रिअलमीचा वायरलेस चार्जर!

ज्योती बागल 
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

व्हॉट्‌स न्यू

‘रिअलमी’चा सर्वात वेगवान असा ‘Realme MagDart’ हा वायरलेस चार्जर नुकताच लाँच झाला आहे. या चार्जरसह रिअलमीने आणखी एक चार्जर, पॉवरबँक, मोबाईल ॲक्सेसरीज आणि मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट असलेला रिअलमी अँड्रॉइड फोनचा फर्स्ट लूकही रिलीज केला आहे. या सर्व गॅजेट्सविषयी थोडक्यात जाणून घेऊ...

मागच्या वर्षी Apple MagSafe हा वायरलेस चार्जर बाजारात दाखल झाला होता. आता रिअलमीनेदेखील असाच वायरलेस चार्जर नुकताच लाँच केला आहे. या चार्जरला ‘रिअलमी 50W मॅगडार्ट’ (Realme 50W MagDart) असे नाव दिले असून हा Apple MagSafeची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे. मात्र रिअलमीच्या चार्जरचा चार्जिंग स्पीड जास्त आहे. मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंगच्या मदतीने अँड्रॉइड डिव्हायसेस चार्ज करता येणार आहेत. ‘रिअलमी मॅगडार्ट’सह रिअलमीने ‘15W MagDart’ चार्जर आणि ‘MagDart’ हे आणखी दोन चार्जरही लाँच केले आहेत. त्याचबरोबर कंपनीने त्यांचा कन्सेप्ट फोन ‘रिअलमी फ्लॅश’ (Realme Flash)चा फर्स्ट लूकही रिलीज केला आहे. रिअलमी फ्लॅश हा मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट असलेला पहिला अँड्रॉइड फोन आहे.

रिअलमी मॅगडार्टला चार्ज करण्यासाठी अँड्रॉइड फोनच्या बॅकपॅनलला जोडता येऊ शकते. रिअलमी 50W मॅगडार्ट वायरलेस चार्जरसह यूएसबी टाइप-सी पोर्टही उपलब्ध आहे. ‘रिअलमी मॅगडार्ट’ हा जगातला सर्वात वेगवान मॅग्नेटिक वायरलेस चार्जर असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. वनप्लसमध्येही 50W वायरलेस चार्जिंग आहे, जे Warp Charge 50 वायरलेस चार्जरसह उपलब्ध होते. मात्र हा चार्जर मॅग्नेटिक नाही. रिअलमी 50W मॅगडार्ट वायरलेस चार्जरमध्ये कॉम्पॅक्ट कुलिंग फॅनसह अॅक्टिव्ह कुलिंग फीचर आहे, ते १.५ मिमी मॅग्नेटसह येते. रिअलमी 15W मॅगडार्ट चार्जर स्लिम आहे. त्याची जाडी फक्त 3.9mm आहे आणि त्याचा वेग Apple MagSafe सारखा आहे. ‘मॅगडार्ट पॉवरबँक’ पोर्टेबल असून तिच्या मदतीने रिअलमी फ्लॅश आरामात चार्ज करता येतो. रिअलमी फ्लॅश फोनच्या मागील पॅनलवर ही पॉवरबँक ठेवताच फोन चार्जिंग सुरू होते. ही पॉवरबँक टू वे चार्जिंगसह येते. 

रिअलमीने ॲक्सेसरीजमध्ये मॅगडार्ट वॉलेट, मॅगडार्ट ब्यूटी लाइट आणि मॅगडार्ट केसदेखील सादर केले आहेत, जे खास करून फक्त Realme GTसाठी आहेत. मॅगडार्ट वॉलेट हे व्हाइट वेगन लेदरपासून तयार केले आहे. यामध्ये तीन कार्ड होल्डर्स असून मॅग्नेटच्या साहाय्याने फोनच्या मागच्या बाजूला सहज चिकटते. याला एक किकस्टँडही दिलेला आहे. मॅगडार्ट ब्यूटी लाइट हे आणखी एक अटॅच्ड मॅग्नेट आहे. ते लाइट रिंगमध्ये येते आणि यामध्ये ६० एलईडी आहेत. हे खास सेल्फी प्रेमींसाठी तयार केले आहे. सेल्फी घेताना त्या एलईडी फ्लिप होतात आणि चेहऱ्यावर फ्लॅश पडतो. मॅगडार्ट केस टाइप सी पोर्टने कनेक्ट करून फोन चार्ज करते. यातील कोणत्याही प्रॉडक्टच्या किमतींविषयी कंपनीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

संबंधित बातम्या