स्मार्ट व्हॅक्युम क्लिनर रोबोट

ज्योती बागल
सोमवार, 27 एप्रिल 2020

व्हॉट्‌स न्यू
घरातली रोजची कामे करायला अख्खा दिवस पुरत नाही. त्यात साफसफाईचे काम जास्त वेळखाऊ आणि दमवणारे असते. अशा वेळी व्हॅक्युम क्लिनरची नक्कीच मदत होते. पण त्यातही हा व्हॅक्युम क्लिनर स्मार्ट आणि अगदी माणसांप्रमाणे काम करणारा असेल तर उत्तमच! अशाच एका स्मार्ट व्हॅक्युम क्लिनर रोबोटची थोडक्यात माहिती...

‘शाओमी’ने नुकताच एक स्मार्ट व्हॅक्युम क्लिनर रोबोट भारतात लॉँच केला आहे. हा व्हॅक्युम क्लिनर रोबोट मोबाइल ॲपच्या साहाय्याने कंट्रोल करता येतो. शओमीने त्यांच्या क्राऊडफंडिंग प्रोजेक्टच्या अंतर्गत हा व्हॅक्युम क्लिनर लाँच केला आहे. या व्हॅक्युम रोबोटला ‘एमआय रोबोट व्हॅक्युम-मॉप पी रोबोट’ (Mi Robot Vacuum-Mop P robotic) असे नाव देण्यात आले आहे. 

भारतीय ग्राहकांसाठी खास बाब म्हणजे हा स्मार्ट व्हॅक्युम क्लिनर रोबोट भारतीय घरांचे स्ट्रक्चर डोक्यात ठेवून डिझाईन केला आहे. या व्हॅक्युम क्लिनरमध्ये लेझर डिटेक्ट सिस्टिम दिलेली आहे. तसेच यामध्ये बारा सेंसर दिले आहेत, जे एमआय ॲपला सपोर्ट करतात. या सेंसरमुळे हा व्हॅक्युम क्लिनर भिंतींना, घरातील फार्निचरला धडकण्यापासून, पायऱ्यांवरून खाली पडण्यापासून वाचतो. तसेच याच सेंसरच्या मदतीने हा व्हॅक्युम रोबोट दोन सेंटिमीटर उंच एखाद्या ऑब्जेक्टवर चढूही शकतो.

या रोबोट व्हॅक्युम क्लिनरची किंमत २९,९९९ रुपये आहे. मात्र  लाँचिंग ऑफरमध्ये हा व्हॅक्युम क्लिनर १७,९९९ रुपयांना मिळतो आहे. शिवाय  हा व्हॅक्युम क्लिनर २,९९९ रुपयांच्या ईएमआयवरही खरेदी करता येऊ शकतो. हा रोबोट व्हॅक्युम क्लिनर शाओमीच्या एमआय क्राऊडफंडिंगच्या साइटवरूनही ऑर्डर करता येऊ शकतो. १५ एप्रिलपासून याची विक्री सुरू झाली आहे, मात्र कंपनीने दिलेल्या माहितीनुसार याची शिपिंग १५ सप्टेंबर २०२० नंतर सुरू होणार आहे.  

एमआय रोबोट व्हॅक्युम क्लिनरचे स्पेसिफिकेशन्स पाहिले, तर यामध्ये जपानी एनआयडीइसी ब्रशलेस मोटर वापरली आहे, जिची क्षमता 2,100Pa एवढी आहे. यामध्ये असणाऱ्या नॅव्हिगेशन सिस्टीम (इंटेलिजेंट मॅपिंग अँड रूट प्लॅनिंग)च्या साहाय्याने  हा रोबोट पूर्ण घराचे मॅपिंग करू शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा रोबोट आठ मीटरपर्यंतचा एरिया स्कॅन करतो. हा व्हॅक्युम क्लिनर मल्टिफंक्शनल असून त्यामध्ये वेगवेगळे मोड्स दिलेले आहेत. जसे की, झाडू मारणे, पोछा मारणे. या व्हॅक्युम रोबोटबरोबर टू इन वन अशी एक जॉइंट पाण्याची टाकी दिली असून हिची मदत पोछा मारताना होते. शिवाय एक ५५० एमएलची डस्ट बॅगही दिली आहे. या बॅगचा उपयोग साफसफाई करताना कचरा गोळा करण्यासाठी होतो.  

या स्मार्ट व्हॅक्युम क्लिनरला एमआय होम ॲपला कनेक्ट करून कंट्रोल करता येऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे या स्मार्ट व्हॅक्युम क्लिनरमध्ये तुम्ही साफसफाईचे शेड्युल आणि स्पॉट क्लिनिंगही करू शकता. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही व्हर्च्युअल भिंतही तयार करू शकता. या प्रॉडक्टमध्ये एक क्वॉडकोर कॉर्टेक्स-ए 7 सीपीयू प्रोसेसर दिला आहे. तसेच यामध्ये 3200mAh ची बॅटरी आहे, जी ओटोमॅटिक चार्जिंगला सपोर्ट करते. म्हणजे चार्जिंग करण्यासाठीही हा व्हॅक्युम रोबोट स्वत: चार्जिंग पॉइंटपर्यंत जाऊन चार्जिंग करत असल्याने ग्राहकांना तेही टेन्शन नाही. या स्मार्ट व्हॅक्युम क्लिनर रोबोटला एकदा चार्जिंग केले, की तो १३० मिनिटे रनिंग टाइमिंग देऊ शकतो. यामध्ये  Wi-Fi 802.11 उपलब्ध आहे. या व्हॅक्युम क्लिनरचे वजन ३.६ किलोग्रॅम असून त्याचा आवाज ७० डेसिबल आहे. 

याआधी शाओमीने २०१६ मध्ये हा स्मार्ट व्हॅक्युम क्लिनर चीनमध्ये लाँच केला होता. आता या स्मार्ट व्हॅक्युम क्लिनरचा सामना युरेका फोर्ब्सच्या व्हॅक्युम क्लिनरशी होऊ शकतो. असे इतरही काही कंपन्यांचे स्मार्ट व्हॅक्युम क्लिनर रोबोट ऑनलाइन उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या