उत्साही वादक!

इरावती बारसोडे
गुरुवार, 25 मार्च 2021

ट्रेंडिंग

सोशल मीडियावर फक्त इमेजेसची मीम्स व्हायरल होतात असे नाही. व्हिडिओचीसुद्धा मीम्स तयार होतात आणि त्या मीम्समुळे मूळ व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतो. असाच एक व्हिडिओ सध्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या प्रमुख सोशल मीडिया साइट्सवर फिरतो आहे... आणि या व्हिडिओमध्ये आहेत चार वादक आणि त्यांचा ‘उत्साह’ मीमर्सना नवीन खाद्य देऊन गेला!

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कुठला आहे, कोणी काढला, कधी काढला याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पण तरीही आता भारतात व्हिडिओमधले चारजण नक्कीच फेमस झाले असतील. या व्हिडिओमध्ये एका स्टेजवर चार वादक आपल्याच धुंदीत जोरजोरात तबला, पेटी अशी वाद्ये वाजवताना दिसतात. त्यातला एक मधूनच हुर्रर्रर्र असा ओरडतोही. एक झांज वाजवणाराही यात आहे. वाजवता वाजवता बसल्या जागी नाचणाऱ्या या अति उत्साही वादक मंडळींच्या वादनामध्ये एकप्रकारचा जोश आहेच, पण त्याचवेळी त्यांना कशाची तरी घाई झाली आहे, असेही वाटते. नेमका हाच धागा पकडून मीम्स तयार होत आहेत. या वादकांच्या जोशपूर्ण वादनाने मीमर्समध्ये जोश निर्माण केला आहे, असेच म्हणा ना! अगदी स्मृती इराणींपासून मुंबई पोलिसांपर्यंत अनेकांच्या हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ‘When your CA friends rush towards March end...#dostonperehemkaro #fantasticfriday (sic).’ या कॅप्शनसहीत व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे, ‘वीक पासवर्ड मिळाल्यानंतर हॅकर्स अशी पार्टी करतात.’ अनेकांनी या व्हिडिओची ‘मार्च एन्डिंग’बरोबर तुलना केली आहे. ‘अॅप्रेजल’च्या महिन्यात सगळे कर्मचारी हे असेच वागतात, असेही एका युजरने म्हटले आहे. अमित ए या युजरने ‘जेव्हा तुम्हाला रॉकस्टार व्हायचे असते, पण पालक शास्त्रीय संगीत शिकवतात, तेव्हा असे होते,’ असेही कॅप्शन दिले आहे. ‘तुमची क्रश तुम्हाला हाय म्हणते, तेव्हा डोक्यात हे असेच काहीसे होते,’ असाही विनोद एकाने केला आहे. एवढेच काय, तर काहींनी फोडणी करताना गरम तेलामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता असेच तडतडतात, असे म्हणून या वादकांची तुलना थेट फोडणीबरोबरच करून टाकली आहे. चार वादकांपैकी एकाच्या हेअरस्टाइलकडेही काहींचे लक्ष वेधले गेले. ही हेअरस्टाइल व्होगमध्ये असायला हवी, असे एका युजरचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या