शेफ खन्ना व व्हायरल बिस्कीट

इरावती बारसोडे
सोमवार, 6 जुलै 2020

ट्रेंडिंग

शेफ खन्नाचे सणसणीत उत्तर

विकास खन्ना या शेफचे सध्या ट्विटरवर कौतुक होत आहे. त्याने केलेल्या एखाद्या पाककृतीसाठी नाही, तर त्याने एका परदेशी वृत्तवाहिनीच्या निवेदकाला दिलेल्या उत्तराबद्दल. मिशेलिन स्टार शेफ असलेल्या विकास खन्ना यांनी लॉकडाउन कालावधीमध्ये वेगवगळ्या वृद्धाश्रम, अनाथाश्रमांमध्ये धान्य वाटले होते. या उपक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी बीबीसी वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये प्रश्‍न विचारताना निवेदकाने गृहित धरले, की खन्ना हे श्रीमंत कुटुंबातील नाहीत आणि भारतामध्ये वाढले आहेत, त्यामुळे त्यांना भूक म्हणजे काय हे माहीतच आहे. ‘तुम्ही प्रसिद्ध आहात... तुम्ही ओबामा कुटुंबासाठी स्वयंपाक केला आहे. गॉर्डन रॅमसे (प्रसिद्ध शेफ) यांच्याबरोबर टीव्ही शोमध्ये होतात. पण नेहमीच अशी परिस्थिती नव्हती, बरोबर? तुमचे कुटुंब श्रीमंत नव्हते. त्यामुळे मी म्हणेन, की भारतामध्ये पोट भरण्याबाबत किती अनिश्‍चितता आहे याची जाणीव तुम्हाला आहे.’

या प्रश्‍नाला खन्ना यांनी जे उत्तर दिले, ते ट्विटर युजर्सनी उचलून धरले आहे. खन्ना म्हणाले, ‘मी समजू शकतो. पण माझा ‘सेन्स ऑफ हंगर’ भारतातून आलेला नाही. अमृतसरमध्ये लंगर असते आणि तिथे पूर्ण शहर जेवू शकते. भुकेची जाणीव न्यूयॉर्कमध्ये असताना कळली, जेव्हा मी इथे स्ट्रगल करत होतो. इथे ‘ब्राउन’ असून मोठे होणे सोपे नाही. So my Sense of hunger came from living in America more rather than India. 

लवकरच ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि खन्ना यांच्या ‘जबरदस्त’ रिप्लायसाठी त्यांचे कौतुक होऊ लागले. 

बिस्कीट की लोगो?
सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊ शकते, अगदी एक बिस्कीटसुद्धा! ब्रिटानिया कंपनीचे ‘गूड डे’ हे बिस्कीट गेल्या आठवड्यामध्ये भलत्याच कारणासाठी व्हायरल झाले होते. 

हर्षा या ट्विटर युजरने ‘गूड डे’ बिस्किटाचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. त्याखाली कॅप्शन लिहिले, ‘मी माझ्या मित्राला हे गूड डेचे बिस्कीट दिले आणि तो एकदम म्हणाला ‘स्पोटिफाय’. Now I can''t unseen it,’ म्हणजे मला आता ते बिस्कीट स्पोटिफायच्या लोगोसारखेच दिसणार. 

स्पोटिफाय हे एक म्युझिक ॲप आहे. त्याचा लोगो आणि गूड डे बिस्किटावरच्या रेघा सारख्याच दिसतात. अर्थात, स्पोटिफायचा लोगो वेगळ्या रंगाचा आहे. हर्षा यांचे हे ट्विट व्हायरल झाले आणि लवकरच त्याचे मीमही तयार झाले. या ट्विटला २० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या असून ते खूप जणांनी रीट्विटही केले आहे. ‘लिसन टू स्पोटिफाय आणि शेजारी गूड डे,’ अशा अर्थाचे मीम्स व्हायरल झाले होते. तर एका ट्विटर युजरने स्पोटिफायला हे लोगो डिझाइन कुठून मिळाले हेही आता कळले, असे ट्विट केले आहे. एका युजरने ब्रिटानिया कंपनीलाही टॅग केले आणि कंपनीनेही त्यावर रिप्लाय करताना म्हटले, ‘Well, our crunchy and buttery #GoodDay Cookies always hit the right ''spot''... So, coincidence?!’

हा सगळा जोक स्पोटिफायपर्यंतही पोचला आणि तेही यामध्ये सहभागी झाले. त्यांनी ट्विटरवर स्पोटिफायच्या प्रोफाईल पिक्चरच्या जागी गूड डे बिस्किटाचा फोटो लावला. एवढेच नाही, तर ट्विटर टॅगलाइनही बदलली, ‘Even we can''t unseen it now.’ ही गोष्टही लगेचच व्हायरल झाली.  

संबंधित बातम्या