पहिले ‘स्मार्ट’ वॉशिंग मशीन

ज्योती बागल
मंगळवार, 27 एप्रिल 2021

व्हॉट्‌स न्यू

आज आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससंबंधी संशोधन दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा विविध क्षेत्रांमधील वापरही वाढला आहे. त्यामुळे वस्तू अधिकाधिक स्मार्ट होत आहेत. असाच एक प्रयोग सॅमसंगने त्यांच्या स्मार्ट वॉशिंग मशीनमध्ये केला आहे. चला तर मग आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सपोर्ट असलेल्या या वॉशिंग मशीनबद्दल जाणून घेऊ... 

सॅमसंगने भारतातील पहिले ‘स्मार्ट’ वॉशिंग मशीन लाँच केले आहे. या वॉशिंग मशीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसह (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI)) गुगल आणि ॲलेक्साचाही सपोर्ट दिला आहे. यामध्ये हिंदी आणि इंग्रजी हे दोन्ही युजर इंटरफेस दिले आहेत. फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशीनचे हे लाइनअप पूर्णपणे भारतीयांसाठी तयार केले आहे. डिजिटल भारत अभियानास सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सॅमसंगने हे प्रॉडक्ट बाजारात आणले आहे.  

या स्मार्ट वॉशिंग मशीनमध्ये सॅमसंगने इकोबॅबल आणि क्विक ड्राइव्ह तंत्रज्ञान वापर केला आहे, ज्यामुळे कपड्यांची अधिक काळजी घेतली जाते; शिवाय वेळ आणि विजेची बचतही होते. कपडे चांगल्या प्रकारे आणि स्वच्छ धुतले जावेत यासाठी या नवीन मॉडेलमध्ये हायजीन स्टीम तंत्रज्ञान वापरले आहे. हे तंत्रज्ञान कपड्यांमधील धूळ, जंतू आणि विषाणू ९९.९ टक्के नष्ट करण्यास सक्षम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सॅमसंगने एकवीस नवीन मॉडेल्स बाजारात आणली आहेत. या सर्व मॉडेल्समध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सपोर्ट दिला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून युजर्सची कपडे धुण्याची पद्धत समजावून घेऊन लक्षात ठेवली जाते व वारंवार वापरल्या जाणाऱ्या वॉशिंग सायकलची शिफारस केली जाते. हे स्मार्ट इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) एनेबल्ड वॉशिंग मशीन सॅमसंगच्या गॅलेक्सी स्मार्टफोन, सॅमसंग स्मार्ट टीव्ही आणि फॅमिली हब रेफ्रिजरेटरसारख्या स्मार्ट डिव्हाइसेसना कनेक्ट करता येते. तसेच ते गुगल होम आणि ॲलेक्सा या व्हॉइस डिव्हाइसेसनादेखील कनेक्ट करता येते. या वॉशिंग मशीनमध्ये दिलेल्या लाँड्री प्लॅनरच्या माध्यमातून कपडे धुणे कधी थांबवायचे याचे वेळापत्रक करता येते. लाँड्री रेसिपी युजरद्वारे दिल्या गेलेल्या कपड्याचा रंग, प्रकार आणि दुर्गंधीचे प्रमाण यावरून कोणत्या कापडाला कितीवेळा धुवायचे याची वॉशिंग सायकल ठरवली जाते. या वॉशिंग मशीनला फाईव्ह स्टार रेटिंग आहे. या मशीनमध्ये वापरलेल्या डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीमुळे कमी ऊर्जा वापरली जाते. शिवाय मशीनचा आवाजही कमी येतो.           

सॅमसंगच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सपोर्ट असलेल्या या वॉशिंग मशीनची किंमत ३५,४०० रुपये आहे. या मशीनची विक्री सर्व ऑनलाइन स्टोअर्समध्ये सुरू झाली आहे. 

नवीन रेंजमधील वॉशिंग मशीन घेणाऱ्या ग्राहकांना २० टक्के कॅशबॅक, बिनव्याजी ईएमआय आणि ९९० रुपयांवर सुरू होणाऱ्या ईएमआयवर मशीन घेणे इत्यादी पर्याय उपलब्ध करूनदिले आहेत.

संबंधित बातम्या