युबॉनचा मॅजिक चार्जर

ज्योती बागल
सोमवार, 6 डिसेंबर 2021

व्हॉट्‌स न्यू

हल्ली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आली म्हणजे त्यांना वेळोवेळी चार्ज करणे आलेच. प्रत्येक डिव्हाइससाठी स्वतंत्र चार्जर वापरणे म्हणजे प्लग इनही जास्त लागणार. अशावेळी युबॉनने नुकताच बाजारात आणलेला मॅजिक चार्जर उपयोगी ठरू शकतो. त्याविषयी थोडक्यात...    

इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या युबॉन (UBON) कंपनीने नुकताच भारतात एक मॅजिक चार्जर लॉँच केला आहे. मॅजिक अशासाठी की हा चार्जर ‘फोर इन वन’ आहे, म्हणजेच एकाचवेळी युझर कोणतीही चार डिव्हाइसेस चार्ज करू शकणार आहेत. युबॉन सीएच ९९ (UBON CH 99) असे या मॅजिक चार्जरचे नाव. या चार्जरची किंमत ₹    ६९९ आहे. 

युबॉन सीएच ९९ मॅजिक चार्जर पांढऱ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. या चार्जरमध्ये 40-270Vची वाइड इनपुट रेंज दिली असून हा चार्जर फास्ट २.६ अँपिअर आणि स्टॅंडर्ड 2.6A चार्जिंग आउटपुटसह येतो. युबॉन सीएच ९९च्या या मॅजिक चार्जरला मोबाईल होल्डरही दिले आहे, जेणेकरून मोबाईल चार्ज करताना त्या होल्डरमध्ये ठेवता येईल. त्याचबरोबर या चार्जरसह दोन यूएसबी पोर्ट आणि अन्य डिव्हाइस चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहेत. या चार्जरला एक मीटर लांबीची मायक्रो यूएसबी चार्जिंग केबल आहे. त्यामुळे इतर डिव्हाइसेस चार्ज करायला मदत होणार आहे. 

युबॉनच्या या चार्जरबरोबर एक कॅरी बॅगही मोफत मिळणार आहे. हा चार्जर व्होल्टेजचे अप-डाउन कंट्रोल करून तुमच्या डिव्हाइसला आवश्यक तेवढीच चार्जिंग पुरवत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा चार्जर कॉम्पॅक्ट आणि खूपच हलका असल्याने युझर स्वतःबरोबर तो कुठेही अगदी सहज कॅरी करू शकतात. युबॉन मॅजिक चार्जर सर्व प्रमुख रिटेल स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

मॅजिक चार्जरव्यतिरिक्त युबॉनने अलीकडेच एक ब्लूटूथ स्पीकरही भारतीय बाजारात लॉँच केला आहे. ‘युबॉन एसपी-8005’ (UBON SP-8005) असे त्याचे नाव. युबॉन एसपी-8005 हा एक हेवी बेस असणारा वायरलेस स्पीकर आहे. या स्पीकरची किंमत ₹ २,९९९आहे. यामध्ये इनबिल्ट मायक्रोफोनचा सपोर्टदेखील दिला आहे, त्यामुळे याच्या मदतीने युझर्स फोनवरही बोलू शकतात. या ब्लूटूथ स्पीकरच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी पोर्ट, मायक्रो एसडी कार्ड पोर्ट दिले असून हे लॅपटॉप, अँड्रॉइड, आयओएस आणि टॅब्लेटसह कोणत्याही डिव्हाइससाठी वापरले जाऊ शकते. त्याचबरोबर यामध्ये 1200mAhची बॅटरी आहे आणि ती सहा तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

संबंधित बातम्या