‘नथिंग’चे इअरबड्स

ज्योती बागल 
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

व्हॉट्‌स न्यू

‘वनप्लस’ कंपनीचे सह-संस्थापक कार्ल पे यांनी वनप्लसनंतर ‘नथिंग’ (Nothing) नावाने नवीन कंपनी सुरू केली आहे. या कंपनीचे पहिलेवहिले प्रॉडक्ट इअरबड्सच्या रूपात नुकतेच भारतीय बाजारात दाखल झाले आहे. या इअरबड्सला ‘Nothing Ear 1’ असे नाव दिले आहे. 

नथिंगचे इअरबड्स नुकतेच लाँच झाले आहेत. या इअरबड्सची विक्री मात्र १७ ऑगस्टनंतर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. नथिंगने आणलेल्या या नव्या इअरबड्सची किंमत भारतीय बाजारात ५,९९९ रुपये आहे. तर ग्लोबल मार्केटमध्ये ९९ डॉलर म्हणजे जवळजवळ ७,४०० रुपये आहे.   

नथिंगने हे इअरबड्स ट्रान्सपरन्ट केससह सादर केले आहेत, त्यामुळे बाहेरूनच केसमधील इअरबड्स सहज दिसतात. त्याचबरोबर केससह चार्जिंग इंडिकेटरदेखील आहे. चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. शिवाय वायरलेस चार्जिंगचाही सपोर्ट दिला असल्याने कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीने Ear 1 App तयार केले आहे. हे ॲप Google Play Store आणि Apple App Storeवरून डाऊनलोड करता येते. हे डिव्हाईस ३४ तासांचा प्ले टाइम देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ‘Nothing Ear 1’ला फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला असल्याने फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये आठ तासांचा बॅकअप मिळतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. 

‘Nothing Ear 1’मध्ये ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (Active Noise Cancelation) सारखे प्रीमियम फीचर्स दिले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनमध्ये तीन हाय डेफिनेशन मोड वापरण्यात आले आहे. यामध्ये लाइट मोड, मॅक्स मोड आणि ट्रान्सपरन्सी मोड देण्यात आले असून टच कंट्रोलही आहे. तसेच इन इअर डिटेक्शनसारखे फीचर असल्याने इअरबड्स कानातून बाहेर काढताच म्युझिक बंद होते. यामध्ये ११.६ mmचा डायनॅमिक ड्राइव्हर दिला असून यामध्ये ब्लूटूथ ५.२ व्यतिरिक्त SBC आणि AAC ब्लूटूथ कोडेकचाही सपोर्ट दिला आहे.  

नथिंगच्या या इअरबड्सची स्पर्धा ओप्पो, सोनी, सॅमसंग, एल जी आणि अँकर साउंडकोअर अशा बड्या ब्रॅण्डच्या इअरबड्सबरोबर असेल.

संबंधित बातम्या