मिनी प्रिंटर

ज्योती बागल
सोमवार, 9 मे 2022

व्हॉट्‌स न्यू
 

प्रिंटर हे ऑफिसमध्ये लागणारे अत्यंत आवश्यक गॅजेट आहे. मात्र आता दिवसेंदिवस याची गरज घरातही वाढू लागली आहे. कारण हल्ली कितीही डिजिटायझेशन वाढत असले, तरीही आवश्यक अशा कागदपत्रांची किंवा फोटोंची प्रिंट काढावीच लागते. अशावेळी आपल्या घरात किंवा प्रवासात आपल्याबरोबर एखादा प्रिंटर असणे केव्हाही चांगले. 

एचडीलियांग मिनी प्रिंटर (HDLiang Mini Printer) अलीकडेच बाजारात दाखल झाला आहे. हा मिनी प्रिंटर शाळा, कॉलेजच्या नोट्सपासून फोटोपर्यंत सगळे काही प्रिंट करू शकतो. हा पॉकेट प्रिंटर ब्लूटूथ स्पीकर किंवा आपला स्मार्टफोन, या दोन्हींपेक्षाही आकाराने लहान आहे. शिवाय हा दिसायलाही एखाद्या खेळण्यासारखाच आहे. मात्र कॉम्पॅक्ट बॉडी डिझाईन आणि कलरमुळे तो तेवढाच आकर्षकही वाटतो. त्यामुळे हा छोटा प्रिंटर युझर अगदी खिशात ठेवून कुठेही घेऊन जाऊ शकतात आणि गरजेच्यावेळी कुठेही याचा वापर करू शकतात. 

एचडीलियांग मिनी प्रिंटर स्मार्टफोनने कनेक्ट करून युझर कोणतीही प्रिंट काढू शकतात. शिवाय हा पोर्टेबल स्पीकरदेखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ आणि यूएसबी पोर्ट दिले आहे आणि तो अनेक फॅक्शन्सला सपोर्ट करतो. या मिनी प्रिंटरच्या साहाय्याने युझर फोटोसह, लेबल, मेसेज, लिस्ट, रेकॉर्ड, क्यूआर कोड इत्यादी गोष्टी प्रिंट करू शकतात. तसेच युझरला आवडलेले एखादे दृश्य किंवा त्यांच्या डोक्यात अचानक आलेली एखादी आयडियादेखील ते यात रेकॉर्ड करू शकतात. शिवाय फोटोंना इफेक्ट देण्यासाठी याचे अॅप विविध प्रकारचे फाँट आणि थीमदेखील ऑफर करते.

तसे पाहिले तर, अगदी प्रोफेशनल प्रिंटरप्रमाणे हा प्रिंटर प्रिंट काढत नाही, पण अगदीच गरजेच्यावेळी मात्र याचा उपयोग होऊ शकतो. शिवाय लहान मुलांना शाळेसाठी काही प्रोजेक्ट करावे लागतात, चित्रांच्या प्रिंट काढाव्या लागतात, त्यासाठीही या प्रिंटरची मदत होऊ शकते. त्यामुळे तुमच्या लहान, पण महत्त्वाच्या गोष्टी प्रिंट करण्यासाठी याचा नक्कीच वापर करता येईल. 

एचडीलियांग मिनी प्रिंटर हा ॲमेझॉनवर ३,०९९ रुपयांत उपलब्ध आहे. मात्र यावर कोणत्याही प्रकारची वॉरंटी दिलेली नाही. ॲमेझॉनसारख्या ई-कॉमर्स साईटवर या प्रिंटरप्रमाणे बरेच मिनी पोर्टेबल प्रिंटर उपलब्ध आहेत. त्यामध्ये सॅनिपेस मिनी पोर्टेबल वायरलेस ब्लूटूथ पॉकेट थर्मल प्रिंटर, एव्हरीकॉम इसी -58 58mm (२ इंच) डायरेक्ट थर्मल प्रिंटर, एचपी स्प्रॉकेट पोर्टेबल पॉकेट प्रिंटर, कोडॅक स्टेप वायरलेस मोबाईल फोटो मिनी प्रिंटर, फुजीफिल्म इंस्टॅक्स मिनी लिंक स्मार्टफोन इन्स्टंट फोटो प्रिंटर, पेरिपेज प्रिंटर असे अनेक पर्याय पाहायला मिळतात.

संबंधित बातम्या