पार्टी हो रही है...

इरावती बारसोडे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

ट्रेंडिंग

सोशल मीडियावर खरेच काय वाट्टेल ते व्हायरल होऊ शकते. एका शब्दाचा वेगळा उच्चार सध्याचा व्हायरल ट्रेंड आहे. विशेष म्हणजे हा ट्रेंड पाकिस्तानात सुरू झालाय! पाकिस्तानमधील एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सध्या भारतातही भलतीच फेमस झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

दनानीर मोबिन असे या मुलीचे नाव. तिला गीना म्हणूनही ओळखतात. ही १९ वर्षांची इन्फ्लुएन्सर इस्लामाबादची आहे. इन्स्टाग्रामवर ती भरपूर ॲक्टिव्ह असते. तिने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये ती मोजून तीन वाक्ये म्हणते, ‘ये हमारी कार है और ये हम है, और ये हमारी पावरी हो रही है।’ हो पावरी, म्हणजेच ‘पार्टी’! तिच्या ‘पावरी’ या उच्चारामुळेच हा व्हिडिओ व्हायरल झाला. आत्तापर्यंत या व्हिडिओला ४५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘आम्ही गाणी ऐकत होतो आणि मजा करत होतो. मी सहज फोन बाहेर काढला आणि व्हिडिओ तयार केला. जगात एवढा ताण आणि ध्रुवीकरण असताना, माझा हा हलकाफुलका व्हिडिओ सीमेपलीकडेही लोक एंजॉय करतायत, याचा मला आनंदच आहे,’ असे दनानीरने बीबीसी उर्दूबरोबर बोलताना सांगितले.

हा व्हिडिओ भारतामध्ये व्हायरल होण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे, यशराज मुखाते याचा मॅशअप व्हिडिओ. सोशल मीडियावर यशराज मुखाते हेसुद्धा एक प्रसिद्ध नाव आहे. यशराज एखादा व्हायरल व्हिडिओ घेऊन त्याला स्वतःचे म्युझिक देऊन मॅशअप तयार करतो. ‘पावरी हो रही है’चासुद्धा असाच व्हिडिओ त्याने केला आणि हा मॅशअप व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. 

#PawriHoRahiHai हा हॅशटॅग वापरून अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत. भारतातल्या नेटीझन्सनी शेवटच्या ओळीचा स्नॅपशॉट घेऊन स्वतःचे मीम्स तयार केले आहेत. एवढेच नव्हे तर अनेक ब्रँड्सनीदेखील या ट्रेंडमध्ये उडी मारली आहे. नेटफ्लिक्स, डॉमिनोज इंडिया, ओयो रूम्स, झोमॅटो, स्विगी अशा अनेक ब्रँड्सनी या ट्रेंडचा जाहिरातीसाठी वापर केला आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने (पीआयबी) पण या ट्रेंडचा वापर करून मीम शेअर केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनीदेखील ‘ये हम है और हमारी कार है। अगर लेट नाइट पावरी आपको डिस्टर्ब कर रही है तो ये हमारा नंबर है - ११२’ असे ट्विट करत या ट्रेंडमध्ये भाग घेतला.

संबंधित बातम्या