हवा शुद्ध करणारा सीलिंग फॅन

ज्योती बागल 
सोमवार, 19 एप्रिल 2021

व्हॉट्‌स न्यू

उन्हाळा असो किंवा हिवाळा; हल्ली बाराही महिने घरात फॅनची, एसीची आवश्यकता असते. कारण पृथ्वीच्या एकूण तापमानातच वाढ झाली आहे, शिवाय वायुप्रदूषणाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शुद्ध, स्वच्छ हवा मिळवण्याकडे सर्वांचा कल असतो. मात्र शुद्ध हवेसाठी प्रत्येकवेळी निसर्गाच्या सान्निध्यात जाणे शक्य नाही. अशावेळी आपण राहतो त्या ठिकाणची हवा स्वच्छ करून वापरणेच सोयीचे आहे. हॅवेल्सने नुकताच बाजारात आणलेला ‘एअर प्युरिफायर सीलिंग फॅन’ यासाठी फायदेशीर ठरू शकतो.    

इलेक्ट्रिक गॅजेट्सकरिता प्रसिद्ध असणाऱ्या हॅवेल्स (Havells) इंडिया लिमिटेड या भारतीय कंपनीने पहिला ‘एअर प्युरिफायर सीलिंग फॅन’ नुकताच लॉँच केला आहे. अशा प्रकारचा सीलिंग फॅन लॉँच करणारी ही पहिली कंपनी आहे. या ‘स्टेल्थ प्युरो एअर सीलिंग फॅन’मध्ये (Stealth Puro Air ceiling fan) एअर प्युरिफायरच्या तीन स्टेजेस दिल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे हा फॅन PM 2.5 आणि PM 10 प्रदूषकांचे व्हीओसी (VOC) फिल्टर करू शकतो व जवळपास 130 cu. m/hr या रेटने स्वच्छ हवा पुरवतो. या फॅनची किंमत १५ हजार रुपये आहे.

 म्हणजेच हॅवेल्सचा हा सीलिंग फॅन फक्त गार हवा देत नाही, तर ती शुद्ध करण्याचे कामदेखील करतो. त्याचबरोबर या फॅनमध्ये एचइपीए (HEPA) फिल्टर, ॲक्टिव्हेटेड कार्बन आणि प्री-फिल्टर्स दिले आहेत, ज्यांच्या मदतीने हवेतील विषारी पदार्थ शोषले जातात आणि आवश्यक त्या न्यूट्रिअन्टससह ताजी हवा मिळते, असे कंपनीने म्हटले आहे. या सीलिंग फॅनला रिमोट कंट्रोलचाही सपोर्ट दिला असून रिमोटने फॅनचा लाईट आणि एलईडी, एअर प्युरिटी इंडिकेटर इत्यादींना कंट्रोल करता येते. महत्त्वाची बाब म्हणजे ‘हाय एअर डिलिव्हरी’ आणि सायलेंट ऑपरेशन म्हणजेच कमी आवाजाकरिता या फॅनला एरोडायनॅमिक ब्लेड वापरले आहेत. 

स्टेल्थ प्यूरो एअर प्युरिफायर आणि फॅनमेट या दोन फॅनसह हॅवेल्सने ‘फॅन पोर्टफोलिओ’अंतर्गत आणखी १६ नवीन फॅन्स बाजारात आणले आहेत. 

हॅवेल्सने सीलिंग फॅनसह एक आणखी खास ‘फॅनमेट’ (Fanmate) हा टेबलफॅनही लॉँच केला आहे. हा सहज कुठेही घेऊन जाता येऊ शकतो. या फॅनमध्येही कार्बन फिल्टर्स दिले आहेत, जे हवेतील दुर्गंधी दूर करून हवा स्वच्छ करतात. तसेच ‘एअर व्हेंट’च्या मदतीने आपल्या गरजेनुसार हवेची दिशा बदलता येते. या फॅनमध्ये तीन तासांचा बॅटरी बॅकअप दिला असून याला यूएसबी केबल किंवा मोबाईलच्या चार्जरने चार्ज करता येते. तसेच हा फॅन लॅपटॉपलाही कनेक्ट करता येतो. शिवाय याला चालवण्यासाठी फॅनमध्ये एक टच पॅडही दिले आहे. या ‘फॅनमेट’ टेबल फॅनची किंमत दोन हजार रुपये आहे.      

संबंधित बातम्या