रोलिंग आणि ट्रान्स कम्युनिटी

इरावती बारसोडे
बुधवार, 24 जून 2020

ट्रेंडिंग

जगप्रसिद्ध ‘हॅरी पॉटर’ पुस्तक मालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग सध्या जागतिक पातळीवर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. रोलिंग यांनी एका लेखासंदर्भात ट्विटरवर वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे त्यांनी एलजीबीटीक्यू कम्युनिटीचा रोष ओढवून घेतला असून त्यांच्या नावावर ‘ट्रान्सफोब’ आणि ‘अँटी-ट्रान्सजेंडर’ असे शिक्के बसले आहेत. तसेच त्यांना TERF (Trans-Exclusionary Radical Feminist) असेही म्हणण्यात येत आहे.

 ‘ओपिनियन : क्रिएटिंग ए मोअर इक्वल पोस्ट कोविड-१९ वर्ल्ड फॉर पीपल हू मेन्सट्रुएट,’ असे या लेखाचे नाव आहे. Devex.com या ऑनलाइन मीडिया प्लॅटफॉर्मवर हा लेख प्रसिद्ध झाला होता. लॉकडाउन कालावधीमध्येदेखील मासिक पाळीमध्ये लागणारी साधने आणि एकंदरीत स्वच्छतेची असलेली गरज, यावर या लेखामध्ये भाष्य करण्यात आले आहे. मारनी सोमर, व्हर्जिनिया कामोवा आणि थेरीस माहोन यांनी हा लेख लिहिला असून त्यांनी म्हटले आहे, ‘An estimated 1.8 billion girls, women, and gender non-binary persons menstruate, and this has not stopped because of the pandemic. They still require menstrual materials, safe access to toilets, soap, water, and private spaces.’ 

या लेखावर प्रतिक्रिया देताना रोलिंग यांनी, ‘People who menstruate.’ I’m sure there used to be a word for those people. Someone help me out. Wumben? Wimpund? Woomud?’ या शब्दांत ट्विट केले होते. या ट्विटनंतर रोलिंग यांनी आणखी काही ट्विट्स केले आणि हा मुद्दा आणखी चिघळला. रोलिंगचे ट्विटरवर एक कोटी ४५ लाख फॉलोअर्स आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘हॅरी पॉटर’ची पुस्तके वाचून एक पिढी मोठी झाली आहे. त्यांच्यासारख्या जबरदस्त फॅन फॉलोइंग असणाऱ्या व्यक्तीने असे बेजबाबदार विधान करणे कोणालाच पटलेले नाही. 

त्यांच्या या ट्विटवर ‘हॅरी पॉटर’ चित्रपट मालिकेतील स्टार कलाकारांसह अनेकांनी टीका केली आहे. हॅरी पॉटरची भूमिका साकारणारा डॅनियल रॅडक्लिफ यानेही रोलिंगवर टीका केली आहे. 'द ट्रेव्हर प्रोजेक्ट' या एलजीबीटीक्यू युथ सपोर्ट ग्रुपच्या ब्लॉग पोस्टसाठी लिहिताना त्याने म्हटले आहे, ‘ट्रान्सजेंडर महिला या महिला असतात. त्याविरुद्ध केलेले कोणतेही वक्तव्य ट्रान्सजेंडर लोकांची ओळख आणि प्रतिष्ठा नाहिशी करते.’ ‘याबाबत जो (रोलिंग) आणि माझ्यापेक्षा तज्ज्ञ असणाऱ्या प्रोफेशनल्सनी दिलेल्या सल्ल्यांच्या विरोधात जाणारे हे भाष्य आहे,’ असेही तो म्हणाला आहे. हर्मायनी ग्रिंजरची भूमिका केलेल्या एमा वॉटसनने ट्विट केले, ‘सातत्याने प्रश्नांचा भडिमार आणि टीकेला सामोरे न जाता जगण्याचा अधिकार ट्रान्सजेंडर्सना आहे.’ ‘मी ट्रान्स कम्युनिटीबरोबर उभा आहे. सगळ्यांनाच प्रेमाने आणि जजमेंटशिवाय जगण्याचा अधिकार आहे,’ असे मत रॉन विजली अर्थात रूपर्ट ग्रिंटने व्यक्त केले. रोलिंगच्या विझर्डिंग वर्ल्डमधल्या ‘फॅन्टॅस्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाइंड देम’मधील न्यूट स्कमँडरची भूमिका करणाऱ्या एडी रेडमनने म्हटले आहे, ‘ट्रान्सजेंडर्सचा लोकांचा मान ठेवणे ही सांस्कृतिक अनिवार्यता आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी स्वतःला याबाबत शिकवण देत आहे. मी जे. के. रोलिंग आणि ट्रान्स कम्युनिटी अशा दोघांबरोबरही काम केले असून मला माझा दृष्टिकोन स्पष्ट करावासा वाटतो. मी जोच्या कॉमेंट्सशी सहमत नाही. ट्रान्स महिला या महिला आहेत, ट्रान्स पुरुष हे पुरुष आहेत आणि नॉन-बायनरी ओळख ही वैध आहे.’ 

चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर रोलिंग यांनी तीन हजारांहून अधिक शब्दांचा एक मोठा निबंध लिहून स्वतःची भूमिका स्पष्ट केली. मी स्वतः कौटुंबिक हिंसाचाराची बळी आहे; हे सांगण्याचे कारण सहानुभूती गोळा करणे नसून त्या ट्विटसंदर्भात भूमिका स्पष्ट करणे हे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ‘माझ्या मते, अनेक ट्रान्स-आयडेंटिफाइड लोकांपासून इतरांना धोका नसून त्यांना स्वतःलाच अनेक कारणांमुळे धोका आहे. ट्रान्स लोकांना संरक्षणाची गरजही आहे आणि हा त्यांचा अधिकारही आहे. महिलांप्रमाणेच त्यांनाही लैंगिक साथीदाराकडून अधिक धोका आहे. इतर कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्यांपैकी मी एक असून मला माहीत आहे; पुरुषांकडून हिंसाचार सहन केलेल्या ट्रान्स महिलांविषयी माझ्या मनात सहानुभूती आणि ऐक्यभावच आहे. म्हणून ट्रान्स महिला सुरक्षित राहाव्यात अशी माझी इच्छा आहे. त्याचवेळी जन्मजात मुली आणि महिला असलेल्या कमी सुरक्षित असाव्यात असे मला वाटत नाही,’ अशा शब्दांत रोलिंग यांनी भूमिका मांडली आहे.  

संबंधित बातम्या