फ्लॅट टॉमचा फ्लॅट रग

इरावती बारसोडे
सोमवार, 15 मार्च 2021

ट्रेंडिंग

ट्विटरवर सध्या एक ‘फ्लॅट कॅट’ रग व्हायरल होतो आहे, कारण या रगचे डिझाइन आहेच युनिक. एका फेमस कार्टून कॅरॅक्टरची, म्हणजेच ‘टॉम अँड जेरी’ मधल्या टॉम कॅटची ही प्रतिकृती आहे.

हॅना-बार्बरा निर्मित ‘टॉम अँड जेरी’ कार्टून म्हणजे निखळ करमणूक! बिचाऱ्या टॉम कॅटला जेरीच्या मागे पळताना खूप काय काय होत असते, पण त्याच वेळी त्याच्यासाठी भौतिकशास्त्रातले कुठलेही नियम लागू होत नाहीत. तो हवेत खूप वर उडतो, पण त्याने खाली बघितल्याशिवाय गुरुत्वाकर्षण काम करत नाही. वरून पाण्यावर आपटतो तेव्हा त्याचे अक्षरशः तुकडे तुकडे होतात. सुतारपक्ष्याला खातो, तेव्हा तो पक्षी त्याच्या पोटाला आतून भोके पाडतो आणि टॉम जेव्हा पाणी पितो, तेव्हा त्या भोकांमधून पाणी बाहेर येते. त्याच्यावर खूपदा वजन पडते आणि तो सपाट होतो. आठवतोय का तो टॉम? पायऱ्यांसारखा आकार घेऊन सपाट झालेला. नसेल आठवत तर सध्या ट्विटरवर व्हायरल होणारा ‘फ्लॅट टॉम’ तुम्हाला आठवण करून देईल. कार्टूनमधल्या टॉमसारखा तस्साच हुबेहुब ‘फ्लॅट टॉम’ ट्विटरवर व्हायरल होत आहे. Nellaf नावाच्या एका ट्विटर युजरने ‘टॉम अँड जेरी’ कार्टूनपासून प्रेरणा घेऊन एक रग तयार केला आहे.

कार्टूनमधला चपटा, पसरलेला टॉम जसा दिसायचा ना, तसाच हा रग दिसतो. एवढेच काय, नेलाफने तर टॉमच्या चेहऱ्यावरील भावसुद्धा हुबेहुब टिपले आहेत. नेलाफने या रगचे दोन फोटो ट्विट केले आणि ट्विटर युजर्स रगच्या प्रेमातच पडले. ॲलिसन हेज नावाच्या युजरने म्हटले आहे, ‘माझ्या घरात तर पायऱ्याही नाहीत. तरी पण मला हा रग हवा आहे.’ तर, पीट स्टुवर्ट म्हणतो, ‘या एका गोष्टीसाठी मला पायऱ्या असलेली प्रॉपर्टी घ्यावी लागणार आहे. What a joyous thing.’ ‘जेरीचा रग तयार करून त्याच्या शेजारी ठेवला, तर टॉम नक्की जिवंत होईल,’ असेही एका युजरने म्हटले आहे. कार्टूनमधला वेड्यावाकड्या पद्धतीने सपाट झालेल्या टॉमचा एक फोटो एका युजरने शेअर करत असाही एक रग तयार करा, अशी मागणी केली आहे. 

‘फ्लॅट टॉम’ रग ज्या सीनवरून तयार केला आहे, तो सीन ‘जेरी अँड जंबो’ या भागामधला आहे. या भागामध्ये हत्तीचे एक पिल्लू चुकून टॉम आणि जेरीच्या घरात घुसते आणि नेहमीप्रमाणे हे दोघे विरुद्ध टॉम असा गमतीदार सामना रंगतो. टॉम जंबोलाच जेरी समजून त्याला शेपटीला धरून बिळातून बाहेर ओढतो, पण त्याचे वजन त्याला झेपत नाही आणि त्याच्यासकट जिन्यावर जाऊन आदळतो आणि पायऱ्यांचा आकार घेतो. खरेतर असे वर्णन वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे. ‘टॉम अँड जेरी’ लाइव्ह ॲक्शन सिनेमाही काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे.

संबंधित बातम्या