झुंज विधवांच्या सन्मानासाठी

संपत मोरे
सोमवार, 1 जुलै 2019

उपक्रम
नवरा मरण पावल्यावर आपण जगायचे कशाला, म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणदेशातील एका झुंजार ताईंची ही कथा आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा माणदेशी बाणा त्यांनी जपला आहे. स्वतःच्या दुःखावर त्यांनी मात केलीच, स्वतःचे अश्रू त्यांनी पुसलेच, पण इतर विधवा बायकांचे अश्रूही त्या पुसत आहेत.

‘नवऱ्याच्या प्रेतावर माझा चुडा फोडला. माझे मंगळसूत्र तोडून काढले. चुडा लग्नाच्या अगोदर दोन दिवस भरला होता. मंगळसूत्र घालून पंचवीस दिवस झाले होते. त्यांनी मंगळसूत्र गळ्यात घातले, तेव्हा मी शहारून गेलेले. लग्नानंतर जेव्हा मी आरशासमोर उभी रहायचे, तेव्हा मला कितीतरी बरे वाटत होते. आज माझा गळा मोकळा झालेला. हात रिकामे झालेले. आता पांढरे झालेले कपाळ घेऊन आयुष्य काढायचे होते. त्या दिवशी आणि नंतर नुसती रडत होते. काय करावे समजत नव्हते. समोर अंधार होता.’ विधवांनी सौभाग्य अलंकार घालावेत, म्हणून चळवळ उभी केलेल्या ‘विधवा महिला विकास प्रतिष्ठान’ या पुनर्वसन केंद्राच्या लता बोराडे सांगत होत्या. 

लता बोराडे यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यातील आवळाई. सध्या त्या तिथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका आहेत. अकरावीच्या वर्गात असताना त्यांचे लग्न जवळच्याच शेरेवाडी गावातील बाळकृष्ण बोराडे यांच्याशी झाले. त्यांचे पती मुंबईला असायचे. त्यामुळे त्या पतीसोबत मुंबईला गेल्या. सुखाचा संसार सुरू झाला. एका घरातील लेक दुसऱ्या घरची सून होऊन आलेली. नव्या घरात ती रुळत होती. आता कुठे एका नव्या जीवनाला सुरुवात झाली होती. मुंबईत गावाकडच्या आठवणी यायच्या. बालपण आठवायचे. पण आता गाव दूर होते, आईवडील दूर होते. नव्या घरात नवी नाती तयार झालेली. ओळखीपाळखी होत होत्या. अवघ्या १९ वर्षांचे वय असलेली नवी नवरी स्वप्न बघत त्या घरात नांदत होती. 

असेच लग्नाचे चोवीस दिवस पार पडले. लग्नाचा पंचविसावा दिवस उगवला, पण हा दिवस लता यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणारा ठरला. त्यांचा नवरा नेहमीप्रमाणे बाहेर पडला. पण तो परत आलाच नाही. आली ती त्याच्या मरणाची बातमी. त्या बातमीने घरातील सगळे कोसळून गेले. लतांसाठी हा मोठा धक्का होता. ज्याच्यासोबत आयुष्याची सुंदर स्वप्ने रंगवली होती, तो जोडीदार अचानक गेलेला. नुसते रडत बसणे वाट्याला आले. रडण्याशिवाय दुसरे काहीच हातात नव्हते. नवऱ्याच्या प्रेतावर त्यांचा हातातला हिरवा चुडा फोडला. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. कपाळीचे कुंकू केव्हाच पुसले गेले होते. आता पुढे काय होणार हे त्यांनाच माहिती नव्हते. सुखाचे दिवस गेले होते आणि दुःखाचे दिवस सुरू झाले होते. आता त्या घरात फक्त त्यांनाच दुःख होते, कारण बाकीचे सगळे आपापल्या कामात रुळलेले. आता घरात चर्चा सुरू झाली होती. लग्नानंतर बाळकृष्ण मरण पावला म्हणजे नव्या नवरीचा पायगुण चांगला नाही. ती पांढऱ्या पायाची आहे. सारखे टोमणे मारले जाऊ लागले आणि टोमणे पचवण्याइतकी समज त्या कोवळ्या पोरीत नव्हती. अतिशय कमी आयुष्य जगलेली पोरगी. शाळा शिकत असतानाच लग्नाच्या बोहल्यावर चढलेली. मग टोमणे सहन करण्यापेक्षा मेलेले बरे म्हणून तसाही प्रयत्न करून बघितला.

त्या सांगतात, ‘नवरा मेला आता आपण जगून काही उपयोग नाही. कशाला जगायचे? असे प्रश्‍न मनाला पडत होते. मग मरायचा प्रयत्न केला. पण मरताही आले नाही. असे एकाकी आयुष्य जगताना एक दिवस मनात विचार आला. माझ्या सारख्या किती महिला असे अपमानाचे जीवन जगत असतील. त्यांच्याही वाट्याला असे प्रसंग येत असतील. त्या कशा सहन करत असतील? मला शुभकार्यात जसे नाकारले जाते, तसे त्यांनाही नाकारले जात असेल. विधवांच्या वाट्याला हे जगणे का? शुभकार्यात त्यांनी धुतलेल्या भांड्यात जेवायला चालते. पण त्यांना जेवण तयार करू दिले जात नाही. विधवा झाल्या की बायकांमध्ये असा काय बदल होतो, ज्यामुळे त्यांना शुभकार्यात नाकारले जाते? त्यांना अशुभ मानले जाते. हे कोठून आले? कोणी केला हा कायदा? एखादी विधवा तरुणी आली की तिचे पांढरे कपाळ, मोकळा हात आणि रिकामा गळा पाहून खूप त्रास व्हायचा. मग असे वाटायला लागले, की आपण काहीतरी करावे. किती दिवस रडत बसायचे?’ 

दरम्यानच्या काळात त्या माहेरी गेल्या. अकरावी पास झाल्या. पुन्हा बारावी केली, डीएड केले पण लगेच नोकरी मिळाली नाही. मग गावात पिठाची चक्की सुरू केली. आता त्यांच्या रडण्याचा काळ संपला होता. कारण आता लढायचे ठरवले होते. त्याचाच भाग म्हणून त्यांनी स्वतः कुंकू लावायला सुरुवात केली. हिरव्या बांगड्या घातल्या. गळ्यात मंगळसूत्र घातले. मात्र, त्यांच्या घरातील लोकांना हे आवडले नाही. खुद्द बहिणीने त्यांना विरोध केला. नातेवाईक चर्चा करत होते. गावातील लोकसुद्धा दबक्‍या आवाजात बोलत होते. त्या समोरून आल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारे हावभाव त्यांना जाणवत होते. लोक परंपरा मानणारे असल्यामुळे परंपरा तोडणारी बाई समोर दिसल्यावर त्यांनाही आश्‍चर्य वाटत होते. त्यांना बोलून काहीही उपयोग नव्हता. आता लता बोराडेंना अनेक विधवा बायकांना त्यांच्यासारखे करायचे होते. त्या कामाला लागल्या. प्रबोधन करू लागल्या. एक दिवस त्यांनी सांगलीत विधवा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेतला. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात विधवांना सुवासिनी भगिनींनी कुंकू लावले. यावेळी भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनीही त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांचे बळ आणखी वाढले. ‘विधवा होणे आपत्ती मानली जाते. त्यामुळे विधवेला आपण कुंकू लावले तर आपल्याही वाट्याला विधवापण येईल, अशी भीती सुवासिनींना वाटते. अशी भीती लहानपणापासून मनात असते. त्यामुळेच अनेक स्त्रियांना कणव येत असूनही त्या धाडस करत नव्हत्या. पण त्यांच्या मनातील भीती कमी करण्याचे काम मी केले. अनेक गावांत आज असे कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यातून कुंकू लावणाऱ्या आणि कुंकू लावून घेणाऱ्यांमधला संवाद वाढतोय,’ असे त्या सांगतात. 

‘आज मी जेव्हा सुवासिनींना कुंकू लावायला सांगते, तेव्हा त्या तयार होतात याचे मला खूप कौतुक वाटते. कारण जर सुवासिनींनी पाठिंबा दिला नसता, तर आम्ही ही चळवळ गतिमान करू शकलो नसतो,’ असे म्हणून विधवा सन्मान चळवळीच्या यशात असलेल्या सुवासिनी महिलांच्या सहभागाची त्या नोंद घेतात. 

सध्या बोराडे यांच्या कामाला मर्यादा आहेत. त्यांचे काम फक्त सांगली जिल्ह्यात सुरू असून त्याची व्याप्ती वाढावी म्हणून त्या नोकरी सांभाळून प्रयत्न करत आहेत. ‘विधवा म्हणून कोणत्या संकटाला आणि अपमानाला सामोरे जावे लागते याची त्या विधवेलाच जाणीव असते. नवरा गेल्यावर एका क्षणात तिचा दर्जा खालावला जातो. नवरा मेल्यावर तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. विधवाही मनाने सगळे काही स्वीकारतात. तरुणपणी जर वैधव्य आले असेल आणि ती विधवा जर खेड्यात असेल, तर तिचे आयुष्य खूपच खडतर असते. काही गावांत सकाळी सकाळी विधवेचे तोंड बघणेसुद्धा अपशकून मानला जातो. असे जेव्हा घडत असेल, तेव्हा त्या विधवेला काय वाटत असेल? मला विधवांच्या आयुष्यातील अपमान आणि दुःखे कमी करायची आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणायचे आहे,’ अशी इच्छा लता बोराडे यांनी व्यक्त केली. 

नवरा मरण पावल्यावर आपण जगायचे कशाला, म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणदेशातील एका झुंजार ताईंची ही कथा आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा माणदेशी बाणा त्यांनी जपला आहे. स्वतःच्या दुःखावर त्यांनी मात केलीच, स्वतःचे अश्रू त्यांनी पुसलेच, पण इतर बायकांचे अश्रूही त्या पुसत आहेत. विधवेने सौभाग्य अलंकार घातले म्हणून काही आकाश कोसळत नाही किंवा धर्म बुडत नाही, हे त्यांनी सिद्ध केले. लता यांनी आता ‘आम्ही सौभाग्य अलंकार परिधान करणारच, तो आमचा हक्क आहे. पण फक्त अलंकार घालून आमचा पोटाचा प्रश्‍न सुटणार नाही,’ असे म्हणत सरकारकडे विधवांच्या ठोस पुनर्वसनाचा आग्रह धरत चळवळीचा पुढचा टप्पा सुरू केला आहे. त्यांचा लढा सुरूच राहील, पण आता गरज आहे ती हा लढा गावागावांत जाण्याची, त्यांच्या लढ्याचा आवाज बुलंद होण्याची!   

संबंधित बातम्या