वाय-फाय एलईडी प्रोजेक्टर

ज्योती बागल
सोमवार, 14 जून 2021

व्हॉट्‌स न्यू

विविध खासगी आणि सरकारी संस्थांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरून नियमित सेमिनार्स, फोटो प्रेझेंटेशन्स, कल्चरल प्रोग्रॅम्स होत असतात. शिवाय बरेचदा छोटेखानी का होईना, पण कौटुंबिक कार्यक्रमदेखील सतत सुरूच असतात. अशा कार्यक्रमांना लागणाऱ्या महत्त्वाच्या साहित्यांमध्ये प्रोजेक्टरचा समावेश होतो. असाच वाय-फाय एलईडी प्रोजेक्टर नुकताच बाजारात आला आहे. पोर्टेबल आणि इनोव्हेटिव्ह कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक ब्रँड पोरट्रॉनिक्सने आणलेल्या या नवीन प्रोजेक्टरविषयी थोडक्यात...

पोरट्रॉनिक्स (Portronics) कंपनीने लॉँच केलेल्या नवीन वाय-फाय एलईडी प्रोजेक्टरचे नाव आहे ‘बीम २०० प्लस’ (Beem 200 Plus)! या वाय-फाय एलईडी प्रोजेक्टरला कनेक्टिव्हीटीसाठी मल्टिपल ऑप्शन्स दिले आहेत. तसेच या प्रोजेक्टरमध्ये इनबिल्ट व्हीजीए पोर्ट, यूएसबी पोर्ट, एचडीएमआय आणि एसडी कार्ड स्लॉट इत्यादी दिले आहेत. शिवाय अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाईसवरून डायरेक्ट प्रोजेक्टरवर मिररिंग करण्यासाठीदेखील हा उपयुक्त आहे. ‘बीम २०० प्लस’ प्रोजेक्टरला लॅपटॉप, पीसी, मोबाइल फोन, टॅबलेट, एक्सबॉक्स, पीएस३, पीएस४ किंवा यूएसबी केबलने सहज कनेक्ट करता येते. तसेच घरच्या घरीसुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्म, यूट्युबवरील व्हिडिओ किंवा अगदी आपल्या मोबाइलमधील व्हिडिओ असा वायरलेस स्ट्रिमिंगचा चांगला अनुभव घेता येईल.  

‘बीम २०० प्लस’मध्ये लावलेला मल्टिमीडिया एलईडी प्रोजेक्टर ३० हजार तासांच्या बल्ब लाइफसह येतो. त्यामुळे कार्यक्रम, सेमिनार्स सुरू असताना लाईटचे टेन्शन राहत नाही. याची व्हिडिओ क्वालिटी तर उत्तम आहेच; शिवाय यामध्ये असणाऱ्या चार वॅटच्या इनबिल्ट स्पीकर्समुळे साउंड क्वालिटीदेखील उत्तम असल्याचे कंपनीने दिलेल्या माहितीतून लक्षात येते. यामध्ये व्हिडिओ क्वालिटीसाठी एक एक्स्ट्रा लार्ज डिस्प्ले दिला आहे, ज्यामुळे इमेज आणि व्हिडिओ फुल एचडी रिझोल्युशनमध्ये दिसते. त्याचबरोबर हा प्रोजेक्टर २०० लुमेन्स सुसज्ज आहे, त्यामुळे व्हिडिओला ब्राईटनेस आणि उत्तम क्लॅरिटी येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.  

पोरट्रॉनिक्सच्या ‘बीम २०० प्लस’ एलईडी प्रोजेक्टरची किंमत १९,९९९ रुपये आहे. हा प्रोजेक्टर भारतातील प्रमुख शहरांत ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे. या प्रोजेक्टरवर एक वर्षाची वॉरंटीदेखील मिळते. 

सध्या सर्वत्र लॉकडाउन असताना लोक घरून काम करत आहेत. शिवाय थिएटर्सदेखील बंद असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मदतीने जमेल तेव्हा सिनेमे, वेबसीरिज बघण्याचा आनंदही घेत आहेत. अशावेळी अशा प्रोजेक्टरचा चांगला उपयोग होऊ शकतो.

संबंधित बातम्या