‘टीसीएल’चा फोल्डेबल स्मार्टफोन

ज्योती बागल
सोमवार, 14 मार्च 2022

व्हॉट्‌स न्यू

स्मार्टटीव्हीसाठी प्रसिद्ध असलेली टीसीएल (TCL) कंपनी आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉँच करणार आहे. या स्मार्टफोनला सध्यातरी ‘अल्ट्रा फ्लेक्स’ असे नाव दिले आहे. ‘टीसीएल’च्या या नव्या डिव्हाइसबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

‘टीसीएल’ने नुकतीच ‘अल्ट्रा फ्लेक्स’ आणि ‘फोल्ड एन रोल’ ही दोन डिव्हाइसेस सादर केली आहेत. यातील एक डिव्हाइस प्रोटोटाइप आहे. तर दुसरे डिव्हाइस हे फोल्डेबल आहे. या फोल्डेबल स्मार्टफोनला ‘अल्ट्रा फ्लेक्स’ असे नाव देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन ३६०-डिग्री रोटेटिंग हिंज वापरून आत आणि बाहेर फोल्ड करता येऊ शकतो.

‘टीसीएल’च्या या फोल्डेबल फोनमध्ये  २,४६० × १,८६० रिझोल्यूशनसह ८ इंचाचा PLP AMOLED डिस्प्ले आहे. मात्र हा डिस्प्ले कशाप्रकारे काम करेल, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ‘टीसीएल’च्या म्हणण्यानुसार, ड्युअल फोल्डेबल डिस्प्ले असण्याचे फायदेही आहेत. जसे की आतील बाजूने फोल्ड केल्यास, हा फोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड (Samsung Galaxy Z Fold)प्रमाणे काम करेल, तर बाहेरील बाजूस फोल्ड केल्यास तो हुआवेई मेट एक्स (Huawei Mate X)प्रमाणे कॅमेऱ्‍याचे व्ह्यूफाइंडर म्हणूनदेखील काम करेल.

अल्ट्रा फ्लेक्स हा 360-डिग्री स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असलेल्या ‘सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ३’ (Samsung Galaxy Z Fold 3) आणि ‘मायक्रोसॉफ्ट सरफेस ड्युओ 2’ (Microsoft Surface Duo 2)सारखा आहे. मात्र ‘टीसीएल’चा हा फोन उलट्या दिशेनेदेखील फिरवता येऊ शकतो. याला कव्हर डिस्प्ले नसल्यामुळे फोनच्या बॅक-फोल्डिंग क्षमतामुळे युझरना एका हाताने  डिव्हाइस वापरणे सोपे जाईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र या डिव्हाइसच्या प्रोसेसर आणि कॅमेरा रिझोल्यूशनबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

सध्या ही दोन्ही डिव्हाइस फक्त संकल्पना असून अद्याप उत्पादन श्रेणीत आलेली नाहीत. या डिव्हाइसबद्दल अधिक माहिती देताना ‘टीसीएल’ने सांगितले, की ‘अल्ट्रा फ्लेक्स’ हे प्रथमच लॉँच केले जाणार असून ‘फोल्ड एन रोल’ हे याआधी फक्त चीनमध्येच लॉँच करण्यात आले होते. हा फोल्डेबल स्मार्टफोन ५० ते ५५ हजारांत विकण्याचा कंपनीचा मानस आहे; मात्र प्रत्यक्षात या फोल्डेबल फोनची विक्री कधी सुरू होणार, हे अद्याप निश्चित नाही.

संबंधित बातम्या