पॉकेट स्मार्टफोन फोटोप्रिंटर

ज्योती बागल
सोमवार, 15 मार्च 2021

व्हॉट्‌स न्यू

फुजिफिल्म (Fujifilm) ही कॅमेरा आणि प्रिंटिंग गॅजेट्स तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक मोठी कंपनी आहे. अलीकडेच फुजिफिल्म्सने ‘Fujifilm Instax Mini Link’ हा पॉकेट स्मार्टफोन फोटोप्रिंटर लाँच केला आहे. अतिशय कॉम्पॅक्ट स्वरूपात डिझाईन केलेल्या या फोटोप्रिंटरविषयी थोडक्यात... 

फुजिफिल्म इन्स्टॅक्स मिनी लिंक स्मार्टफोन प्रिंटर हा एक फोटोप्रिंटर असून हे गॅजेट खास करून मोबाईल युजर्ससाठी डिझाईन केले आहे. या फोटोप्रिंटरमुळे मोबाईलमध्ये क्लिक केलेले फोटो ब्लूटूथच्या माध्यमातून लगेचच कलर प्रिंट करता येऊ शकतात. या फोटो प्रिंटची साईज 3x5 cm आहे. या प्रिंटरला ॲक्टिव्हेट करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरमधून instax mini Link ॲप डाउनलोड करावे लागेल. प्रिंटर मोबाईलमधील या ॲपला कनेक्ट केल्यानंतर फोनमधील फोटो प्रिंट करता येतात. या ॲपबरोबर बऱ्याच प्रकारच्या फन फ्रेम, इफेक्ट, १४ प्रकारचे कोलाज आणि अजून काही  एडिटिंग टूल्सदेखील उपलब्ध आहेत. युजर्स फोटो प्रिंट करण्यापूर्वी त्या फोटोला त्यांच्या आवडीचे इफेक्ट देऊ शकतात. 

या स्मार्टफोन प्रिंटरला चार्ज करणे अगदी सोपे आहे. या फोटोप्रिंटरमध्ये इनबिल्ट बॅटरी दिली आहे. ही बॅटरी चार्ज करून या प्रिंटरचा वापर करता येतो. मात्र, या प्रिंटरसाठी युजर्सना स्वतंत्र फिल्म रीळ खरेदी करावा लागणार आहे. यासाठी लागणारी फिल्म रीळे बाजारात उपलब्ध आहेत. रीळाची किंमत ९९९ रुपये असून त्यामध्ये २० फिल्म्स असतात. रु. ५७२ किमतीचा १० फिल्म्स असणारा पॅकही बाजारात उपलब्ध आहे. फिल्म रीळ एकदा प्रिंटरमध्ये घातल्यानंतर पूर्ण संपल्याशिवाय प्रिंटर उघडता येत नाही.   

या छोट्याशा फोटोप्रिंटरची किंमत ८,६९० रुपये एवढी आहेत. याचे वजन २०९ ग्रॅम आहे. या स्मार्टफोन प्रिंटरने फोटो प्रिंट करताना अधिक वेळही लागत नाही आणि फोटोही चांगला आणि स्पष्ट प्रिंट होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या प्रिंटरचा उपयोग ट्रॅव्हलर, स्टुडंट यांना नक्कीच होऊ शकतो.

संबंधित बातम्या