लोक यावर मनसोक्त हसतील, पण झाले उलटेच. पॉपकिनच्या या व्हिडिओमध्ये त्याच्या हातातून एक सेरल आणि दूध असलेला मोठा प्लॅस्टिकचा डबा जमिनीवर पडतो, असे दिसते. हा डबा चुकून पडला असे तो दाखवतो. आजूबाजूचे प्रवासी आपल्या अंगावर हे सांडू नये म्हणून बाजूला होण्याचा प्रयत्न करतात. नंतर पॉपकिन हाताने खाली सांडलेले सेरल उचलायचा प्रयत्न करतो. व्हिडिओ संपतो, तेव्हा पॉपकिन ट्रेनमधून खाली उतरतो, पण डब्यामध्ये दुधाचे थारोळे तसेच राहिलेले दिसते. 

या व्हिडिओवर तारीख नसल्यामुळे तो नेमका कधी काढला असावा, हे सांगणे कठीण आहे. पण, इतर प्रवाशांनी मास्क घातलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की कोरोना काळातीलच आहे. टिकटॉकवर हा व्हिडिओ किमान ३० लाखांहून अधिक वेळा बघितला गेला आहे. पण नंतर टीका होऊ लागल्यावर तो पॉपकिनच्या अकाउंटवरून दिसेनासा झाला. मेट्रोपॉलिटन ट्रान्झिट ऑथोरिटी (एमटीए) पॉपकिनवर नाराज असून त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याला तब्बल ६० लाख ७० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ज्या सोशल मीडियाने पॉपकिनला आत्तापर्यंत पाठिंबा दिला, तोच सोशल मीडिया आता त्याच्यावर निगेटिव्ह कॉमेंट्स करू लागला आहे. पॉपकिनला शिक्षा म्हणून ट्रेन स्वच्छ करायला लावा, इथपासून त्याला अटक करा, इथपर्यंत मागण्या होऊ लागल्या आहेत. 

एमटीएने ट्विट करून सांगितले, की या स्टंटमुळे मेट्रोच्या डब्यात सगळीकडे दूध आणि सेरल सांडले, जे नंतर आम्हाला स्वच्छ करावे लागले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छता ठेवण्यासाठी न्यूयॉर्कमधली सबवे सिस्टिम रात्री चार तासांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. सबवेच्या ११५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री नियोजनपूर्वक मेट्रो बंद ठेवण्यात आली आहे. अशा वेळी एका टिकटॉक युजरच्या निष्काळजी स्टंटची घटना घडल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची चिडचिड झाली, तर त्यांचा तरी काय दोष.

एमटीएने ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘जागतिक महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचा प्रँक करणे, ही अतिशय खालची पातळी आहे. आणि तुम्ही केलेला नस्ता उद्योग या कर्मचाऱ्यांना निस्तरायला लागावा, हे तिरस्करणीय आहे.’

आता सगळा प्रकार व्हायरल झाल्यानंतर पॉपकिनने त्याच्या टिकटॉक, इन्स्टाग्राम आणि यूट्युब अकाउंट्सवरून जाहीर माफी मागितली असून मी मुर्ख आहे, असे स्वतःच कबुल केले आहे. ‘माझ्यामुळे ज्यांना ज्यांना त्रास झाला, त्या सर्वांची मी माफी मागतो. मला असे वाटले होते, की असे काही तरी केले तर या परिस्थितीमध्ये लोकांना जरा हसायला येईल. पण माझा विचार अतिशय चुकला. अशा पद्धतीचा प्रँक केलेला चालेल हा विचारच मुर्खपणाचा होता,’ अशा काहीशा शब्दांत पॉपकिनने एमटीए आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. त्याने यूट्युबवर पोस्ट केलेला माफीनामा जवळपास पाच मिनिटांचा आहे. माफी मागितल्यानंतर पॉपकिनने त्याच्या या व्हिडिओवर चिडलेल्या लोकांनी केलेल्या ५० कॉमेंट्स वाचून दाखवल्या आहेत. त्यामुळे पॉपकिनने मनापासून माफी मागितली आहे की उगाच तोंडदेखली माफी आहे, असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. 

त्याच्या माफीनाम्यानंतर एमटीएनेसुद्धा ट्विट केले आहे, ज्यामध्ये ते म्हणतात, ‘पॉपकिन यांनी मागितलेली माफी आम्हाला मिळालेली आहे. एमटीए पोलिसांनी ही घटना डिटेक्टिव्ह स्क्वाडला सांगितलेली आहे.’ ‘टिकटॉकने या युजरला बॅन करावे आणि ट्रेन, बसेसमध्ये अशा पद्धतीचे निष्काळजी स्टंट्स करण्यावर बंदी आणावी,’ अशी मागणीही केली आहे. 

सोशल मीडियावर ‘इन्फ्लुअन्सर’ होण्यासाठी, फेमस होण्यासाठी लोक काय काय करू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. सोशल मीडियावर जेवढे कौतुक करणारे असतात, त्याहून जास्त टीका करणारे असतात. सद्यःस्थितीमध्ये सगळ्यांनाच हलक्याफुलक्या ‘लाफ्टर डोस’ची गरज आहेच. म्हणूनच स्वतः हसा, दुसऱ्यांनाही हसवा, पण समाजभानही जपा! 

संबंधित बातम्या