मासा माणसाला गिळतो तेव्हा...

इरावती बारसोडे
सोमवार, 21 जून 2021

ट्रेंडिंग

भारत असो वा आणखी कुठला देश, सगळीकडे माशाचे प्रकार अगदी आवडीने खाल्ले जातात. पण एखाद्या माशानं माणसालाच गिळलं तर..? हो खरंच असं घडलंय! हम्पबॅक व्हेल माशानं एका अमेरिकी डायव्हरला गिळलं होतं. पण सुदैवानं व्हेलनं नंतर विचार बदलला आणि त्या माणसाला बाहेर थुंकूनही टाकलं. वाचताना हसायला येईल कदाचित, पण जिवंतपणीच माशाच्या पोटात गेलेल्या त्या डायव्हरचं काय झालं असेल?

अमेरिकेच्या केप कॉड इथं गेल्या आठवड्यामध्ये एका भल्या मोठ्या हम्पबॅक व्हेल माशानं मायकल पॅकार्ड यांना चक्क गिळलं होतं. छप्पन्न वर्षांचे पॅकार्ड हे व्यवसायानं लॉबस्टर डायव्हर आहेत, म्हणजेच ते पाण्यात खाली जाऊन लॉबस्टर पकडतात. शुक्रवारी (ता. ११) ते नेहमीप्रमाणे केप कोड इथं ४५ फूट खोल पाण्यामध्ये लॉबस्टर पकडत होते. अचानक त्यांना कसलातरी दणका बसला आणि क्षणार्धात डोळ्यासमोर अंधार पसरला. त्यांना सुरुवातीला शार्कने हल्ला केला असंच वाटलं, कारण तिथं शार्क असणं अगदी नेहमीची गोष्ट आहे. शार्कनं हल्ला केला असता, तर त्यांना कुठंतरी दात शरीरात घुसून वेदना झाल्या असत्या. पण तसं तर काही होत नव्हतं. मग त्यांच्या लक्षात आलं की आपण व्हेल माशाच्या पोटात आहोत आणि त्याचं तोंड बंद आहे. आपण आता जिवंत राहत नाही, याची पॅकार्ड यांना खात्रीच पटली. नंतर पॅकार्ड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ते माशाच्या पोटात अंदाजे तीसेक सेकंद होते पण तरीही ब्रीदिंग ॲपरॅटस लावलेलं असल्यामुळे त्यांचा श्‍वासोच्‍छ्वास सुरूच होता. 

व्हेल माशाला आपण काहीतरी वेगळंच गिळलं आहे याची जाणीव झाली असावी. कारण त्यानं लगेचच पृष्ठभागावर येऊन डोकं हलवलं आणि पॅकार्ड यांना थुंकून टाकलं. त्यांचे सहकारी जोसिया मेयो यांनी त्यांना वाचवलं. मेयो या घटनेचं वर्णन करताना हेच सांगतात, की त्यांना सुरुवातीला लांब दिसणारा व्हेल म्हणजे शार्क आहे असंच वाटलं होतं. काही वेळानं तो वर आला तेव्हा व्हेल असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. नंतर परत एकदा व्हेल वर आला, पाण्याचा फवारा उडाला आणि पॅकार्डही उडून पुन्हा पाण्यात पडले. 

हॅम्पबॅक व्हेल खरंतर माणसाला मुद्दाम काही करत नाही. अशा प्रकारच्या घटना तर अगदीच दुर्मीळ आहेत. त्यामुळे व्हेलनं पॅकार्ड यांना गिळणं हा निव्वळ अपघातच होता. शास्त्रीयदृष्ट्याही हम्पबॅक माणसाला अख्खा गिळू शकत नाही (अख्खा माणूस त्याच्या तोंडात मावत असला तरीही नाही), कारण हम्पबॅकचा गळा माणसाच्या मनगटाएवढा असतो आणि फक्त १५ इंचच ताणला जाऊ शकतो. म्हणूनच केप कोड मधल्या हम्पबॅकनं पॅकार्ड यांना लगेच स्वतःच्या पोटातून बाहेर काढलं आणि आपली चूक सुधारली. 

मोठाल्या व्हेलच्या पोटात जाणं हे पॅकार्ड यांच्यासाठी जसं धक्कादायक होतं, तसंच एवढा मोठा माणूस गिळणं हे त्या व्हेलसाठीही कदाचित धक्कादायकच असावं. हम्पबॅकनं पॅकार्डना आपल्या पोटातून बाहेर काढलं नसतं तर दोघांच्याही जिवावर बेतलं असतं, हे नक्की!

संबंधित बातम्या