पोर्ट्रोनिक्सचा पोर्टेबल एअर पंप

ज्योती बागल
सोमवार, 31 जानेवारी 2022

व्हॉट्‌स न्यू

अलीकडे लॉँग ड्राईव्ह, फॅमिली ट्रिप किंवा ऑफिशिअल ट्रिप्स.. असे काहीही असो, लांबचा प्रवास असला तरीही बरेचजण स्वतःचे वाहन घेऊन जाण्यास प्राधान्य देताना दिसतात. अशा लांबच्या प्रवासादरम्यान कार किंवा बाईकच्या टायरमधील हवा कमी होण्याची समस्या येऊ शकते आणि नेमके त्याचवेळी जवळपास गॅरेज असेलच असे नाही. यावर उपाय म्हणून पोर्ट्रोनिक्स कंपनीने एक पोर्टेबल एअर पंप लॉँच केला आहे.

पोर्ट्रोनिक्सने ‘पोर्टेबल टायर इन्फ्लेटर वायू’ (Portable tire Inflator Vayu) या नावाने एक पोर्टेबल एअर पंप लॉँच केला आहे. हा एअर पंप पोर्टेबल आणि कॉम्पॅक्ट असल्याने युझर प्रवासादरम्यान सहज त्यांच्याबरोबर बाळगू शकतात आणि त्याच्या मदतीने कुठेही, कधीही आणि कोणत्याही वाहनात हवा भरू शकतात. एवढेच काय पण या पंपाने सायकल आणि बॉलमध्येदेखील हवा भरता येते. त्यामुळे सर्वांसाठीच हा पोर्टेबल एअर पंप उपयुक्त ठरणार आहे.    

हा पोर्टोनिक्स वायू एअर पंप विविध आकार आणि फंक्शनच्या नोझलसह उपलब्ध असून हे प्रेस्टा व्हॉल्व्ह अ‍ॅडाप्टर एनेबल्ड मॉडेल आहे. यामध्ये ४००० एमएएचची पॉवरफुल बॅटरी दिली आहे, जिचे आउटपुट ५० वॅट आहे. याच्या मदतीने युझर कोणत्याही वाहनाच्या टायरमध्ये काही मिनिटांत सहज हवा भरू शकतात. उपलब्ध माहितीनुसार फक्त नऊ मिनिटांत कारच्या टायरमध्ये हवा भरून होते. कोणत्याही टायरमध्ये हवा भरत असताना या पंपचे युनिट आपोआप हवेचा दाब ओळखते आणि हवा भरून झाल्यावर थांबते. त्याचबरोबर युझर आपल्या सोयीनुसार ते मॅन्युअलीदेखील सेट करू शकतात.   

पोर्ट्रोनिक्स वायूच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये चार स्मार्ट मोड दिले आहेत. त्यात कार मोड, बाईक मोड, सायकल मोड आणि बॉल मोडचा समावेश आहे. त्याचबरोबर या डिव्हाइसमध्ये एलईडी डिजिटल डिस्प्लेदेखील आहे. तसेच चार्जिंगसाठी यात टाइप-सी यूएसबी चार्जिंग केबल दिलेली आहे. एकदा चार्ज केल्यावर वायू १५० पीएसआयपर्यंत हवा भरू शकते. मात्र हे वाहनाच्या प्रकारावरही अवलंबून असल्याचे म्हटले आहे. युझर त्यांच्या डिव्हाइसनुसार पीएसआय प्रेशर युनिट बदलू शकतात. त्यासाठी स्वतंत्र बटण आहे.     

पोर्ट्रोनिक्सचा हा सिम्पली स्मार्ट एअर पंप काळ्या रंगात प्रीमियम मॅट फिनिशसह उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत २८९९ रुपये आहे. हे पंप कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून, तसेच फ्लिपकार्ट आणि इतर ऑफलाइन स्टोअरमधूनदेखील खरेदी करता येतील. यावर १२ महिन्यांची वॉरंटी दिली आहे. पोर्ट्रोनिक्स वायूची शाओमीच्या एमआय (Mi) पोर्टेबल इलेक्ट्रिक एअर कॉम्प्रेसरशी स्पर्धा असेल.

संबंधित बातम्या