एम्ब्रेनचा स्मार्ट प्लग 

ज्योती बागल
सोमवार, 6 जुलै 2020

स्मार्ट होम डिव्हाइसेसमध्ये रोज नव्या गॅजेटचा समावेश होत आहे. मात्र, कोणत्याही डिव्हाइसला किंवा गॅजेटला स्मार्ट करण्यासाठी गरज असते ती एका स्मार्ट प्लगची. असाच आवाजाने कंट्रोल करता येणारा स्मार्ट प्लग नुकताच बाजारात दाखल झाला आहे, त्याविषयी थोडक्यात...

मोबाइल अॅक्सेसरीज निर्माती  भारतीय कंपनी एम्ब्रेनने स्मार्ट होम डिव्हाइसेस  ‘स्मार्ट प्लग्ज  ASP-10 आणि ASP-16’ची नवीन रेंज लाँच  केली आहे. एम्ब्रेनच्या या स्मार्ट प्लग्जना  इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या आवाजाने कुठूनही कंट्रोल करता येऊ शकते. त्यासाठी ‘स्मार्ट लाइफ अॅप’ दिले असून याच्या साहाय्याने हे प्लग्ज कंट्रोल करता येतात. महत्त्वाचे म्हणजे या अॅपमध्ये मल्टिपल डिव्हाइसेस कंट्रोल फीचरदेखील उपलब्ध आहे. एम्ब्रेनच्या या  स्मार्ट प्लग्जमध्ये वाय-फायचा  सपोर्ट दिला आहे. त्याचबरोबर अॅमेझॉन ॲलेक्सा, गुगल असिस्टंट आणि क्लाउड  सर्व्हिस  आयएफटीटीटीचा सपोर्टही दिला असल्याने या प्लग्जची खासियत वाढते. शिवाय या  प्लग्जना  टाइप-डी मेल, थ्री पिन प्लगबरोबर  डिझाइन केले आहे.  व्हॉइस कंट्रोलचा पर्याय असल्याने वापरणे जास्त सोयीचे होणार आहे. उदा. जर या प्लगमध्ये तुमचा फोन चार्जिंगला लावला असेल आणि आता तुम्हाला चार्जिंग बंद करायचे असेल, तर मोबाइलनेच प्लग स्विच ऑफ करू शकता. 

 हल्ली कोणतेही गॅजेट आकर्षक करण्यासाठी ते बऱ्याचदा कॉम्पॅक्ट स्वरूपात डिझाइन केले जाते. एम्ब्रेनचे हे दोन्हीही स्मार्ट प्लग्ज अशाच प्रकारे डिझाइन केले आहेत. स्मार्ट प्लग  ASP-10 चा  वापर छोट्या आणि मिडियम  आकाराच्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेससाठी करता येऊ शकतो. ज्यामध्ये

16 A रेटेड पॉवरसह एअर कंडिशनर आणि मायक्रोव्हेव ओव्हन समाविष्ट असेल. ASP-10 आणि ASP-16 हे दोन्ही प्लग तुम्हाला मोबाइल फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी किती युनिट वीज खर्च झाली तेही सांगतात. त्यामुळे किती चार्जिंगची गरज आहे ते लक्षात येते; शिवाय व्होल्टेज अचानक वाढले किंवा डिव्हाइसमध्ये ओव्हरचार्जिंग झाले, तरी हा स्मार्ट प्लग डिव्हाइसला हानी पोचू देत नाही, सुरक्षित ठेवतो. ASP-10 या प्लगची किंमत ८९९ रुपये आहे, तर ASP-16 ची किंमत १,९९९ रुपये एवढी आहे. या प्लग्जमुळे काही प्रमाणात का होईना विजेची बचत होत असल्याने हे नक्कीच उपयुक्त आहेत. 

 सध्या चिनी वस्तूंविषयी वाढता द्वेष आणि मेड इन इंडियाच्या वस्तूंची वाढती मागणी बघता भारतीय कंपन्यांच्या येणाऱ्या नवीन वस्तूंना चांगले मार्केट मिळेल. ASP-10 आणि ASP-16 हे दोन्ही प्लग अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. याशिवाय ओकटर (Oakter), स्मार्टीफाय (Smarteefi), हेलेआ (Helea) अशा बऱ्याच भारतीय कंपन्यांचे स्मार्ट प्लग्ज  अॅमेझॉनवर पाहायला मिळतील. हे सर्व स्मार्ट प्लग्ज वेगवेगळ्या डिझाइनमध्ये असले, तरी जास्त व्हाइट रंगातच दिसतात. तर मग बघा, तुमच्या होम डिव्हाइसेसला स्मार्ट करणारा प्लग कोणता आहे ते! 

संबंधित बातम्या