स्वीमिंग चँपही, विणकरही!

इरावती बारसोडे
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

ट्रेंडिंग

विणकाम म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर नातवासाठी स्वेटर नाहीतर टोपडं विणणारी आजी येते. हे फक्त बायकांकडे, विशेषतः वयस्क बायकांकडे, असलेलं कौशल्य आहे असा जर तुमचा समज असेल तर तो सर्वस्वी चुकीचा आहे. कारण स्वीमिंग चँपियन असलेला ब्रिटनमधला एक तरुण मुलगा त्याच्याकडे असलेल्या विणकाम कौशल्यामुळं नुकताच प्रकाशझोतात आला होता. 

टोकियो ऑलिंपिक मागील आठवड्यामध्ये संपलं. भारतातही नीरज चोप्रा, मीराबाई चानू, रवीकुमार दहिया, पी.व्ही. सिंधू, लवलिना बार्गोहेन, बजरंग पुनिया आणि पुरुष हॉकी टीमच्या सदस्यांनी पदकं खेचून आणल्यामुळे हे सर्वच खेळाडू सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होते. पण त्याचबरोबर इतर देशांमधील काही खेळाडूदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. कतारचा मुताझ एसा बार्शिम आणि इटलीचा जियानमार्को ताम्बेरी या दोघांना उंच उडीसाठी सुवर्णपदक मिळालं आहे. या दोघांनी थकवणाऱ्या टाय ब्रेकरनंतर स्पर्धा पुढे सुरू ठेवण्याऐवजी सुवर्णपदक शेअर करायचं ठरवलं आणि त्यांच्या मैत्रीचा तो क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला.

असाच व्हायरल झालेला आणखी एक खेळाडू म्हणजे ग्रेट ब्रिटनचा टॉम डेली! स्वीमिंग चँप असलेल्या टॉम डेलीनं या ऑलिंपिकमध्ये सांघिक सुवर्णपदक आणि आणि वैयक्तिक कांस्यपदक मिळवलं आहे. पण त्यानं नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं ते वेगळ्याच कारणामुळे, आणि ते कारण म्हणजे तो करत असलेलं विणकाम!

टॉम जलतरण तलावाच्या बाजूला निवांतपणे स्वेटर विणत बसलेला पहिल्यांदा दिसला तेव्हापासूनच नेटिझन्स त्याच्याकडे लक्ष ठेवून होते. टॉमला विणकामाची भयंकर आवड आहे. त्यानं स्वतःची कला दाखवण्यासाठी ‘मेड विथ लव्ह बाय टॉम डेली’ हे खास इन्स्टाग्राम हँडलसुद्धा सुरू केलं आहे. रंगीबेरंगी स्वेटर्स, छोटी खेळणी, मोजे, टोपडी अशा असंख्य गोष्टी तो आवडीनं विणतो. त्यातून गरजवंतांसाठी निधीही गोळा करतो. खेळाचा, स्पर्धेचा ताण कमी करण्यासाठी त्याला विणकाम करायला आवडतं. ‘ऑलिंपिंकच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या विणकामामुळेच मी तग धरू शकलो,’ असं टॉम सांगतो. त्यानं जिंकलेल्या सुवर्णपदकावर कशाचेच ओरखडे उठू नयेत म्हणून त्यानं पदकासाठी खास बटवा तयार  केला आहे. त्याच्या पुढच्या बाजूवर ब्रिटनचा युनियन जॅक आहे आणि मागं जपानचा झेंडा. 

टॉमनं स्पर्धा सुरू असताना विणायला घेतलेला स्वेटर स्पर्धा संपता संपता पूर्ण केला होता. तो घालून त्यानं एक व्हिडिओ आणि काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. स्वेटरवर पुढे जपानी भाषेत टोकियो लिहिलं आहे. उजव्या दंडावर जीबीआर लिहिलं आहे, डाव्या दंडावर युनियन जॅक आहे आणि मागे टीम जीबी आणि ऑलिंपिकचा लोगो आहे. 

टॉमच्या इन्स्टाग्राम हँडलवर गेलात तर तो खरंच किती उत्तम विणकाम करू शकतो हे तुमच्या लक्षात येईल.

संबंधित बातम्या