उलट्या जीन्सची क्रेझ

समृद्धी धायगुडे
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

ट्रेंड्‌स
 

हल्ली कोणत्या गोष्टींची फॅशन येईल याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. कधी साधा मेकअप, कधी हेअरस्टाइल, तर कधी कपड्यांच्या डिझाईनमध्ये ही झपाट्याने बदल झालेला पाहायला मिळतो. सध्या एका जीन्सच्या नव्या प्रकाराने फॅशन विश्वात खळबळ उडवून दिली आहे. ती म्हणजे उलटी जीन्स. या जीन्स नावाप्रमाणेच दिसताना उलट्या दिसतात. या अजबगजब ट्रेंडविषयी 
 
      तुम्ही आतापर्यंत डेनिमच्या सरळ जीन्स वापरल्या असतील. सरळ म्हणजे ज्या जीन्सचे पॉकेट आणि बटणे ही वरच्या बाजूला असतात. पण बाजारात जी नवी जीन्स पाहिली, तर तुमच्या लक्षात येईल, की ती पूर्णपणे उलटी आहे. या जीन्सचा ट्रेंड पहिल्यांदा न्यूयॉर्कमध्ये सुरू झाला. 

      बाजारात आलेल्या या जीन्सला पॉकेट, झिप आणि इतरही गोष्टी कमरेवर नाही, तर गुडघ्याजवळ डिझाईन केलेल्या दिसतात. बाजारातील या नव्या जीन्सबाबत  फॅशन क्रेझी लोकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. तर एकीकडे काही डिझायनर्स या जीन्सवर टीकाही करताना दिसत आहेत. 

      न्यूयॉर्कच्या ‘सीआयई डेनिम ब्रॅण्ड’ने हाय राइज जीन्स डिझाईन केली आहे. ही उलट्या डिझाईनची आहे. या जीन्सचे नाव ‘नॅन्सी’ असे ठेवण्यात आले. या जीन्सचे पॉकेट आणि झिप तुमच्या गुडघ्यावर येतात. या डिझाईनचे शॉर्टसही बाजारात आल्या आहेत. 

      या उलट्या जीन्सची किंमत ऐकूनच तुम्ही चक्रावणार आहात. न्यूयॉर्कमध्ये ही जीन्स ३८५ डॉलर म्हणजे २६ हजार रुपये इतकी आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे या जीन्सची किंमत वाढून आता पस्तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत गेली आहे. आता तुम्ही म्हणाल एवढे पैसे खर्च करून जर उलटी जीन्स वापरायची, त्यापेक्षा त्याच किमतीत सरळ डिझाइन्सच्या शंभर जीन्स येतील. हा शेवटी ज्याच्या त्याचा प्रश्न आहे की फॅशनवर किती पैसे खर्च करायचे. तुम्हालाही याविषयी उत्सुकता असल्यास ऑनलाइन शोध घेऊ शकता.  
 

संबंधित बातम्या