एलजी फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर 

ज्योती बागल 
सोमवार, 13 सप्टेंबर 2021


व्हॉट्‌स न्यू

शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग, घराघरात दिसणारी महत्त्वाची वस्तू म्हणजे रेफ्रिजरेटर! त्यातही मॉड्युलर किचन असेल, तर स्मार्ट रेफ्रिजरेटरला प्राधान्य दिले जाते. सध्या बाजारात असे अनेक ब्रँडेड रेफ्रिजरेटर उपलब्ध आहेत. ‘एलजी’नेदेखील नुकतेच एक नवीन मॉडेल लॉँच केले आहे.    

प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड कंपनी ‘एलजी (LG) इलेक्ट्रॉनिक्स’ने भारतात नुकतेच इन्स्टाव्ह्यू फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटरचे (Instaview french door refrigerator) नवीन मॉडेल लॉँच केले आहे. रेफ्रिजरेटरचे हे लेटेस्ट मॉडेल चमकदार काचेच्या पॅनलसह येते. ‘की नॉक्स’सह सुसज्ज असल्याने युझर्सना फ्रीजचा दरवाजा न उघडताच फ्रीजमधील कंपार्टमेंटमध्ये कुठे काय ठेवले आहे ते सहज बघता येते. एलजीचा हा रेफ्रिजरेटर इंटरटेकद्वारे टेस्ट केला असल्याने रेफ्रिजरेटरमधील हवा योग्य प्रमाणात थंड राहते. शिवाय यामुळे ९९.९९ टक्के जंतू नष्ट होऊन फ्रीजमधील दुर्गंधी नाहिशी होते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

नेहमी रेफ्रिजरेटरचा वरचा भाग डीप फ्रीझरचा असतो, मात्र इन्स्टाव्ह्यूमध्ये डीप फ्रीझर खालच्या बाजूला आहे. एलजीने आरोग्य आणि स्वच्छतेवर जास्त भर दिल्याने हा नवीन रेफ्रिजरेटर हायजिन फ्रेश टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. तसेच रेफ्रिजरेटरमध्ये वापरलेली एलजी यूव्ही नॅनो (LG UVNano) टेक्नॉलॉजी प्रत्येक तासाला फ्रिजमध्ये असलेल्या डिस्पेंसर टॅपवरील ९९.९९ टक्के जंतू नष्ट करून वॉटर-डिस्पेंसर स्वच्छ आणि जंतू मुक्त ठेवते. यासाठी स्वतंत्र बटण दिले असल्याने युझर्स आपल्या सोयीनुसार ते ॲक्टिव्हेट करू शकतात.

एलजी रेफ्रिजरेटरच्या या नवीन मॉडेलमध्ये इन्व्हर्टर लिनियर कॉम्प्रेसर टेक्नॉलॉजीचा वापर केला असल्याने नेहमीच्या तुलनेत वीज बचतही मोठ्या प्रमाणात होते. हे कॉम्प्रेसर नेहमीच्या कॉम्प्रेसरपेक्षा वेगळे असून या त्यामध्ये सिंगल फ्रिक्शन पॉइंट फिचर दिले आहे, ज्यामुळे रेफ्रिजरेटर अधिक स्थिर होतो. एलजीच्या ग्राहकांना कॉम्प्रेसरवर जवळपास १० वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. एलजी इन्स्टाव्ह्यू फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटरच्या या नवीन मॉडेलची भारतातील किंमत ३,२९,९९० रुपये आहे. हा रेफ्रिजरेटर मॅट ब्लॅक कलरमध्येदेखील खरेदीसाठी उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या