देशातील पहिली  इलेक्ट्रिक  क्रूझर बाईक

ज्योती बागल
सोमवार, 24 जानेवारी 2022

व्हॉट्‌स न्यू

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक वाहन निर्मात्या कंपन्या स्कूटर, बाईकसारखी इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच भारतातील इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी ‘कोमाकी इलेक्ट्रिक व्हेहिकल्स’ने लवकरच देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. 

‘कोमाकी इलेक्ट्रिक व्हेहिकल्स’ (Komaki Electric Vehicles) ही कंपनी भारतीय बाजारात ३० हजार ते एक लाख रुपये दरम्यान किमती असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर विकते. मात्र आता कोमाकी कंपनी पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक (Electric Cruiser Bike) लॉँच करण्याच्या तयारीत असून ‘कोमाकी रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर’ असे या बाईकचे नाव आहे. कंपनीने एका टिझरद्वारे या नव्या बाईकची झलकही दाखवली आहे. या व्हिडिओमधून या बाईकचे डिझाईन स्पष्ट दिसते. 

   येत्या काही दिवसांत लॉँच होणाऱ्या या पहिल्या इलेक्ट्रिक क्रूझर बाईकसंदर्भात कंपनीने लॉँचिंगपूर्वीच अनेक दावे केले आहेत. ही इलेक्ट्रिक बाईक एकदा चार्ज केल्यानंतर २५० किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. ही क्रूझर बाईक 4kWh बॅटरी पॅकसह येते, जी 5000W मोटरला पॉवर देते. ही भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलरमधील सर्वात मोठी बॅटरी असेल. यामुळेच कंपनी ही बाईक सिंगल चार्जमध्ये २५० किमीपर्यंत रेंज देत असल्याचा दावा करत आहे. 

कोमाकी रेंजरही बाईक शायनिंग क्रोम एलिमेंट्ससह येते. यामध्ये रेट्रो थीमचा राउंड एलईडी लँप वापरण्यात आला आहे. तसेच या बाईकमध्ये एक हँडल देण्यात आले असून सिंगल पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टरही देण्यात आले आहे. कोमाकी रेंजरच्या इतर फीचरबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये क्रूझ कंट्रोल, रिपेअर स्विच, रिव्हर्स स्विच, ब्लू टूथ आणि अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टीम यांसारखे फीचर असतील. 

कोमाकी रेंजर अधिकृतपणे लाँच झाल्यानंतरच या बाईकची नेमकी किंमत कळेल. तथापि, कंपनीने ही बाईक कमी किमतीत आणण्याचे आश्वासन दिले आहे. या बाईकबद्दल बोलताना कोमाकी इलेक्ट्रिक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा म्हणातात, ‘आम्ही परवडणाऱ्या किमतीचा टॅग ठेवण्याचा विचार करत आहोत, मात्र काही गोष्टी अजून निश्चित करायच्या आहेत. तसेच प्रत्येकाला, विशेषतः सामान्य माणसाला भारतात तयार केलेल्या या शानदार क्रूझर बाईक चालवण्याचा अनुभव घेता यावा, अशी आमची इच्छा आहे.’ त्याचबरोबर ही इलेक्ट्रिक क्रूझर बाईक मार्केटमध्ये गेमचेंजर ठरेल अशी अपेक्षाही त्यांनी  व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या