‘डेल’चा स्मार्ट वेबकॅम

ज्योती बागल
सोमवार, 12 जुलै 2021

व्हॉट्‌स न्यू

अलीकडच्या दीड-दोन वर्षांत ऑनलाइन वेबिनार्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यामुळे युजर्स त्यासाठी लागणाऱ्या चांगल्या क्वालिटीच्या वेबकॅमच्या शोधात असतातच. अशा युजर्ससाठी डेलने ‘अल्ट्राशार्प वेबकॅम’चा एक पर्याय आणला आहे. त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ...   

आजच्या घडीला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि अप्लायन्सेस म्हटले की ‘डेल’ (Dell)सारख्या कंपनीचे नाव प्रमुख कंपन्यांमध्ये घेतले जाते. कारण डेलचे इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स रोजच्या रोज बाजारात दाखल होत असतात. नुकताच एक स्मार्ट वेबकॅम डेलने लॉँच केला आहे. त्याला ‘डेल अल्ट्राशार्प वेबकॅम’ (Dell UltraSharp Webcam) असे नाव दिले आहे. या अल्ट्राशार्प वेबकॅमने 4K व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता येऊ शकते. यामध्ये 4K सोनी सेंसर दिला असल्याने कमी प्रकाशातदेखील उत्तम व्हिडिओ क्वालिटी मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्याचबरोबर या वेबकॅमेऱ्यामध्ये ‘ऑटो फ्रेमिंग’चा पर्यायही दिला असून त्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI)चा सपोर्ट दिला. या वेबकॅमेऱ्यात ध्वनी नियंत्रित करण्यासाठी 3D/2D व्हिडिओ नॉइज रिडक्शन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहे.  

या वेबकॅमेऱ्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये 8.3 मेगापिक्सलचा Sony STARVIS CMOS सेंसर दिला आहे. याच्या साहाय्याने 24fps/30fps वर 4K UHD रिझोल्युशनवर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी हा वेबकॅमेरा सक्षम आहे. त्याचबरोबर हा कॅमेरा 60fps वर HD आणि Full HD व्हिडिओदेखील रेकॉर्ड करू शकतो.

या कॅमेऱ्यामध्ये असलेल्या डिजिटल ओव्हरलॅप एचडीआर (High Dynamic Range) कॅपॅबिलिटीमुळे कमी प्रकाशातदेखील युजरचा चेहरा सर्व अँगल्सने स्पष्ट दिसतो. हा वेबकॅमेरा वापरण्याचा फायदा असा, की युजरला आपला फिल्ड व्ह्यू 5x डिजिटल झूमसह 65 डिग्री, 78 डिग्रीपासून 90 डिग्रीपर्यंत कस्टमाइज करता येतो. या कॅमेऱ्यामध्ये एक प्रॉक्झिमिटी सेंसर दिले आहे जे युजरला ओळखते व सिस्टीम अनलॉक करते, म्हणजेच याच्या मदतीने ऑटोमॅटिक लॉगइन करण्यास मदत होते.   

डेल अल्ट्राशार्प वेबकॅमची बॉडी पूर्णपणे अॅल्युमिनियमची असून त्याचे स्मूथ मेटॅलिक टेक्श्चर या वेबकॅमला जास्त आकर्षक ठरवते. कनेक्टिव्हिटीसाठी या वेबकॅमबरोबर USB टाइप-सी पोर्ट दिले आहे, तर लेन्स कव्हर करण्यासाठी एक मॅग्नेटिक स्नॅप कव्हरदेखील दिले आहे. तसेच या वेबकॅमला विंडोज 10 आणि macOS या दोन्ही डिव्हाईसचा सपोर्टही दिला आहे. 

खास बाब अशी की वेबकॅममध्ये एक एलईडी इंडिकेटर दिला आहे, जो युजरला कॅमेरा सुरू असल्याचे सूचित करतो. हा इंडिकेटर ॲपल MacBookच्या इंडिकेटरशी बऱ्यापैकी मिळताजुळता असल्याचे सांगितले जाते. डेल अल्ट्राशार्प वेबकॅमेऱ्याची भारतीय बाजारातील किंमत १८,९९९ रुपये असून या कॅमेऱ्याची विक्री डेलच्या सर्व स्टोअर्समध्ये सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या