वनप्लसचे स्वस्त स्मार्ट टीव्ही

ज्योती बागल
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

व्हॉट्‌स न्यू

हल्ली स्मार्ट टीव्हींची मागणी वाढली असून घराघरात स्मार्ट टीव्ही बघायला मिळत आहेत. वनप्लस कंपनीने आपल्या वाय सीरीजअंतर्गत नुकतेच कमी किमतीतील दोन स्मार्ट टीव्ही लॉँच केले आहेत. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.    

वनप्लस  (OnePlus) कंपनी स्मार्ट गॅजेटसाठी प्रसिद्ध आहे. समाजातील सर्वच घटकांना परवडतील अशी गॅजेट बाजारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे वनप्लसने भारतात नुकतेच दोन स्वस्त असे स्मार्ट टीव्ही लॉँच केले आहेत. OnePlus TV Y1S हा ३२ इंच आणि OnePlus TV Y1S Edge हा ४३ इंची असे दोन स्मार्ट टीव्ही सादर केले आहेत.   

OnePlus TV Y1S या मॉडेलमध्ये एचडी रिझोल्युशन आहे, तर Y1S Edgeमध्ये फुल-एचडी रिझोल्युशन मिळते. त्याचबरोबर या दोन्ही टीव्हींना एचडीआर टेन प्लस (HDR10+), एचडीआर टेन (HDR10) आणि एचएलजी (HLG) फॉरमॅट सपोर्ट मिळतो. OnePlus TV Y या सीरीजमधील हे टीव्ही ‘अँड्रॉइड टीव्ही 11’वर चालतात. शिवाय हे डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह येतात. OnePlus TV Y1S मॉडेलला 20Wचे, तर OnePlus TV Y1S Edgeला 24W स्पीकर मिळतात. हे दोन्ही फुल रेंजचे स्टिरिओ स्पीकर आहेत. त्याचबरोबर यामध्ये ALLM मोड असल्याने हे स्मार्ट टीव्ही गेमिंगसाठीही उत्तम असल्याची माहिती मिळते.

या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टन्ट सपोर्टही आहे. वनप्लसचे युझर त्यांच्या स्मार्टफोननेदेखील स्मार्ट टीव्ही कंट्रोल करू शकतात. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 5GHz बँड सपोर्टसह ड्युअल-बँड वाय-फाय दिलेले आहे. त्याचबरोबर दोन्ही स्मार्ट टीव्हींना Oxygen Play 2.0 मिळतो, जो कन्टेन्ट प्लॅटफॉर्म म्हणून काम करतो आणि २३०हून अधिक थेट चॅनेल ऑफर करतो.

OnePlus TV Y1S च्या ३२ इंची मॉडेलची किंमत ₹   १६,४९९ आहे, तर ४३ इंची मॉडेलची किंमत ₹   २६,९९९ आहे. OnePlus TV Y1S Edge च्या ३२ इंची मॉडेलची किंमत ₹   १६,९९९ आहे, तर ४३ इंची मॉडेलची किंमत ₹   २७,९९९ आहे. Y1S हे मॉडेल वनप्लस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून, तसेच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑनलाइन उपलब्ध आहेत, तसेच प्रमुख रिटेलरकडेदेखील खरेदीसाठी उपलब्ध आहे. मात्र Y1S Edge हे मॉडेल खरेदीसाठी फक्त वनप्लसच्या अधिकृत स्टोअरमध्ये आणि काही प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल. 

तसेच वनप्लस रेड (OnePlus Red Cable) क्लबच्या सदस्यांना ३२ इंचाच्या मॉडेलवर ₹   ५०० आणि ४३ इंची मॉडेलवर ₹    ७५० सूट मिळणार असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या