‘ख्रिसमस ट्री’वर कोआला

इरावती बारसोडे
मंगळवार, 5 जानेवारी 2021

ट्रेंडिंग

घरात नाताळानिमित्त सजवलेल्या ख्रिसमस ट्रीवर साधारणपणे काय असते? ख्रिसमस ऑरनामेंट्स, लाइटच्या माळा वगैरे. पण खराखुरा जिवंत जंगली प्राणी झाडावर लटकला तर? होय, असे खरच घडले आहे. ऑस्ट्रेलियामधल्या एका कुटुंबाच्या घरातील ख्रिसमस ट्रीवर एक खराखुरा कोआला बेअर चढून बसला होता.

ऑस्ट्रेलियामध्ये कोआला बेअर मोठ्या संख्येने आढळतात. कोआला बेअरचा फोटो बघितलाय तुम्ही? फारच गोंडस दिसतो. अशीच एक गोंडस कोआला बेअरची मादी घरात घुसून ख्रिसमस ट्रीवर चढून बसली होती आणि तिला खाली उतरायचेच नव्हते. 
त्याचे झाले असे, ॲडलेडमधील कोरोमँडल व्हॅली येथे राहणाऱ्या मॅककॉर्मिक कुटुंबानेही नाताळासाठी कृत्रीम पण खरे वाटावे असे छानसे ख्रिसमस ट्री सजवले होते. सोळा वर्षांची टायला मॅककॉर्मिक घरातून दुपारी बाहेर पडली. घरातील इतर मंडळी आधीच बाहेर गेलेली होती. टायलाने जाताना कुत्र्यालाही बाहेर ठेवले, सगळी दारे व्यवस्थित लावली. संध्याकाळी जेव्हा सगळे घरी आले, तेव्हा कुत्रा थेट ख्रिसमस ट्रीकडे धावला आणि त्याचा वास घेऊ लागला. टायलाच्या आईला म्हणजे अमॅन्डाला हा प्रकार जरा विचित्रच वाटला. काही ऑरनामेंट्स खाली पडले होते, म्हणून वर पाहिले तर झाडावर कोआला बेअर लटकलेली होती. तिनेे खोट्या झाडाचीही पाने खाण्याचा प्रयत्न केला होता. लाइटच्या माळांमध्ये ती अडकली होती. अमॅन्डाला सुरुवातीला हा जोकच वाटला. तिला वाटले मुलांनी सॉफ्ट टॉय ठेवले आहे, पण तो खराखुराच प्राणी निघाला. 
मॅककॉर्मिक कुटुंबाच्या घराच्या बाहेरील झाडांवर कोआला बेअर असतात, पण याआधी ते घरात कधीच आले नव्हते. 

अमॅन्डाने लगेचच ॲडलेड अँड हिल्स कोआला रेस्क्यूला फोन करून माहिती दिली. 1300Koalaz असे या संस्थेचे नाव आहे. गंमत म्हणजे त्यांना ख्रिसमस ट्रीवर कोआला आहे, हे त्यांना पटलेच नाही. त्यांना हा प्रँक कॉल असावा, अशी शंका आली. त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरही याबाबत पोस्ट लिहिली आहे. 

संस्थेचे लोक येईपर्यंत टायलाने ट्रीवरच्या कोआलाचे डॅफनी असे नामकरणही केले होते. डॅफनी तीन-चार वर्षांची तरुण आणि सुदृढ कोआला आहे. टायलाने डॅफनीचा टिकटॉक व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ अर्थातच व्हायरलही झाला. डॅफनीला नंतर बाहेरच्या झाडावर सोडण्यात आले. हा प्रसंग कायम आठवणीत राहणार आहे. या वाईट वर्षानंतर असे काहीतरी छान घडले, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया अमॅन्डा मॅककॉर्मिकने प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
 

संबंधित बातम्या