बोअरिंग इडली? काहीही काय!

इरावती बारसोडे
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

ट्रेंडिंग

इडली हा फक्त दक्षिण भारतीयांच्या आवडीचा पदार्थ नसून संपूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेरही आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. अशा इडलीला एका ‘साहेबा’ने बोअरिंग म्हणावे, म्हणजे काय? एडवर्ड अँडर्सन असे या इडली न आवडणाऱ्या ब्रिटिशाचे नाव आहे. अँडर्सन हे न्यूकॅसलमधल्या नॉर्थअंब्रिया विद्यापीठामध्ये इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

झोमॅटो इंडियाने मागील आठवड्यामध्ये एक ट्विट केले होते, ‘what’s that one dish you could never understand why people like soo much.’ या ट्विटला रिप्लाय करताना अँडर्सन यांनी म्हटले, की इडली ही जगातील सर्वात बोअरिंग गोष्ट आहे... झाले! ट्विटरवरच्या सर्व भारतीय युजर्सचे इडली प्रेम उफाळून आले! या ट्विटवरून एकप्रकारचे फूडवॉरच ट्विटरवर सुरू झाले.

अनेक युजर्सनी अँडर्सन यांना तुम्ही इडली योग्य पदार्थांबरोबर खाल्लीच नाहीये, त्यामुळे तुम्हाला ती आवडत नाही अशा आशयाची ट्विट्स केली. सांबर, खोबऱ्याच्या चटणीपासून फिश करी, मंगलोरियन चिकन करी, मटण करी, गन पावडर बरोबरची बटर इडली खाऊन बघा, असा फुकटचा सल्लाही अनेक युजर्सनी दिला आहे. तर काहींनी आम्हीही दक्षिण भारतीय आहोत पण आम्हालाही इडली आवडत नाही, असे म्हणत अँडर्सन यांचे समर्थनही केले आहे. 

शशी थरुर यांचे चिरंजीव इशान थरुर यांनी ‘हे आत्तापर्यंतचे सगळ्यात आक्षेपार्ह ट्विट आहे,’ असे म्हटल्याबरोबर पाठोपाठ शशी थरुर यांनीदेखील रिप्लाय करत म्हटले, ‘इडलीसारख्या गोष्टी आनंद लुटणे सगळ्यांना जमत नाही. मला या गरीब माणसाची दया येते, कारण आयुष्य काय आहे हे त्याला कळणारच नाही.’ अँडर्सन यांनी या ट्विटला रिप्लाय करताना ट्विट केले, ‘सध्या हा ‘गरीब माणूस’ तुमचे पुस्तक (इनग्लोरियस एम्पायर) वाचतो आहे आणि वर्गालाही वाचायला देणार आहे.’ लगेचच थरुर यांनी पुस्तक वाचताना इडली कशाबरोबर खावी याचे रसभरीत वर्णन करत इडली म्हणजे स्वर्ग आहे, हे अँडर्सन यांना पटवण्याचा प्रयत्न केला.

‘दक्षिण भारतीय युजर्सना चिडवण्यामध्ये एक मोठाच प्रॉब्लेम आहे. कारण, भारतीय लोक अक्षरशः प्रत्येक टाइम झोनमध्ये आहेत. त्यामुळे भारतात रात्र असते, तेव्हाही चिडके रिप्लाय येतच राहतात,’ असेही ट्विट अँडर्सन यांनी केले होते. त्यांच्या बोलण्यात तथ्यच आहे म्हणा. भारतीयांना इडलीबद्दल फारच प्रेम आहे.

आता इडली भारताची, अँडर्सन इंग्लंडचे आणि याचे कनेक्शन जोडले गेले अमेरिकेच्या निवडणुकीशी, कारण अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना इडली आवडते. एका मोठ्या माध्यम समूहाने या घटनेची राजकीय बातमी केल्यानंतर अँडर्सन यांनी पुन्हा ट्विट केले, ‘माझी इडलीवरची स्टुपिड कॉमेंट आता अमेरिकी निवडणुकांशी जोडली जात आहे.’ पण आपल्याला इडली सोडून बाकी सर्व दाक्षिणात्य पदार्थ प्रचंड आवडतात हेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या सगळ्या ट्विट्समध्ये ते वारंवार हेच सांगत आहेत, की त्यांना फक्त इडली आवडत नाही. बाकी डोसा, फिश करी, पायसम्‌, चटणी, सांबर या सगळ्या गोष्टी ते आवडीने खातात. 

या सगळ्या प्रकारानंतर अँडर्सन यांनी स्वतःचा इडलीबरोबर एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, ‘मी अपघाताने संपूर्ण दक्षिण भारताला राग येईल असे कृत्य केल्यामुळे, दुपारच्या जेवणासाठी इडली मागवणे हीच योग्य गोष्ट होती. I’m very sorry to report that my unpopular - or ‘blasphemous’, as some have said - opinion remains unchanged. #sorrynotsorry.’ तर, इडलीवर एवढे सगळे रामायण महाभारत घडूनही अँडर्सन यांनी इडली आवडत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ... आणि हो, महत्त्वाचे सांगायचेच राहिले; अँडर्सन यांची बायको केरळची आहे बरं का!     

संबंधित बातम्या