फ्लाइंग कार

ज्योती बागल
सोमवार, 3 जानेवारी 2022

व्हॉट्‌स न्यू

अलीकडच्या दोन-एक वर्षात आपण फ्लाइंग कारसंदर्भातील चर्चा सतत ऐकत आहोत. मात्र आता ही फक्त चर्चा न राहता खरोखरच अशी फ्लाइंग कार आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. कारण स्वीडिश स्टार्टअप ‘जेटसन वन’ या कंपनीने अशी इलेक्ट्रिक फ्लाइंग कार खरोखरच तयार केली आहे. या फ्लाइंग कारविषयी थोडक्यात...    

 स्वीडिश स्टार्टअप जेटसन वनने (Swedish Startup Jetson) फ्लाइंग कार तयार केली आहे. जेटसनने दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन इलेक्ट्रिक आहे. ते एका व्यक्तीसाठी व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग करणारे वाहन आहे. कंपनीने यासंबंधित एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ही फ्लाइंग कार उडवायला शिकण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागतात असे त्यात म्हटले आहे.

स्वीडिश स्टार्टअप जेटसनची स्थापना पीटर टर्नस्ट्रॉम आणि टॉमस पाटन यांनी २०१७मध्ये केली आहे. कंपनीने अलीकडेच प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहता येते, की त्या फ्लाइंग कारमध्ये एक व्यक्ती बसू शकते. कारला चार प्रोपेलर आहेत, जे कारच्या प्रत्येक कोपऱ्यात आहेत. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर ही कार एखाद्या मोठ्या ड्रोनसारखी आहे. कंपनीचे संस्थापक पीटर टर्नस्ट्रॉम म्हणाले, ‘बॅटरी तंत्रज्ञानामध्ये अजूनही काही समस्या आहेत, ज्या फ्लाइंग कारच्या कामात अडथळा आणत आहेत. परंतु, या क्षेत्रातील प्रगतीमुळे ही फ्लाइंग कार येत्या काही वर्षांत दीर्घ कालावधीसाठी उड्डाण करण्यास सक्षम असेल, अशी कंपनीला आशा आहे.’ याबरोबरच ते असेही म्हणाले, की सध्या ही कार २० मिनिटांच्या कालावधीसाठी उडू शकते आणि ती १०२ किमी प्रति तासापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकते.

या फ्लाइंग कारचे पार्ट्‌स मुख्यतः ॲल्युमिनिअम आणि कार्बन फायबरने तयार केलेले आहेत. २०२२मध्ये कंपनी आपल्या ग्राहकांसाठी ही एक सीट असलेली इलेक्ट्रिक एरियल कार उपलब्ध करून देईल. त्यामुळे ग्राहकांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. मात्र या फ्लाइंग कारच्या किमतीबद्दल अद्याप कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

संबंधित बातम्या