‘साप्ताहिक’... फ्रॉम होम!

इरावती बारसोडे
सोमवार, 6 जुलै 2020

तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर ‘सकाळ साप्ताहिक’ची छापील आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. लॉकडाउन कालावधीमध्ये आम्ही ई-साप्ताहिक प्रसिद्ध केला... ते ही लॉकडाउनचे सगळे नियम पाळून, त्याला प्रतिसादही भरभरून मिळाला. आमच्या या अनुभवाविषयी...

नमस्कार वाचकहो,
कसे आहात? इतके दिवस लॉकडाउनच्या काळातही स्क्रीनवर भेटत होतोच, पण आता जवळपास तीन महिन्यांनंतर अशी ‘पानांवर’ भेट होतेय आपली. ही सकाळ साप्ताहिकची पंचविसावी ‘छापील’ आवृत्ती. खास ‘छापील’ म्हणण्याचे कारण असे, की तब्बल तीन महिने आणि १२ ई-आवृत्त्यांनंतर ‘सकाळ साप्ताहिक’ची ही छापील आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. 

मला आजही तो २३ मार्चचा दिवस आठवतो... जनता कर्फ्यूनंतरचा दुसराच दिवस. खरे तर महाराष्ट्रामध्ये संचारबंदी आधीच लागू झाली होती. पण तरीही २३ तारखेला, सोमवारी लोक आपल्याकडे काहीच घडत नाहीये असे बिनधास्त फिरत होते. आम्ही मीडियामध्ये असल्यामुळे लॉकडाउन असले, तरी आपल्याला ऑफिसला जावे लागणार आहे याची खात्रीच होती. पण बाहेर एकंदरीत वातावरण गंभीर होते. पुण्यामध्ये दुपारी तीन वाजता पोलिसांनी रस्ते रिकामे करायला सुरुवात केली. सर्व काही इतक्या झपाट्याने बंद झाले. दैनिकांची छपाई आणि वितरणदेखील बंद झाले. त्यामुळे अर्थातच ‘साप्ताहिक’ची छपाईदेखील स्थगित करावी लागली. दोन आठवडे ‘साप्ताहिक’ प्रसिद्ध झाला नाही. त्यावेळची परिस्थितीही तशीच होती. 

दोन आठवड्यांनंतर मात्र आम्ही पुन्हा वाचकांच्या भेटीसाठी येऊ लागलो, पण ते डिजिटल स्वरूपात. नेहमीसारखा छापील अंक प्रसिद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे जोपर्यंत वितरण सुरळीत होत नाही, तोपर्यंत ई-आवृत्तीच्या माध्यमातून वाचकांशी असलेल्या नात्यात खंड पडू न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि सुरू झाली पहिल्या ई-आवृत्तीची तयारी! आधीही डिजिटल स्वरूपात ‘साप्ताहिक’ उपलब्ध होताच, पण तो आधी छापून यायचा मग डिजिटल स्वरूपात यायचा. पण आता फक्त डिजिटलच ‘साप्ताहिक’ येणार होता.

ई-आवृत्ती प्रसिद्ध करण्याचे ठरल्यानंतर आमचेही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले. ‘सकाळ साप्ताहिक’चा प्रत्येक अंक हा टीम वर्कमधूनच तयार होतो... आणि यावेळी पहिल्यांदाच संपूर्ण टीम विखुरलेली होती. पाचजण पाच ठिकाणांहून काम करणार होते. अशा पद्धतीने काम करण्याची कोणालाच सवय नव्हती. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना नेहमीचे वेळापत्रक, काम करण्याची पद्धत बदलावी लागली. एकमेकांच्या वेळांशी जुळवून घ्यावे लागले. रोजच्या रोज कॉन्फरन्स कॉलवर मीटिंग होऊ लागल्या. विषयांवर चर्चा होऊ लागली. लेखांचे नियोजन, लेआऊट, त्यातील सुधारणा यावर बोलायचे म्हणजे कानात हेडफोन्स घालून तासनतास बसायचे. त्यातच कधी कोणाच्या फोनला नेटवर्क नाही, कधी इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नाही, तर कधी लाइटच नाहीत... या असल्या गोष्टी ऑफिसमध्ये असताना जाणवत नाहीत हो! ऑफिसमध्ये कसे सगळे सुरळीत सुरू असते. तुम्हालाही हे अनुभव आले असतीलच की! तर, अशा प्रत्यक्ष ऑफिसमध्ये कधीही न जाणवणाऱ्या अनेक अडचणींना तोंड देत प्रत्येक आठवड्याला अंक प्रसिद्ध करत राहिलो. पहिल्या एक-दोन अंकांना गोष्टी जुळून यायला थोडा वेळ गेला, पण अखेर गाडी रुळावर आली. त्यासाठी जीमेल आणि व्हॉट्सॲपचे आभारच मानले पाहिजेत खरे तर!

ई-आवृत्तीसाठी काही बदल करणे आवश्‍यक होते. हा अंक छापून घरोघरी जाणार नसल्यामुळे नेहमीच्या वाचकांसाठी असलेली काही महत्त्वाची आणि लोकप्रिय सदरे स्थगित करायचे ठरले. काही सदरे मात्र ई-आवृत्तीतही सुरू ठेवली, जसे की ‘राज-रंग’, ‘कट्टा’, ‘क्रीडांगण’, ‘फूडपॉइंट’, ‘स्टाइल स्टेटमेंट’, ‘बोल्ड अँड ब्यूटिफुल’ इ. ई-आवृत्तीसाठी म्हणून काही नवीन सदरेही सुरू केली. ज्या कोरोनामुळे घरात बसायची वेळ आली, त्याबद्दल सखोल जाणून घेणे आवश्‍यक होते. त्यामुळे डॉ. अविनाश भोंडवे यांच्या ‘आरोग्य संपदा’ सदरामध्ये खास कोरोनासंदर्भातील माहिती देण्यास सुरुवात केली. तसेच पहिल्या ई-आवृत्तीमध्ये लोक घरी बसून काय करत आहेत याविषयी त्यांच्या प्रतिक्रियाही घेतल्या...

दर आठवड्याला आम्ही नवीन विषय शोधण्यावर भर दिला. कारण आजूबाजूला कोरोनाशिवाय दुसरा विषयच नव्हता. राजकारण, क्रीडा क्षेत्रापासून अगदी फॅशन किंवा फूडसंदर्भातील लेख असो... प्रत्येक लेखाची सुरुवात ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर..’ अशी होऊ लागली. सोशल मीडियावरही, जिथे रोज नवीन गोष्टी व्हायरल होतात, तिथेही कोरोना हाच एक विषय होता. त्यामुळे ‘ट्रेंडिंग’ सदरातही त्यावर आधारित लेखच येऊ लागले. कोरोनाव्यतिरिक्त विषय शोधण्याचे हेच मुख्य कारण होते. सगळीकडे कोरोना आहेच... किमान इथे तरी वेगळे काहीतरी देऊ हाच त्यामागचा विचार. म्हणूनच या कालावधीत आम्ही ‘कोरोना आरोग्य संपदा’पुरता मर्यादित ठेवत इतर अनेक वेगवेगळ्या विषयांवर भर दिला. कोरोनाचा प्रभाव लेखांवरही होताच, त्यामुळे लॉकडाउननंतरचे गिर्यारोहण कसे असेल आणि दूरसंचार क्रांतीमुळे लॉकडाउनचा कालावधी जरासा का होईना पण सुसह्य झाला आहे अशा विषयांवरील लेख आम्ही प्रसिद्ध केले.  

पर्यावरण, निसर्गासंबंधीच्या विषयांनाही स्थान दिले. शहरांचे उष्णतेच्या बेटांमध्ये होणारे रूपांतर, काटेसावरीचा सहवास, नटरंगी ग्रीष्म, पक्ष्यांची सद्यःस्थिती असे वैविध्यपूर्ण विषय त्यामध्ये होते. काही वैज्ञानिक विषयांवरही चर्चा केली; आकुंचन पावणारी ओझोन छिद्रे आणि लोणारच्या गुलाबी पाण्याचे रहस्य. खाद्यपदार्थांना आम्ही विसरलो नाही... उन्हाळा असल्यामुळे थंडगार, गारेगार आइस्क्रीम्स आणि कलरफुल सरबते आणि सर्वांच्या आवडत्या चॉकलेटवरही लेख प्रसिद्ध केले. 

यंदा मुलांची उन्हाळ्याची सुटी सक्तीच्या आणि लांबलेल्या सुटीत परावर्तित झाली होती. त्यांना सुटी असून घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती आणि मुलांना सतत व्यग्र ठेवताना पालकांनाही कसरत करावी लागत होती. म्हणूनच खास मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी ल़ॉकडाउन विशेष ‘जबाबदार सुटी’ हा अंक केला. यामध्ये घरात अडकलेल्या मुले घरात बसून ही सक्तीची सुटी कशी घालवतायत याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. मुलांनाही आपण घराबाहेर का पडायचे नाही याचे गांभीर्य कळले होते. तसेच आपण घरातही मदत केली पाहिजे याचीही त्यांना जाणीव होती, हे प्रतिक्रियांमधून स्पष्ट दिसले. म्हणूनच आम्ही या अंकाला ‘जबाबदार सुटी’ म्हटले! होती मुलांना व्यग्र ठेवण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या पालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्याशिवाय नुकतीच दहावी, बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची मतेही जाणून घेतली. मुलांनी सुटीतही कृतिशील राहावे यासाठी काही विज्ञान आणि इतर प्रयोगही दिले होते. मुलांना स्वतः करता येतील अशा रेसिपीजचाही समावेश होता. ऑनलाइन वाचता येतील अशा पुस्तकांविषयीदेखील माहिती होती. 

वाचकांना नेहमीचा छापील ‘साप्ताहिक’ मिळाला नाही, तरी ‘ई-साप्ताहिक’चेही चांगले स्वागत झाले. वाचकांच्याही नेहमीपेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाल्या. आम्ही व्हॉट्सॲप, फेसबुकच्या माध्यमातून लिंक शेअर करत होतो. तसेच दैनिक सुरू झाल्यानंतर दैनिकामध्येही लिंक येते. ‘तुम्ही ई-आवृत्ती सुरू केल्यामुळे दर आठवड्याच्या ‘साप्ताहिक’वाचनामध्ये खंड पडणार नाही,’ असे अनेकांनी आम्हाला सांगितले. एवढेच नव्हे, तर परदेशस्थित मराठी वाचकांनाही ‘साप्ताहिक’च्या ई-आवृत्तीमुळे ‘वीकएन्ड’चे खाद्य मिळाले! नायजेरियामध्ये राहणाऱ्या धनंजय जगताप यांनी ‘या ई-स्वरूपात साप्ताहिक हाती असल्यामुळे वीकएन्डला चांगली ट्रीट मिळते,’ असे सांगितले. तर कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या सुजित काळे यांनी ‘इथे मराठी वाचायला मिळत नाही. त्यामुळे ‘साप्ताहिक’ हा मोठा दिलासा आहे,’ या शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली. वाचकांची अशी अनेक पत्रे आली. त्यातील काही आम्ही प्रसिद्धही केली आहेत. तुम्हा वाचकांच्या उत्तम प्रतिसादामुळेच आम्ही ‘साप्ताहिक’ १२ ई-आवृत्त्या यशस्वीपणे प्रसिद्ध करू शकलो... आणि आता पुन्हा ही ‘छापील’ आवृत्ती तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत... अभिप्रायाची वाट पाहतोय! 

संबंधित बातम्या