रॉयल एनफिल्ड ‘हंटर ३५०’

ज्योती बागल
सोमवार, 25 जुलै 2022

व्हॉट्‌स न्यू
 

रॉयल एनफिल्ड म्हटली की आठवते तिचे आकर्षक, मजबूत असे मॉडेल; पण त्याच बरोबर आठवते ती म्हणजे तिची किंमत. कारण या बाईक महाग असतात. आपल्याकडे रॉयल एनफिल्डच्या प्रेमात असलेले आणि ती खरेदी करण्याचे स्वप्न बघणारे अनेक तरुण आहेत, मात्र किमती बघून अनेकांचे हे स्वप्न सत्यात उतरतच नाही. पण आता मात्र हे शक्य होणार आहे, कारण आतापर्यंतची सर्वात स्वस्त रॉयल एनफिल्ड बाईक लाँच होणार आहे. हे नवीन मॉडेल म्हणजे ‘रॉयल एनफिल्ड हंटर ३५०’! 

बाईकप्रेमी आवर्जून वाट पाहत असलेली ही बाईक, उपलब्ध माहितीनुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. या बाईकची किंमत साधारण दीड लाख रुपये असेल. रॉयल एनफिल्डच्या क्लासिक, बुलेट, मिटिओर या मॉडेलप्रमाणेच ‘हंटर ३५०’चे डिझाईनदेखील आकर्षक असेल. 

‘हंटर ३५०’ बाईकमध्ये ३४९.३४ CC कपॅसिटीचे सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 6100rpm वर 19.9bhp पॉवर जनरेट करू शकेल. बाईकच्या लुकबद्दल बोलायचे झाले, तर ‘हंटर ३५०’ काही प्रमाणात ‘बुलेट ३५०’सारखी दिसते, तर वजनाच्या बाबतीत ही बाइक ‘क्लासिक ३५०’पेक्षा थोडी हलकी असल्याचे सांगितले जातेय. मात्र इतर मॉडेलच्या तुलनेत या बाईकची किंमत कमी असल्यामुळे या बाईकला बाजारात चांगली पसंती मिळू शकेल, असा अंदाज व्यक्‍त केला जातोय.

‘हंटर ३५०’ची लांबी २०५५ मिमी, रुंदी ८०० मिमी आणि उंची १०५५ मिमी इतकी असेल. ही बाईक सहा स्पीड गिअरबॉक्ससह लाँच केली जाऊ शकते. त्याचबरोबर याचा व्हीलबेस १३७० मिमी इतका असेल. इतर फीचरबद्दल बोलायचे झाले, तर या बाईकमध्ये गोल हेडलॅम्प, Y-आकाराचे अलॉय व्हील, लहान स्विंग आर्म्स, वेगळ्या डिझाईनचे फ्युएल टॅंक आणि सिंगल सीट सेटअप दिसेल. तसेच या बाईकमध्ये ड्युएल रीअर शॉक अॅब्सॉर्बर आणि टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, डिस्क ब्रेक्स, मिटिओर ३५०सारखे ड्युएल चॅनल ABSसारखे फीचरही मिळतील.

ही बाईक रेट्रो डिझाइनसह लाँच केली जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे तेही एक आकर्षण असेल. अलीकडे रॉयल एनफिल्ड कंपनी त्यांच्या नवीन जे (J) प्लॅटफॉर्मवर अनेक बाईक डेव्हलप करत आहे; ‘हंटर ३५०’ ही बाईकदेखील याच प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आली आहे. याआधी या प्लॅटफॉर्मवर ‘मिटिओर ३५०’ आणि नवीन ‘क्लासिक ३५०’ या दोन बाईक डेव्हलप केल्या आहेत. 

रॉयल एनफिल्डची आणखी एक ओळख म्हणजे, त्या बाईकला असलेला एक विशिष्ट आवाज. या नव्या बाईकचा आवाज थोडासा स्पोर्टी असेल, जेणेकरून रायडरला ही रोडस्टर बाईक चालवताना स्पोर्टी बाईक चालवल्याचा अनुभव घेता येईल. त्यामुळे जर तुम्ही रॉयल एनफिल्डचे चाहते असाल किंवा एखाद्या दमदार बाईकच्या प्रतीक्षेत असाल तर ‘हंटर ३५०’चा विचार नक्कीच करू शकता.

संबंधित बातम्या