पारंपरिक पादत्राणे 

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

ट्रेंड्‌स
फॅशनच्या दुनियेत फक्त कपडे किंवा ज्वेलरी जास्त भाव खात नाही तर त्या बरोबरीने पादत्राणेदेखील महत्त्वाची ठरतात. सध्या बाजारात वेस्टर्न कपड्यांना मॅच होतील अशी पादत्राणे आहेतच, पण त्याच जोडीने शुद्ध पारंपरिक आणि अस्सल देखण्या अशा पादत्राणांची फॅशनसुद्धा आली आहेत. मोजडी, चप्पल यासारखी पादत्राणे सुई-दोऱ्याने शिवल्या जातात आणि त्यावरचे नक्षीकाम तर वाखाणण्याजोगेच असते. कोल्हापुरी चप्पल आणि राजपूत जुतीदेखील वैविध्यपूर्ण दिसतात. कोणत्याही कुर्ती किंवा पारंपरिक पेहरावावर ही पादत्राणे उठून दिसतात.

दिवाळी, नवरात्र किंवा ट्रॅडिशनल डेला सहज साधी, मॉडर्न किंवा पारंपरिक चप्पल सहज सूट होते. आजकाल मुली प्रत्येक गोष्ट सूट होते, की नाही हे पाहतात, पण ही चप्पल खरेदी करताना असा कुठलाच विचार करावा लागणार नाही.

      कोल्हापुरी चप्पलेत कुरुंदवाडी, कोल्हापुरी कापशी, टिपू सुलतान, शाहू, मेहरबाँ, वेणीवाली, गोंडे यासारख्या प्रकार उठून दिसतात. सध्या कोल्हापुरी विविध शॉपिंग वेबसाइटवर उपलब्ध असून प्युअर लेदर, राजस्थानी हातकाम, कोल्हापुरी लेदर या सेमी हिल, फ्लॅट्‌समध्ये उपलब्ध आहेत. ही पादत्राणे आठशे ते नऊशे रुपयांपासून मिळतात. 

      स्त्री-पुरुष दोघांसाठी यंदा लेदरमध्ये बरेच पर्याय आहेत. मुलांसाठी लेदरच्या राजपूत स्टाइल स्लिपरदेखील आहेत. यात ब्राऊन लेदर, यल्लो लेदर ट्रेडमध्ये आहे. नामांकित ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळावर कोल्हापुरी स्लिपर व महाराजा चप्पल मिळेल.

      पारंपरिक पादत्राणांमध्ये कापशी चप्पलमध्ये लेसिंग, सिंगल तळीमध्ये, घुंगरूमध्ये, ब्रेडेडमध्ये आणि वेणीमध्ये अशा स्वरूपात तुम्हाला खास कापशी चप्पल मिळेल. यंदा ऑथेंटिक स्टाइल ट्रेडमध्ये आहे. त्यामुळे हाताने केलेली कलाकुसर केलेल्या पादत्राण्यांना बाजारात मागणी आहे. 

      वूमन्स वेअरसाठी बटूक, राजस्थानी,कोल्हापुरी, व्ही शेप, कोल्हापुरी लेदर, शाहू कोल्हापुरी, गोटा चप्पल ट्रेडमध्ये आहेत. पेशवाई स्टाइल जूट्टी चप्पलही तुम्हाला एक हजार रुपयांपासून मिळते. ही पादत्राणे अगदी हलकीफुलकी अस्सल पारंपरिक असल्याने यापैकी एखादा प्रकार तुमच्या कलेक्‍शनमध्ये जरूर ठेवावे.
 

संबंधित बातम्या