‘मिनी’ची ऑल-इलेक्ट्रिक कार

ज्योती बागल
सोमवार, 7 मार्च 2022

व्हॉट्‌स न्यू

बीएमडब्ल्यू ग्रुपच्या मालकीची असलेली कंपनी ‘मिनी’ने भारतात ऑल-इलेक्ट्रिक ‘कूपर एसई’ ही कार नुकतीच लाँच केली आहे. ही दुसरी ऑल-इलेक्ट्रिक कार असून काही दिवसांपूर्वी ‘बीएमडब्ल्यू आय एक्स’ (BMW iX) ही कार बीएमडब्ल्यू ग्रुपने बाजारात आणली आहे. नुकत्याच लॉँच झालेल्या ‘कूपर एसई’ ऑल-इलेक्ट्रिक कारविषयी थोडक्यात जाणून घेऊ. 

भारतीय बाजारपेठेत या कारची एक्स-शोरूम किंमत ₹    ४७.२० लाख निश्चित करण्यात आली आहे. ब्रिटिश कार ब्रँडची ही तीन दरवाजे असणारी फुल इलेक्ट्रिक हॅचबॅक कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही इलेक्ट्रिक कार भारतात फुल-लोडेड व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. पहिल्या बॅचमध्ये भारतासाठी फक्त ३० युनिट देण्यात आल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या बॅचची डिलिव्हरी मार्चपासून सुरू होईल, तर पुढच्या बॅचचे बुकिंगही त्याच वेळी सुरू होईल.

‘कूपर एसई’मधील इलेक्ट्रिक मोटर 184 hp पॉवर आणि 270 Nm टॉर्क जनरेट करते. यात 32.6kWh चा बॅटरी पॅक मिळतो, जो पॅसेंजर सीटखाली ‘टी’ आकारात बसवला आहे. ज्यामुळे पॉवर फक्त पुढच्या चाकांना पाठवली जाऊन ही कार ७.३ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग वाढवते, तर तिचा टॉप स्पीड १५० किमी/ताशी आहे. ‘कूपर एसई’ला मिड, स्पोर्ट, ग्रीन आणि ग्रीन प्लस हे चार ड्राइव्ह मोड देण्यात आले आहेत.   

महत्त्वाची बाब म्हणजे भारतीयांना ‘कूपर एसई’चे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन मिळत आहे. मात्र गोल एलईडी हेडलॅम्प, युनियन जॅक-थीम असलेले एलईडी टेललॅम्प आणि सिल्हूट असे काही पारंपरिक एलिमेंट्स कायम ठेवण्यात आले आहेत. तर इतर काही बदलही केलेले आहेत. उदाहरणार्थ, मोठा ब्लॅक-आऊट फ्रंट ग्रिल, रि-प्रोफाइल फ्रंट बंपर, नवीन डिझाईनचा बॅक बंपर, मिरर कॅप आणि व्हील्सवर चमकदार पिवळे एक्सेंट दिले आहेत. अधिक चांगल्या लूकसाठी ब्रिटिश प्लग-सॉकेटसारखे डिझाईन असलेले आकर्षक असे १७ इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कूपर एसईचे फीचर स्टॅण्डर्ड मिनी कूपरसारखेच आहेत, ज्यामध्ये ५.५ इंचाच्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा समावेश आहे. फरक फक्त एवढाच आहे की सेंटर कन्सोलवर टॉगल स्विच आहे. याशिवाय कूपर एसईमध्ये अँपल कार-प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह ८.८ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्पोर्ट्स सीट, हरमन कार्डन ऑडिओ सिस्टीम, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, नप्पा लेदर स्टिअरिंग व्हील आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखे फिचर दिले आहेत. 

पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या कारच्या तुलनेत ‘कूपर एसई’चे ग्राउंड क्लिअरन्स चांगले आहेत. ही कार व्हाइट सिल्व्हर, मिडनाईट ब्लॅक, मूनवॉक ग्रे आणि ब्रिटिश रेसिंग ग्रीन कलरमध्ये बघायला मिळते. ही इलेक्ट्रिक कार, एका चार्जवर २७० किमीपर्यंत चालते. कूपर एसई 50kW चार्ज पॉइंटच्या मदतीने केवळ ३६ मिनिटांत ही ईव्ही कार ८० टक्के चार्ज होते, तर इतर चार्जरने ती अडीच ते तीन तासांत पूर्ण चार्ज होते. या कारवर अनलिमिटेड किलोमीटरसह दोन वर्षांची स्टॅण्डर्ड वॉरंटी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या