स्मायलिंग सोनू

इरावती बारसोडे
सोमवार, 9 मार्च 2020

ट्रेंडिंग
 

तुमच्या एका छानशा स्माइलमुळे तुम्ही ‘सोशल मीडिया सेन्सेशन’ होऊ शकता. एक फूड डिलिव्हरी करणारा मुलगाही असाच त्याच्या स्माइलमुळे फेमस झाला आहे. 

झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडिओ टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला होता. दिल्ली डीसी रायडर या व्ह्‍लॉगरने (व्हिडिओ ब्लॉगर) हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो अतिशय हसतमुख चेहऱ्याने एका माणसाशी त्याच्या नोकरीबद्दल बोलताना दिसतो. तो त्याचा कामाचा अनुभव, त्याला दिवसाला मिळणारा ३५० रुपये पगार आणि इन्सेंटिव्ह याबद्दल सांगतो. ''पैसा और खाना टाइम पे मिलता है'' म्हणतो. या संपूर्ण संभाषणात त्याचे चेहऱ्यावरचे हसू अजिबात कमी होत नाही. त्याच्या या स्माइलमुळेच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. नंतर तो ट्विटरवरही फिरू लागला... आणि हा डिलिव्हरी बॉय ‘इंटरनेट सेन्सेशन’ झाला. त्याला आता लोक ‘हॅपी रायडर’ म्हणून ओळखू लागले आहेत. या मुलाचे नाव सोनू असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

टिकटॉकवर ४० लाखाहून अधिक वेळा व्हिडिओ पाहिला गेला आहे. तर, ट्विटरवर ‘झोमॅटो रायडर’ हा हॅशटॅगही ट्रेंडिंग होता. या व्हायरल ट्रेंडनंतर शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) झोमॅटोने सोशल मीडियावरील सर्व डिस्प्ले फोटोज बदलले आहेत. झोमॅटोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर डिस्प्ले पिक्चर (डीपी) म्हणून सोनूचाच फोटो लावला आहे. ट्विटरवर फोटो बदलताना ‘This is now a happy rider fan account,’ असे ट्विटही केले आहे. तर, इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत म्हटले आहे, ‘reasons to smile today: it''s Friday, it''s the end of Feb, it''s salary day, our display picture.’

या व्हिडिओनंतर व्हिडिओमधील सोनूच्या हसऱ्या चेहऱ्याचा एक स्क्रीन शॉटही व्हायरल झाला होता, जो झॉमॅटोने डीपी म्हणून वापरला आहे. या फोटोचे अनेक भन्नाट मीम्सही तयार झाले. एवढेच नव्हे तर पोलिसही या फोटोचा उपयोग ट्विटरवर हेल्मेटविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी करत आहेत. पुणे पोलिस म्हणतात, ‘पोलिस दिसल्यावर आपण हेल्मेट विसरलो नाहीये हे लक्षात येताच तुमच्या चेहऱ्यावर येणारे स्मितहास्य.’ तर, महाराष्ट्र पोलिस म्हणतात, ‘हे हसू तेव्हाच चेहऱ्यावर उमटते, जेव्हा तुम्हाला माहीत असते की तुम्ही हेल्मेट न घातलेल्या लोकांपेक्षा मोठे सेलिब्रिटी आहात.’ गुरुग्राम ट्रॅफिक पोलिसांनीही हॅपी रायडरचा फोटो शेअर करत ट्विट केले आहे, ‘झोमॅटो रायडरकडून शिकण्यासारख्या गोष्टी - १. आयुष्यात कितीही आव्हाने आली तरी हसत राहा. २. हेल्मेट घालणे आवश्‍यक आहे.’ 

लेज् इंडियाच्या ट्विटर हँडलवरही हा फोटो शेअर झाला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘खरेच ‘डिलिव्हरींग स्माइल्स.’ 'स्माइल देके देखो अँड दिल जितो।’ ट्विटरवरही अनेकांनी मजेशीर कॉमेंट्स केल्या आहेत. अनदर इन्ट्रोव्हर्ट नावाच्या ट्विटर युजरने म्हटले आहे, की या मुलाने त्याच्या गालांमध्ये रसगुल्ले लपवले आहेत. काहींनी त्याचा फोटो तुमच्या डीपीला लावून काही उपयोग नाही, त्याचा पगार वाढवा, अशी सूचना झोमॅटोला केली आहे. 
 या सगळ्या घडामोडींनंतर ज्या व्ह्‍लॉगरने हा व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याने सोनूला पुन्हा शोधून काढले आणि त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या. तो व्हिडिओही पोस्ट केला. या दुसऱ्या व्हिडिओमध्येही सोनू हसतोच आहे. व्हिडिओमध्ये व्ह्‍लॉगरने त्याला विचारले, ‘आता तुझे खूप फॅन्स आहेत, ट्विटर का वापरत नाहीस.’ तर, सोनू म्हणतो त्याला येत नाही. त्यावर व्ह्‍लॉगरने त्याला मी शिकवतो असे म्हटले आहे. बघू आता स्मायलिंग सोनू ट्विटर वापरायला शिकतो का... 

संबंधित बातम्या