कुंभकर्णाची लोकप्रियता

इरावती बारसोडे
सोमवार, 20 एप्रिल 2020

ट्रेंडिंग
 

सध्या घरी बसून बसून लोक कंटाळले आहेत. इंटरनेटवर तरी किती टाइमपास करणार ना! टीव्हीवरही बघायला काही नसते. जवळपास सगळ्याच चॅनल्सवर सगळ्या मालिकांचे रिपीट टेलिकास्ट सुरू आहेत. पण लोकांना दूरदर्शनवर रिपीट टेलिकास्ट सुरू असलेल्या मालिकांमध्येच जास्त रस आहे, खास करून रामायण आणि महाभारत! काही पहिल्यांदाच या मालिका बघत आहेत, तर काही पूर्वी बघितलेल्या असूनसुद्धा पुन्हा आवर्जून बघत आहेत आणि नव्याने त्यांच्या प्रेमात पडत आहेत.

नुसत्या मालिकाच नाही, तर त्यातल्या व्यक्तिरेखाही लोकांना फारच आवडत आहेत. हा सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे या व्यक्तिरेखांना घेऊन नेटिझन्स नवनवे मीम्स तयार करत आहेत. रामायणातली ‘कुंभकर्ण’ ही अशीच विशेष लोकप्रिय झालेली व्यक्तिरेखा. सोमवारी म्हणजेच १३ तारखेला कुंभकर्णाची मालिकेमध्ये एन्ट्री झाली आणि लोक या झोपाळू राक्षसाच्या प्रेमातच पडले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. आत्तापर्यंत लोकांना माहीत असलेला कुंभकर्ण वेगळा होता आणि दूरदर्शनच्या पडद्यावर दिसलेला कुंभकर्ण वेगळा होता. 

 कुंभकर्णाच्या झोपाळू स्वभावारून मीम्स तयार झाले आणि व्हायरलही झाले आहेत. पण त्याच वेळी कुंभकर्णाचा समंजस स्वभाव आणि काहीही झाले, तरी आपल्या भावाबरोबर एकनिष्ट राहण्याची वृत्ती यामुळे लोकांना कुंभकर्ण जास्त आवडला. रामायणामध्ये कुंभकर्णाची भूमिका नलिन दवे यांनी केली होती. या आठवड्याच्या सुरुवातीलाच मालिकेमध्ये कुंभकर्णाची एन्ट्री झाली आणि सुरू झाला मीम्स आणि ट्विट्सचा पाऊस. #Kumbhkaran हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये होता. 

काहींनी म्हटले, ‘माझ्या पालकांनी कुंभकर्ण बघितल्या बघितल्या, अरे हा तर तूच,’ अशी प्रतिक्रिया दिली. लॉकडाऊनचे पालन कसे करायचे हे कुंभकर्णाकडून शिका, असा सल्लाही एका ट्विटर युजरने दिला. तर, आणखी एकाची अशी इच्छा आहे, की भोवतालची सर्व नकारात्मकता विसरून त्याला कुंभकर्णासारखी शांत झोप मिळावी. एका ट्विटर युजरच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला कुंभकर्णासारखी पुरेशी झोप मिळाली की तुमचे डोकेही काम करते. तर, कुंभकर्ण झोपेतून उठल्यावर ज्या पद्धतीने खातो, तसेच मी लॉकडाऊन संपल्यानंतर फास्ट फूड खाणार आहे, असे एका युजरने म्हटले आहे. तर काहींच्या मते, सद्यःस्थितीमध्ये आपणा सर्वांनाच कुंभकर्ण होऊन घरी बसण्याची गरज आहे. एका ट्विटर युजरने तर सगळ्या झोपेच्या गोळ्यांचे नाव बदलून कुंभकर्ण गोळ्या असे करावे, अशी मागणी केली आहे. थॅनोस आणि जोकर या दोन हॉलिवूडपटांमधील अतिशय गाजलेल्या आणि लोकप्रिय निगेटिव्ह व्यक्तिरेखा आहेत. एका मीममध्ये ट्विटरवर थॅनोस म्हणतो आहे, की मी सगळ्यात लोकप्रिय आहे, जोकरचेही तेच म्हणणे आहे. त्यावर कुंभकर्ण कॉमेंट करून म्हणतो, ‘हा हा... ही आजकालची मुलं!’ कुंभकर्णाच्या दृष्टीने हे दोघे लोकप्रियतेच्या बाबतीत त्याच्या अध्यात-मध्यातही नाहीत. 

 अनेकांना त्याची व्यक्तिरेखा बघून आश्चर्यही वाटले. कुंभकर्ण म्हणजे नुसता खाणारा आणि झोपणारा अशी अपेक्षा केली होती, पण तसा तो अजिबातच नव्हता. मालिकेमधला कुंभकर्ण आपल्या भावाला म्हणजे रावणाला, ‘तू जे करतो आहेस ते योग्य नाही,’ हे समजावण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हे संवाद अनेकांना खूप भावले आहेत. ‘कुंभकर्णाला आपण फक्त खाणे आणि झोपणे यासाठीच ओळखतो. पण त्याने रावणाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला माहीत होते की मरणार आहे, पण तरीही तो आपल्या भावासाठी लढायला गेला. ही खूपच छान व्यक्तिरेखा आहे,’ अशा आशयाचे अनेक ट्विट्स पाहायला मिळत होते. काहींना ही व्यक्तिरेखा प्रेरणादायीही वाटली. एका युजरने म्हटले आहे, तुम्ही कुंभकर्णाला त्याच्या आळशीपणावरून ट्रोल करू शकता. पण तो रावणाशी जे बोलला त्याने आपले हृदय जिंकले आहे, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. अनेकांच्या मनात कुंभकर्णाविषयी आदर निर्माण झाला आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे, ‘कुंभकर्ण ही रामायणामधील सर्वात आवडती व्यक्तिरेखा आहे. कारण त्याचे म्हणणे राजकीयदृष्ट्या बरोबर आहे, त्याच्याकडे खिलाडू वृत्ती आहे, तो भावनिक आहे, शहाणा आहे आणि क्युट आहे.’

 रामानंद सागर लिखित आणि दिग्दर्शित रामायण मालिका दूरदर्शनवर १९८७-८८ मध्ये प्रसारित झाली होती. या मालिकेच्या निमित्ताने लोक नव्याने पुराणकथांचा आस्वाद घेऊ लागले आहेत.

संबंधित बातम्या