डान्सिंग डॅड

इरावती बारसोडे
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

ट्रेंडिंग

भारतातल्या कुठल्याही भाषेतला सिनेमा असो, त्यामध्ये गाणी असतातच. त्या गाण्यांवर आपण भारतीय नाचलो तर त्यात विशेष काही नसतं. पण याच गाण्यांवर जेव्हा एक मध्यमवयीन अमेरिकी माणूस नाचू लागतो, तेव्हा चर्चा तर होणारच ना!

रिकी पाँड हा अमेरिकेत राहणारा एक सर्वसामान्य माणूस. चार मुलं, बायको असं कुटुंब. रिकी खरंतर व्यवसायानं ग्राफिक डिझायनर आहे. आता हा रिकी भारतामध्ये प्रसिद्ध व्हायचं तसं कुठलंही कारण नव्हतं. पण तो फेमस झाला, कारण तो बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करतो आणि त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करतो. रिकीला आता ‘डान्सिंग डॅड’ म्हणून ओळखलं जातंय. 

रिकीच्या मुलांनी त्याला मागच्या वर्षी टिकटॉकवर अकाउंट सुरू करून दिलं. टिकटॉकवरच त्यानं बॉलिवूडच्या गाण्यावर व्हिडिओ करून पोस्ट केला. त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मग त्याला कोणीतरी इन्स्टाग्रामकडे वळण्याचा सल्ला दिला. 

रिकीचे व्हिडिओ फार मोठे नसतात. पण बॉलिवूडमधल्या अनेक गाजलेल्या गाण्यांवर त्यानं व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ‘शोले’मधलं ‘मेहबुबा मेहबुबा’, ‘लगान’मधलं ‘किसलिये राधा जले’, अशा गाण्यांबरोबरच ‘नवराई माझी लाडाची गं’, ‘लुंगी डान्स’, अशा अनेक लोकप्रिय असलेल्या गाण्यांवर त्यानं ठेका धरला आहे. त्याशिवाय ‘ओले ओले’, ‘आजा माही वे’, ‘दरिया किनारे एक बंगलो गं पोरी’, ‘आया हे राजा लोगो रे लोगो’, ‘चाक धूम धूम’ अशा असंख्य गाण्यांवर रिकीनं डान्सचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. 

एवढंच नव्हे तर मराठीतल्या ‘शांताबाई’ या अति फेमस गाण्यावरही तो नाचला आहे. ‘कोंबडी पळाली’, आनंद शिंदेचं ‘उडू उडू झालंया’, ‘तुझ्या प्रीतीचा विंचू मला चावला’, ‘नवरी नटली अगं बाई सुपारी फुटली’, ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना’, मुळशी पॅटर्ममधलं ‘आरारारा आरारा..’ याही गाण्यांवर त्यानं डान्स केला आहे.  

‘फादर्स डे’ला ‘पापा केहते है’ या गाण्यावर रिकीनं डान्स केला होता. तर, ‘मदर्स डे’ला ‘ये बंधन तो प्यार का बंधन है’वर! होळीच्या दिवशी ‘रंग बरसे’ आणि आत्ताच होऊन गेलेल्या स्वातंत्र्यदिनी ‘चक दे इंडिया’वरही तो नाचला आहे. कधी तो स्वतःच गाणी शोधतो, तर कधी लोक त्याला गाणी सुचवतात.

या डान्सिंग डॅडची मुलं ऑड्री आणि डालिनसुद्धा अधूनमधून बाबांना साथ देत असतात. डान्सचा व्हिडिओ 

घराबाहेर शूट केलेला असेल तर व्हिडिओमध्ये दोन डॉबरमन कुत्रीसुद्धा इकडून तिकडे पळतानाही दिसतात. त्यानं बायकोबरोबरही एक-दोन व्हिडिओ केले आहेत. रिकी अधूनमधून इन्स्टा लाइव्ह करून आपल्या फॅन्सबरोबर गप्पाही मारतो. त्याची मुलंही त्या गप्पांमध्ये सहभागी होतात.

गाण्यातले शब्द कळत नसले, तरी ठेका पकडून रिकी डान्स करत असतो. गाणं म्हणणारी स्त्री असो अथवा पुरुष, रिकी तेवढ्याच उत्साहानं नाचताना दिसतो. डान्समधली प्रत्येक स्टेप तो मनापासून एन्जॉय करतो, त्यामुळं आपल्यालाही बघताना मजा येते.

संबंधित बातम्या