स्मार्टफोन अ‍ॅप कनेक्टेड सायकल

ज्योती बागल
सोमवार, 17 जानेवारी 2022

व्हॉट्‌स न्यू

सायकलिंग करणे हा उत्तम व्यायाम मानला जातो. त्यामुळे बरेच जण वेळात वेळ काढून सायकलिंग करतात. शिवाय आता टू व्हीलर, फोर व्हीलरप्रमाणे इलेक्ट्रिक सायकलही बाजारात दाखल होत आहेत. पण इलेक्ट्रिकसह सायकलला स्मार्ट कनेक्टिव्हिटी मिळाली तर..? सायकलिंग करणाऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. हिरो कंपनीने ब्लूटूथ आणि स्मार्टफोन अ‍ॅप कनेक्टेड अशा दोन ई-सायकल लॉँच केल्या आहेत.

‘हिरो सायकल’च्या ‘हिरो लेक्ट्रो इलेक्ट्रिक’ (Hero Lectro Electric) सायकल विभागाने नुकत्याच ‘एफ 2आय’ आणि ‘एफ 3आय’ या दोन नवीन इलेक्ट्रिक माउंटन सायकली लॉँच केल्या आहेत. या माउंटन सायकलींना ‘माउंटन बाइक्स’ असेही म्हणतात. या सायकली खास आहेत, कारण त्या ब्लूटूथ आणि स्मार्टफोन अ‍ॅप कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज आहेत. अशाप्रकारची कनेक्टिव्हिटी असणाऱ्या या पहिल्याच माउंटन बाइक्स असल्याचा कंपनीचा दावा आहे. ब्लूटूथ आणि स्मार्टफोन अ‍ॅप कनेक्टिव्हिटी असल्यामुळे रायडर कधीही त्यांच्या राइडबाबत माहिती मिळवू शकतात. तसेच या ई-सायकली RFID बाईक लॉकने सुरक्षित आहेत. या सायकलींची बांधणी बघता शहरी ट्रॅक आणि ऑफ-रोड ट्रॅक आशा दोन्ही ट्रॅकवर रायडरना नक्कीच उपयुक्त ठरतील. तरुण रायडर या इलेक्ट्रिक सायकलींकडे आकर्षित होतील, या विचारानेच कंपनीने या सायकली लॉँच केल्या आहेत.

हिरो ‘एफ 2आय’ आणि हिरो ‘एफ 3आय’च्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचे झाले तर, या दोन्ही सायकल एका चार्जवर साधारण ३५ किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देत देतात. यात सात गिअर स्पीड आहे. या सायकलमध्ये १०० मिमी सस्पेन्शन, २७.५ इंच आणि २९ इंच ड्युअल अलॉय रिम आणि ड्युअल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. त्याचबरोबर राईडसाठी लागणाऱ्या इतर सर्व गोष्टींचीदेखील विशेष काळजी घेतली आहे.

या दोन्ही इलेक्ट्रिक माउंटन सायकली उच्च क्षमतेच्या 6.4Ah IP67 रेटेड पाणी आणि धूळ प्रतिरोधक बॅटरीने सुसज्ज असून ती 250W BLDC मोटरमधून उच्च टॉर्क (Torque) निर्माण करते. त्याचबरोबर रायडरला चार रायडिंग मोड मिळतात, ज्यापैकी ते कोणताही एक निवडू शकतात. पेडलिकला ३५ किलोमीटरची रेंज मिळते, तर थ्रॉटलला २७ किलोमीटरची रेंज मिळते. याशिवाय क्रूझ आणि मॅन्युअल कंट्रोलची सुविधादेखील आहे. सायकलवर असलेल्या स्मार्ट एलईडी डिस्प्लेच्या मदतीने हे मोड एका मोडमधून दुसऱ्या मोडमध्ये सहज बदलता येतात. 

या इलेक्ट्रिक माउंटन सायकलींच्या किमती बघितल्या, तर हिरो ‘एफ 2आय’ची किंमत आहे ₹    ३९,९९९. तर ‘एफ 3 आय’ची किंमत आहे ₹ ४०,९९९. या सायकली हिरो लेक्ट्रोच्या नेटवर्कअंतर्गत असणाऱ्या ६०० डीलर्सकडून खरेदी करता येतील. तसेच त्या ऑनलाइनदेखील खरेदी करता येतील. त्यामुळे सायकलप्रेमी मंडळींना आणखी वाट बघावी लागणार नाही.

संबंधित बातम्या