पोर्टेबल फ्रिज

ज्योती बागल
सोमवार, 18 एप्रिल 2022

व्हॉट्‌स न्यू

कार ॲक्सेसरी दिवसेंदिवस स्मार्ट होत असल्यामुळे प्रवास आणखी सुखकर होत आहे. त्यातही या ॲक्सेसरी कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल स्वरूपात उपलब्ध होत असल्यामुळे सहज कुठेही कॅरी किंवा शिफ्ट करता येतात. आता यात नव्याने भर पडली आहे ती मिनी पोर्टेबल फ्रिजची! 

उन्हाळा सुरू झाला आहे. या कडाक्याच्या उन्हात प्रवास करणेदेखील नकोसे वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रवासात होणारी तहान तहान. कारण दरवेळी गार पाणी किंवा पेय मिळेलच असे नाही. शिवाय अनोळखी ठिकाणचे पाणी किंवा शीतपेय पिण्याने तब्येत बिघडण्याचा धोकाही असतोच; मात्र आता उन्हाळ्यातील प्रवास सुखकर होण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे, तो म्हणजे ‘हूक्स स्मार्ट मिनी कप कार फ्रिज आणि हिटर’. (Hoox Smart Cup Mini car Refrigerator/Fridge and Heater).

हा पोर्टेबल फ्रिज कारमध्येदेखील सहज सेट करता येतो आणि युझर तो अगदी सहज कुठेही कॅरी करू शकतात. या पोर्टेबल फ्रिजच्या मदतीने तुम्ही तुमची पाण्याची बाटली प्रवासात आणि भर उन्हातही थंड करू शकता. हा फ्रिज कारमधील 12V पॉवर वापरतो. विशेष म्हणजे हे डिव्हाईस, फ्रिज आणि हिटर असे एकत्र असल्याने यामध्ये कोणतेही पेय लगेचच्या लगेच थंडही करता येते किंवा गरमही करता येते. त्यासाठी यामध्ये सेमीकंडक्टर पेल्टियर (Semiconductor Peltier) टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. या पोर्टेबल फ्रिजची क्षमता पाचशे मिलीपर्यंत आहे. हे डिव्हाईस युझरसाठी स्मार्ट कार ॲक्सेसरीसारखे काम करेल. 

हे डिव्हाईस कोणतेही शीत पेय पाच डिग्रीपर्यंत थंड करते, असा दावा कंपनीने केला आहे. या डिव्हाईसचा आकार ६ x ६ x १४ सेमी आहे. हे डिव्हाईस वजनाला हलके आहे. तसेच ते युनिव्हर्सल डिझाइनसह येत असल्यामुळे ते कोणत्याही कारमध्ये सेट केले जाऊ शकते. त्यामुळे ज्यांना कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागतो, त्यांच्यासाठी हा स्मार्ट कप मिनी कार फ्रिज एक चांगला पर्याय आहे.

याची किंमत ₹    १,४९९ असून तो काळ्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कंपनीने या फ्रिजची एक वर्षाची वॉरंटीदेखील दिली आहे. हा स्मार्ट फ्रिज ई-कॉमर्स वेबसाइट ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. हूक्सच्या या पोर्टेबल फ्रिजप्रमाणेच, आणखी काही कंपन्यांचे पोर्टेबल फ्रिजदेखील ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहेत. शिवाय ते पोर्टेबल असले तरी आकाराने थोडेसे मोठे आहेत, त्यामुळे त्यात किमान काही बाटल्या सहज मावतात. मात्र, मोठ्या पोर्टेबल फ्रिजच्या किमतीदेखील थोड्या जास्त आहेत.

संबंधित बातम्या