दाताची ‘रॉयल’ गोष्ट

इरावती बारसोडे
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

ट्रेंडिंग 

ब्रिटनमध्ये आता राजघराण्याची सत्ता नसली, तरीही त्यांचा मान तेवढाच आहे. राजघराण्यातला प्रत्येक सदस्य काय करतो, कुठे जातो याची तिथल्या जनतेला नेहमीच उत्सुकता असते. रॉयल फॅमिलीमधला लहानगा प्रिन्स जॉर्ज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे, कारण ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक सर डेव्हिड ॲटेनबरो यांच्याकडून प्रिन्स जॉर्जला एक प्राचीन भेटवस्तू मिळाली आहे. 

ड्युक ऑफ केंब्रिज प्रिन्स विल्यम आणि डचेस ऑफ केंब्रिज केट यांचा मुलगा प्रिन्स जॉर्ज सात वर्षांचा आहे. 

ड्युक आणि डचेस ऑफ केंब्रिज केन्सिंग्टन पॅलेस येथे वास्तव्यास असतात. सर ॲटेनबरो यांच्या ‘अ लाइफ ऑन अवर प्लॅनेट’ या नवीन डॉक्युमेंट्रीचे प्रायव्हेट स्क्रीनिंग केन्सिंग्टन पॅलेसमध्ये करण्यात आले. पॅलेसच्या बागेमध्ये प्रिन्स विल्यम आणि सर ॲटेनबरो यांनी डॉक्युमेंटरी पाहिली. नंतर सर ॲटेनबरो, ड्युक आणि डचेसच्या तिन्ही मुलांना भेटले आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. तिघांपैकी सर्वात मोठा असलेल्या प्रिन्स जॉर्जला त्यांनी Carcharocles megalodon या नामशेष झालेल्या शार्क प्रजातीचा दात भेट म्हणून दिला. हा दात त्यांना १९६० मध्ये माल्टा बेटावर कुटुंबाबरोबर सहलीला गेले असताना मिळाला होता. प्राचीन ग्रीक भाषेत मेगॅलोडॉन याचा अर्थ ‘अजस्र दात’ असा होतो. हा शार्क १६ मीटर एवढा लांब होता. 

या दातावरून एक वेगळाच वाद निर्माण झाला. ज्या माल्टा देशात हा दात सापडला, त्या देशाचे म्हणणे होते, की हे जीवाश्‍म माल्टामधील संग्रहालयामध्येच राहिले पाहिजेत. हा दात पिवळ्या चुनखडीच्या दगडामध्ये सापडला होता आणि दोन कोटी ३० लाख वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. हा दात प्रिन्स जॉर्जला भेट मिळाल्यामुळे सगळ्यांचेच त्याकडे लक्ष वेधले गेले. माल्टाचे सांस्कृतिक मंत्री होसे हेरेरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की हा दात माल्टिज संस्कृतीचा भाग आहे आणि तो माल्टामध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यांच्या या वक्त्यव्यावर भरपूर टीका झाला. माल्टा १९६४ पर्यंत ब्रिटिश कॉलनी होती. सर ॲटेनबरो यांना जेव्हा हा दात सापडला, तेव्हा हा देश ब्रिटिश अधिपत्याखाली होता. त्यामुळे हा दातही ब्रिटिशांचाच आहे आणि तो परत मागण्याचा अधिकार माल्टाला नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या. ब्रिटिश माध्यमांकडून ‘प्रिन्स जॉर्जने दात माल्टाला परत करावा की नाही,’ असा प्रश्‍न विचारून लोकांचे मत विचारले, ‘पोल’ घेतले. या पोल्समध्येच निष्कर्ष अर्थातच प्रिन्स जॉर्जने दात परत करण्याची गरज नाही, असाच आला. एवढेच नाही, तर माल्टामधील लोकांनाही सर ॲटेनबरो  यांनी माल्टामध्ये सापडलेला दात प्रिन्स जॉर्जला देणे, यात काही गैर वाटले नाही. हेरेरा यांच्यावर इतर देशांबरोबर स्वतःच्याच देशातूनही टीकेची झोड उठली. परिणामी, हेरेरा यांनी प्रिन्स जॉर्जकडेच दात राहूदेत, आम्हाला तो नको, असा पवित्रा घेतला. या सगळ्या प्रकाराची जागतिक माध्यमांनीही दखल घेतली होती. 

सर ॲटेनबरो यांनी प्रिन्स जॉर्जला ज्या दिवशी दात भेट दिला, त्याच दिवशी ९४ वर्षांच्या ॲटेनबरो यांनी इन्स्टाग्राम पदार्पण केले. पदार्पण केल्या केल्या अवघ्या चार तासांत त्यांचे १० लाख फॉलोअर्स होते. त्यांचा हा विक्रम गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवला गेला आहे. 

संबंधित बातम्या