‘वॉल’ का ‘इंदिरानगरचा गुंड’...

इरावती बारसोडे
सोमवार, 19 एप्रिल 2021


ट्रेंडिंग

भारतीय क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड क्रिकेट आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या सगळ्यांचाच लाडका आहे. क्रिकेटपटू म्हणून राहुल द्रविड सगळ्यांना आवडतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ‘जंटलमन’ स्वभावामुळंही तो सर्वांना प्रिय आहे. शांत, संयमी, कधीही तोल न ढळू देणारा हाच द्रविड आरडाओरडा करून ‘इंदिरानगरचा गुंड आहे मी...’ असं सांगू लागला तर? चर्चा होणारच ना!

एका क्रेडिट कार्डच्या नव्या जाहिरातीमध्ये राहुल द्रविड खूपच वेगळ्या अवतारात झळकला आहे. या जाहिरातीमध्ये क्रेडिट कार्ड वापरणारी एक व्यक्ती कार्ड वापरण्याचे काही फायदे सांगते आणि म्हणते, ‘मला माहिती आहे हे हास्यास्पद आहे. हे म्हणजे राहुल द्रविडला राग येतो म्हणण्यासारखं आहे,’ आणि लगेचच पुढच्या शॉटमध्ये ट्रॅफिक जॅमला वैतागलेला, भडकलेला द्रविड आपल्याला बघायला मिळतो. द्रविड रागाच्या भरात दुसऱ्या गाडीच्या काचेवर मिल्कशेक फेकतो, हॉर्न बडवतो, लोकांच्या अंगावर ओरडतो, एवढंच नाही तर बॅट घेऊन दुसऱ्या गाडीचा साइड-व्ह्यू मिरर फोडतो आणि शेवटी हातात बॅट घेऊन ‘इंदिरानगर का गुंडा हूँ मै।’ असं म्हणून धमकीही देतो.

ही जाहिरात शुक्रवारी (ता. ९ एप्रिल) प्रसारित झाली, आणि फक्त दोन दिवसांत तिला यूट्युबवर जवळपास साडेतीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियाच्या इतर माध्यमांवरही हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. 

इंडियन टीमचा कॅप्टन विराट कोहली यानं देखील ही जाहिरात ट्विट करून म्हटलं आहे, ‘राहुलभाईची ही बाजू कधीच बघितली नव्हती.’ तर, नटराजन यानं ट्विट करताना म्हटलं आहे, ‘राहुलजी, कोणाला तरी गंभीर दुखापत होणार आहे..’ झोमॅटोनंसुद्धा या विनोदात भाग घेतला. ‘आज इंदिरानगरच्या रस्त्यांवर चिडलेला गुंड असल्यामुळं डिलिव्हरीला थोडा उशीर होऊ शकतो,’ असं ट्विट केलं आहे. इतरही नेटिझन्सनी अनेक मीम्स शेअर केले आहेत. एका ट्विटर युजरच्या म्हणण्यानुसार, ‘आज पाहिलेली ही सगळ्यात ‘क्युट’ गोष्ट आहे. आपल्याला असेच गुंड हवे आहेत.’ मुंबई पोलिस आणि सुरत ट्रॅफिक पोलिसांनीसुद्धा या व्हिडिओची मदत घेऊन जनजागृती केली आहे. 

जाहिरातीमधली राहुलच्या तोंडी असलेली, ‘इंदिरानगर का गुंडा हूँ मै’ आणि ‘कम मॅन, कम.. यू कम मॅन!’ ही दोन वाक्यं नेटिझन्सना विशेष आवडली आहेत. ही जाहिरात क्रेडिट कार्डच्या फायद्यांपेक्षा राहुल द्रविडच्या रागामुळंच जास्त व्हायरल झाली. शांत स्वभावाचा राहुल द्रविड असं काही करू शकतो, मग तो अभिनय का असेना, ही कल्पनाच लोकांच्या पचनी पडलेली नाही, अस दिसतंच. जाहिरातीच्या निर्मात्यांच्या क्रिएटिव्हिटीला दाद द्यायला हवी.. आणि अर्थातच ‘द वॉल’च्या अभिनयालाही!

संबंधित बातम्या