ऱ्हायनो, ब्लॅक पँथरचा दरारा

इरावती बारसोडे
सोमवार, 13 जुलै 2020

सोशल मीडियावर वन्यजीव नेहमीच व्हायरल होत असतात. गेल्या आठवड्यामध्येही ट्विटरवर असेच दोन वन्यजीव व्हायरल झाले होते, एक इंडोनेशियातला आणि एक आपल्या भारतातला...

ऱ्हायनोचा मड बाथ
चिखलाच्या डबक्यात लोळणाऱ्या एका ऱ्हायनोसरोसचा अर्थात गेंड्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. इंडोनेशियाच्या पर्यावरण मंत्री सिती नुरबया बकार यांनी तीस सेकंदांचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधला गेंडा चिखलामध्ये मजेत अक्षरशः गडाबडा लोळताना दिसतो आहे. हा अतिशय दुर्मीळ जावन ऱ्हायनो आहे. 

 पांडेगलांग येथील उजुंग कुलॉन राष्ट्रीय उद्यानामधील हा व्हिडिओ आहे. प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी उद्यानांमध्ये कॅमेरे लावलेले असतात. अशाच एका कॅमेरा ट्रॅपमध्ये गेंड्याची ही मस्ती कैद झाली आहे. या व्हिडिओपाठोपाठ मंत्र्यांनी आणखी काही ट्विट्स करून लोळणाऱ्या गेंड्याची माहिती दिली आहे. त्यांच्या ट्विट्सनुसार, हा गेंडा सात वर्षांचा आहे. शरीराचे समतोल तापमान राखण्यासाठी तो चिखलामध्ये लोळत होता. त्याशिवाय चिखलातून त्याच्या शरीराला आवश्यक असलेले काही मिनरल्सही मिळतात. 

 ट्विटर युजर्स या मनसोक्त चिखलात लोळणाऱ्या आनंदी गेंड्याच्या प्रेमात पडले आहेत. व्हिडिओला दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तेरा हजारांहून जास्त वेळा व्हिडिओ रीट्विटही करण्यात आला आहे. एका ट्विटर युजरने कॉमेंट केली आहे, की ''याच्याएवढी आनंदी कधी होऊ शकेन का?'' तर आणखी एका युजरने ‘So precious’ म्हटले आहे. अनेकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचे रक्षण करा, अशी मागणी केली आहे. जगात सर्वत्रच गेंड्यांची संख्या कमी होत असून ती एक असुरक्षित प्रजाती आहे. शिकार बेकायदा असूनही त्याच्या शिंगासाठी त्याची आजही शिकार केली जाते.

खराखुरा बगिरा
रविवारी (ता. ५ जुलै) ट्विटरवर एका खऱ्याखुऱ्या ‘बगिरा’ने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले. ‘अर्थ’ या ट्विटर अकाउंटवर शाझ जंग यांनी काढलेले ‘ब्लॅक पँथर’चे फोटो पोस्ट करण्यात आले. कर्नाटकच्या काबिनी जंगलामध्ये हे फोटो काढण्यात आले असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

एका फोटोमध्ये बिबट्या सहज हिंडताना दिसतो आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये तो झाडाच्या मागून डोकावून बघतो आहे. साधारण २४ तासांत ट्विटरवर ही पोस्ट दोन लाखांहून अधिक वेळा लाइक करण्यात आली आहे आणि ५४ हजारहून अधिक वेळा रीट्विट करण्यात आली आहे. 

अनेकांनी कॉमेंट्सही केल्या आहेत. एका युजरला तर हा ‘जंगल बुक’मधला बगिराच आहे, असे वाटते. अनेकांनी हे फोटो थेट जंगल बुकमधूनच आल्यासारखे वाटत आहेत, असे म्हटले आहे. ‘झाडामागून डोकावणारा बिबट्या जणू काही म्हणतोय, काय माणसा काय बघतोयस? मी तुला खावं अशी तुझी इच्छा आहे का?’ अशा अर्थाचे ट्विटही एकाने केले आहे. एका युजरने म्हटले आहे, ‘टचाला वकांडामधून वाट चुकला की काय!’ (टचाला ही हॉलिवूडच्या ‘ब्लँक पँथर’ सिनेमामधील व्यक्तिरेखा आहे.)

अर्थ ट्विटर अकाउंटवर हे फोटो पोस्ट झाले, तेव्हा त्यांना फोटो क्रेडिट दिलेले नव्हते. शाझ जंग यांनी हे लक्षात आणून दिले व फोटोला योग्य क्रेडिट द्यावे अशी मागणी केली. इतर काही ट्विटर युजर्सनीदेखील ही बाब लक्षात आणून देत कृपया जंग यांना क्रेडिट द्या असे सांगितले. वाइल्डलाइफ फोटोग्राफी ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी  

कष्ट आणि संयम लागतो. त्यामुळे असे उत्तमोत्तम फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना त्याचे श्रेय मिळायलाच हवे. शाझ जंग यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘बगिरा’चे आणि त्याच्या इतर अनेक जंगली दोस्तांचे अनेक चित्तवेधक फोटो बघायला मिळतील.

संबंधित बातम्या