गुगलचे पहिले स्मार्टवॉच 

ज्योती बागल
सोमवार, 20 डिसेंबर 2021

व्हॉट्‌स न्यू

ॲपल, अमेझफीट अशा अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहेतच; त्यात आता गुगलच्याही पहिल्या स्मार्टवॉचची भर पडणार आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर हे स्मार्टवॉच लॉँच होणार आहे. या स्मार्टवॉचविषयी थोडक्यात...     

टेक कंपनी गुगल स्वतःच्या मालकीचे पहिले स्मार्टवॉच बाजारात आणण्याचे नियोजन करत आहे. ‘गुगल पिक्सेल’ (Google Pixel) हे स्मार्टवॉच गुगलच्या सॉफ्टवेअरसह लाँच होणार आहे. या स्मार्टवॉचची स्पर्धा ॲपलच्या स्मार्टवॉचबरोबर होऊ शकते. 

गुगल पिक्सेल या स्मार्टवॉचचे कोडनेम ‘रोहन’ (Rohan) असे ठेवले आहे. या स्मार्टवॉचबाबत सतत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. ‘बिझनेस इनसायडर’च्या एका रिपोर्टनुसार, गुगलचे हे पहिले स्मार्टवॉच २०२२मध्ये लॉँच होईल. हे स्मार्टवॉच गोल आकाराचे आहे. यामध्ये कोणतेही बेझल नसेल. याशिवाय या स्मार्टवॉचचे टेस्टिंगदेखील सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

या गुगल पिक्सेल वॉचमध्ये हेल्थ मॉनिटर आणि फिटनेस ट्रॅकरची सुविधा मिळेल. यात हार्ट रेट मॉनिटरसह बेस हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स मिळतील, ज्यामध्ये स्टेप काउंटरसह इतरही गोष्टींचा समावेश असेल. गुगल स्मार्टवॉचची किंमत ‘फिटबीट’च्या (Fitbit) स्मार्टवॉचपेक्षा जास्त असेल. कदाचित ही किंमत अ‍ॅपल स्मार्टवॉचच्या जवळपास असू शकते.

काही दिवसांपूर्वीच ॲपल वॉच सीरीज ८चे (Apple Watch Series 8) डिझाईनही ‘लीक’ झाले आहे. या वॉचमध्येदेखील कर्व्ह डिझाइन मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक एक्स्ट्रा स्पीकर ग्रिल दिले जाईल. या स्मार्टवॉचला लाइट ग्रीन कलर शेडमध्ये लाँच केले जाईल. या सीरीजअंतर्गत तीन वेगवेगळ्या आकारांची घड्याळे सादर केली जातील. त्यामध्ये एक ४१ एमएम आणि ४५ एमएम साईझचा समावेश आहे. 

महत्त्वाचे म्हणजे, अ‍ॅपल या वॉचसाठी ब्लड ग्लुकोज मॉनिटर करणाऱ्या फीचरवरदेखील काम करत असल्याचे कळते आहे. यासाठी ऑप्टिकल सेन्सरचा वापर केला जाईल. तसेच, इन्फ्रारेड सेन्सरचादेखील वापर केला जाऊ शकतो. या वॉचची भारतीय बाजारातील किंमत ॲपल वॉच सीरीज सेव्हनपेक्षा नक्कीच अधिक असेल.

संबंधित बातम्या