मिनी  वॉटर हीटर

ज्योती बागल
सोमवार, 10 जानेवारी 2022

व्हॉट्‌स न्यू

हल्लीचे हवा प्रदूषण बघता बरेचजण सकाळ-संध्याकाळ अंघोळ करतात आणि अर्थातच अंघोळ म्हणजे गरम पाणी आलेच. त्यात आत्ता हिवाळा असल्याने गरम पाणी अधिक वापरले जाते. त्यामुळे घरोघरी गीझरचा वापर वाढला आहे. पण गीझरपेक्षाही कमी वेळेत पाणी गरम करून देणारा एक मिनी वॉटर हीटर नुकताच बाजारात दाखल झाला आहे. 

घरातील कोणत्याही नळाला सहज फिट होईल असा इलेक्ट्रिक मिनी वॉटर हीटर (Electric Water heater Faucet Tap Hot And Cold Water Geyser Water Heater) स्वमेय (SWAMEY) या कंपनीने नुकताच लॉँच केला आहे. खरे तर हा एक टॅप हीटर आहे, म्हणजेच त्याचे डिझाईन नळासारखे आहे. या मिनी हीटरला छोटा गीझरही म्हणता येईल. मात्र गीझरमध्ये पाणी गरम होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. म्हणूनच या नव्या टॅप हीटरचा पर्याय नक्कीच चांगला आहे. कारण हा टॅप हीटर काही सेकंदात पाणी गरम करतो.

सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सर्वजण गरम पाण्यानेच अंघोळ करण्यास प्राधान्य देतात. शिवाय ऑफिस, कॉलेज सकाळी लवकर असल्याने बऱ्याच जणांना लवकरच घराबाहेर पडावे लागते. अशावेळी गरम पाणी पटकन उपलब्ध झाले, तर थंडीत ताटकळत बसावे लागत नाही आणि घराबाहेर पडायलाही उशीर होणार नाही. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून हा मिनी टॅप वॉटर हीटर पर्याय होऊ शकतो.

स्वमेयचा हा वॉटर हीटर थेट टॅपला जोडलेला असतो. त्यामुळे जेव्हा पाणी त्यातून जाते तेव्हा ते लगेच गरम होते. अगदी काही क्षणांत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजेचे दर गगनाला भिडलेले असण्याच्या या काळात गीझरलादेखील बरीच वीज लागते. मात्र हा टॅप हीटर गीझरपेक्षा नक्कीच कमी वीज वापरतो, असा उत्पादकांचा दावा आहे. शिवाय हा टॅप हीटर घरातील सिंक, वॉश बेसिन, बाथरूम अशा कोणत्याही नळाला सहज जोडता येतो. त्याचबरोबर हीटर मजबूतही आहे आणि परवडणाराही आहे.

या मिनी वॉटर हीटरमध्ये रेप्रेचर रेसिस्टंट प्लॅस्टिक वापरले आहे. हे प्लॅस्टिक अतिशय मजबूत आहे, त्यामुळे हीटर जास्त काळ टिकतो. साधारणपणे अशा गॅजेट्समध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्ले नसतो; मात्र या टॅप हीटरमध्ये एक डिस्प्लेदेखील दिला असून त्याच्या मदतीने पाण्याचे तापमान तपासता येते. तसेच याचे डिझाईन कॉम्पॅक्ट असल्याने तो दिसायलाही आकर्षक वाटतो. त्याचबरोबर गरम आणि थंड पाण्याची सोय असल्याने इतर ऋतूंमध्येदेखील याचा उपयोग होऊच शकतो.

स्वमेयच्या या इलेक्ट्रिक टॅप वॉटर हीटरची किंमत १,२९९ रुपये असून हा ॲमेझॉन आणि स्वमेयच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. याशिवाय बऱ्याच कंपन्यांचे असे इन्स्टन्ट वॉटर हीटर बाजारात पाहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या