सेक्युअरआयचा नवा राऊटर 

ज्योती बागल 
सोमवार, 18 जानेवारी 2021

व्हॉट्‌स न्यू

आपल्या हातातील स्मार्ट गॅजेट्स तेव्हाच उत्तमरीत्या चालू शकतात, जेव्हा त्यांना इंटरनेट कनेक्शनला सहज जोडता येईल. त्यासाठी हवे असते ते चांगल्या प्रतीचे वायफाय राऊटर. भारतातील सीसीटीव्ही निर्माती कंपनी सेक्युअरआय (Secureye)ने आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच इतर गॅजेट्सही बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. त्यांपैकीच एक आहे नुकताच बाजारात दाखल झालेला वायरलेस आउटडोअर वायफाय राऊटर! 

सेक्युअरआयने एका पाठोपाठ एक असे दोन वायफाय राऊटर अलीकडेच लाँच केले आहेत. मागच्याच महिन्यात S-4GMR-4G LTE Mifi राऊटर बाजारात दाखल केला होता. यानंतर आता सेक्युअरआयने S-4GWL 4G LTE हा वायरलेस आउटडोअर राऊटर आणला आहे. सेक्युअरआयच्या S-4GWL 4G LTE या राऊटरमध्ये मीडियाटेकची MT6735WM चिपसेट वापरली आहे. याचा स्पीड १५० एमबीपीएस असून एकावेळी दहा डिव्हाइसेसना कनेक्ट करू शकतो. या राऊटरची रेंज २० मीटरपर्यंत आहे. हा राऊटर वायरलेस असला तरीही याला लॅन आणि वायरलेस अशा दोन्ही प्रकारे वापरता येऊ शकते. तसेच या राऊटरमध्ये एक नॅनो सिम कार्ड स्लॉटही दिला आहे. 
   
सेक्युअरआयने हा राऊटर खासकरून आउटडोअरसाठी डिझाईन केला असून तो पावसातही खराब होणार नाही. याची फ्रिक्वेन्सी 2.4GHz असून ऑपरेट करण्यासाठी 12V ची गरज आहे. हा राऊटर ०-४० डिग्री तापमानात वापरता येऊ शकतो. याचा डाऊनलोडिंग स्पीड १५० एमबीपीएस, तर अपलोडिंग स्पीड ५० एमबीपीएस एवढा आहे. या राऊटरची किंमत २,९९९ रुपये आहे.    

सेक्युअरआयने मागच्या महिन्यात S-4GMR-4G LTE Mifi नावाने एक राऊटर लाँच केला होता. यामध्ये सिंगल सिमचा सपोर्ट दिला आहे. या राऊटरलाही एकाच वेळी दहा डिव्हाइसेसना कनेक्ट करता येते. हा राऊटर खासकरून 4G LTE नेटवर्कसाठी डिझाईन केला आहे. यामध्ये २१०० एमएएचची लिथियम आयन बॅटरी दिली आहे. मात्र, बॅटरी बॅकअपबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच या राऊटरला 32GB च्या मेमरी कार्डचा सपोर्टही दिला असून याचीदेखील किंमत २,९९९ रुपये एवढीच आहे.

संबंधित बातम्या