महिंद्रा इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर

ज्योती बागल
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

व्हॉट्‌स न्यू

स्वतःचा व्यवसाय करताना स्वतःच्या मालकीचे वाहन असावेच लागते. जेणेकरून वेळेवर कच्च्या-पक्क्या मालाची ने-आण करता येते. असेच लहान-मोठ्या व्यवसायिकांना उपयोगी पडेल असे इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर वाहन महिंद्राने बाजारात आणले आहे. 

सध्या इलेक्ट्रिक सेगमेंटअंतर्गत बऱ्याच कंपन्या दुचाकी आणि चारचाकी वाहने बाजारात आणत आहेत. यामुळे इंधन बचत तर होतेच; शिवाय वायू प्रदूषणाला काही प्रमाणात का होईना आळा बसतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडनेदेखील (Mahindra Electric Mobility Limited) नुकतीच एक इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर ‘ई-अल्फा कार्गो’ (Electric three wheeler E-Alfa Cargo) लाँच केली आहे. ही एक लहान आकाराची इलेक्ट्रिक ऑटो आहे, जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोचवण्याचे काम सहज करते. त्यामुळे ही थ्री-व्हीलर कार्गो व्यावसायिकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकते.

या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर ई-अल्फा कार्गो मॉडेलची ३१० किलो पेलोडची क्षमता आहे. याच्या रेंजबद्दल सांगायचे, तर हे वाहन ऑटो सिंगल चार्जवर ८० किमी रेंज देऊ शकते. ऊर्जेच्या बाबतीत ई-अल्फा कार्गो जास्तीत जास्त १.५ किलोवॅट ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे. तसेच ही इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर कार्गो प्रतितास २५ किमी स्पीड देण्यास सक्षम आहे, असे उत्पादक सांगतात.

इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर ई-अल्फा कार्गोबद्दल बोलताना, महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटीचे सीईओ सुमन मिश्रा म्हणतात, ‘आम्ही ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन ई-अल्फा कार्गो ई-कार्ट लाँच करत असून डिझेल कार्गो थ्री-व्हीलरवर ₹    ६० हजारांच्या बचतीसह कार्गो सेगमेंटमध्ये शाश्वत आणि प्रदूषणमुक्त समाधान प्रदान करण्याचे ई-अल्फा कार्गोचे उद्दिष्ट आहे.’

ही इलेक्ट्रिक ई-अल्फा कार्गो ऑफ-बोर्ड 48V/15A चार्जरसह येत असून तिचे चार्जिंग मोबाईल फोन चार्ज करण्याइतके सोपे आहे. महिंद्राच्या या ई-अल्फा कार्गोसह फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो, जो ड्रायव्हिंग रेंज, स्पीड आणि चार्जिंग यासारखी आवश्यक माहिती दाखवतो. ई-अल्फा कार्गोमध्ये 1000Wची मोटर असून ती कंट्रोलरसह येते. या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची किंमत १.४४ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना, ही इलेक्ट्रिक कार्गो एक उत्तम पर्याय तर ठरणार आहेच, शिवाय हे इलेक्ट्रिक वाहन कंपनीला ई-कार्ट सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यास मदत करेल हेही नक्की.

संबंधित बातम्या