‘माऊस-कीबोर्ड’चा स्लिम कॉम्बो

ज्योती बागल
सोमवार, 23 ऑगस्ट 2021


व्हॉट्‌स न्यू

एडिटिंग, टायपिंग, ऑपरेटिंग आणि अशा बऱ्याच कामांसाठी लागणाऱ्या उत्तम प्रतीच्या कॉम्प्युटरबरोबर येणारा कीबोर्डही तेवढाच मजबूत असावा लागतो. अन्यथा कीबोर्ड सतत बदलावा लागू शकतो. त्याचप्रमाणे लॅपटॉप वापरण्याची ज्यांना जास्त सवय नसते, असे युझर्स लॅपटॉपला वेगळा माऊस जोडून लॅपटॉपही कॉम्प्युटरप्रमाणे सहज वापरू शकतात. तर यासाठी उपयुक्त ठरतील अशा नुकत्याच लाँच झालेल्या वायरलेस माऊस आणि कीबोर्डविषयी थोडक्यात पाहू...   

लॉजिटेक (Logitech) कंपनीने वायरलेस माऊस आणि कीबोर्डचा ‘Logitech MK470’ नावाने एक कॉम्बो पॅक नुकताच भारतात लॉँच केला आहे. 

माऊस आणि कीबोर्ड दोन्ही डिव्हाईस स्लिम आणि कॉम्पॅक्ट स्वरूपात डिझाइन केले आहेत. यामध्ये ग्रॅफाईट आणि ऑफ व्हाइट हे दोन रंग उपलब्ध आहेत. Logitech MK470चा वापर विंडोज 10, 8 आणि 7 मध्ये करता येऊ शकतो. Logitech MK470ला युझर्स छोट्याशा 2.4GHz च्या USB रिसिव्हरने डेस्कटॉप किंवा लॅपटॉपला सहज कनेक्ट करू शकतात. 

लॉजिटेकच्या माऊस आणि कीबोर्ड दोन्हींसाठी बॅटरीची आवश्यकता आहे. यातील माऊसमध्ये AA बॅटरीचा तर कीबोर्डमध्ये AAA बॅटरीचा वापर केला आहे. माऊससाठी १८ तर कीबोर्डसाठी ३६ महिन्यांचा बॅकअप मिळत असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. तसेच माऊसवर १८ महिन्यांची तर कीबोर्डवर ३६ महिन्यांची वॉरंटीही असल्याची माहिती कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

या कॉम्बो पॅकमधील कीबोर्ड कॉम्पॅक्ट स्वरूपाचा असला तरीही यात नंबर पॅडदेखील उपलब्ध आहे. याशिवाय यातील १२ ‘फंक्शन कीज्’साठी शॉर्टकटचा पर्याय दिला आहे. मात्र कीबोर्डवरील ॲरो कीज् नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी असल्याने सवय होईपर्यंत युजर्सचा गोंधळ होऊ शकतो.  

या कॉम्बोमधील वायरलेस माऊसचे वजन १०० ग्रॅम आहे, तर कीबोर्डचे वजन ५५८ ग्रॅम आहे. माऊसला तीन बटणे आणि एक स्क्रोलर आहे. तसेच माऊसमध्ये हाय प्रिसिजन ऑप्टिकल ट्रॅकिंग आणि 1000dpi सेंसर रिझोल्युशन उपलब्ध आहे. Logitech MK470 या कॉम्बो पॅकची किंमत ४,९९५ रुपये आहे. मात्र सध्या ॲमेझॉनसारख्या ऑनलाइन विक्री संकेतस्थळांवर Logitech MK470ची विक्री ४,४९४ रुपयांमध्ये होत आहे. त्यामुळे डिव्हाईस आवडले असतील आणि गरजही असेल तर खरेदीचा विचार करायला हरकत नाही.

संबंधित बातम्या