दर्द का हद से गुज़रना है दवा हो जाना

नंदिनी आत्मसिद्ध
रविवार, 7 जून 2020

अन्दाज़-ए-बयाँ

दुःख हा माणसाच्या जगण्याचा एक अविभाज्य भागच आहे. ते निरनिराळ्या वाटांनी आपलं अस्तित्व दाखवून देत असतं. उर्दू शायरीत ग़म-ए-जानाँ, ग़म-ए-दौराँ, ग़म-ए-रोज़गार, ग़म-ए-अिश्क़ अशी शब्दरचना नेहमी भेटते. दुःखाचे हे सारे प्रकार माणसाच्या जगण्यातल्या त्रुटी व अडचणी दाखवून देणारे. जगात कोणीच मनुष्य पूर्णतः सुखी नसतो. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ हे समर्थांचं वचन सर्वांनाच परिचयाचं आहे. उर्दू काव्यात जीवनाच्या दुखऱ्या बाजूचं वर्णन जोरकस आणि प्रभावी असतं. प्रेमभंग, विरह, गरिबी, अपयश, दुर्दैव असा अनेक प्रकारे दुःखाचा माणसाच्या आयुष्यात प्रवेश होतो आणि ते त्याच्या अनुभवाचा एक हिस्साच होऊन जातं. उर्दू शायरीत ग़मची विविध रूपं वाचकांना खुणावत आली आहेत. ग़ालिबच्या शायरीतही अर्थातच मानवी दुःखाचं स्वरूप प्रतिबिंबित झालेलं आहेच. वेदना आणि आकांत त्याच्या लेखणीनंही केला. कधी त्यात विषाद होता, तर कधी नुसतीच वेदनेची नोंद. पण ग़म, म्हणजे दुःख हे माणसाच्या जीवनात असणारच, त्याचा स्वीकार करा किंवा न करा; असा एक सूरही त्यात डोकावताना दिसतो. तसा तर प्रत्येक कवी आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत अनुभवातून किंवा आसपासच्या घटनांच्या निरीक्षणातून काही नोंदी घेत असतो आणि आपल्या शायरीत त्यांना वाट करून देतो. ग़ालिबनंही तेच केलं आणि त्याची मानवी दुःखाचं स्वरूप टिपणारी कविता तिच्यातील वैश्विक सुरामुळं त्याच्या काळातच नव्हे, पण नंतरच्या काळातही इतरांना खुणावत राहिली. आजही तिच्या उद्‍गाराला कालबाह्यता आलेली नाही. व्यक्तिगत अनुभव आणि दुःखाचा, वेदनेचा उद्‍गार जेव्हा केवळ स्वतःपुरता राहत नाही, तेव्हा त्याला एक प्रातिनिधिकता प्राप्त होते. काव्याला हा सूर गवसणं, हे कवीच्या मोठेपणाचं, वेगळेपणाचं लक्षण आहे. ग़ालिब या कोटीचा शायर नक्कीच होता...

मानवी दुःखाच्या तऱ्हा विविध असतात. पण त्यांचा परिणाम विभिन्न असू शकतो. तरीही एकाचं दुःख दुसऱ्याला हेलावून सोडणारं ठरतं. म्हणूनच तर वेदना, मग ती कुणाचीही असो; काव्य निर्माण करणारी ठरते. वाल्मिकीला क्रौंचाच्या आक्रंदनातली वेदना जाणवली आणि त्यातून रामायण जन्माला आलं, असं म्हणतात. वेदनेचं आणि काव्याचं हे नातं सार्वकालिक आहे. ग़ालिबच्या काव्यातही दुःखाचं बहुरंगी रूप बघायला मिळतं. ‘दुःख जर आहेच, तर त्याची सवय करून घ्यायला हवी. त्याचा सामना करायाला हवा, त्याला तोंड द्यायला हवं. हे केल्यानं ते दुःख मग दुःख राहत नाही,’ असं ग़ालिब एका शेरमध्ये म्हणतो. त्यात तो असंही लिहितो, की माझ्यावर इतकी संकटं आली, की ती माझ्यासाठी संकटं राहिलीच नाहीत.’ 
रंज से ख़ूगर हुआ इन्साँ तो मिट जाता है रंज
मुश्किलें मुझ पर पड़ीं इतनी कि आसाँ हो गईं

दुःखाला भिडण्याचा एक उपाय ग़ालिब यात सांगतो. ‘दुःखाची सवय करून घ्या.’  दुःखाची सवय करून घेणं, म्हणजे अर्थातच रडत बसणं नव्हे, तर त्याला ताकदीनं तोंड देणं. ‘माझ्यावर पडलेल्या सकटांतून बाहेर पडण्यासाठी मी हरतऱ्हेने प्रयत्न केले, मग ती माझ्यासाठी संकटं राहिली नाहीत,’ हे म्हणताना त्याच्यासमोर आयुष्यातले अनेक प्रसंग तरळले असतील... जीवनातल्या संकटांना, वेदनांना आणि दुःखांना घाबरून हताश होऊन चालणार नाही. तर त्यांचा सामना कसा करायचा, त्यांच्यावरचे उपाय कसे शोधायचे याकडं माणसानं लक्ष पुरवलं पाहिजे, असा त्याचा सरळ साधा संदेश आहे. शिवाय एकदा का या दुःखांचं अस्तित्व मान्य केलं, त्यांची सवय करून घेतली, की जगणं सोपं होतं. कारण त्यांच्याबरोबर जगायचं आहे, हे आपण स्वीकारलेलं असतं. दुःख असलं, तरी केवळ तेच नाही. इतरही गोष्टी जीवनात आहेत. दुःखामुळं जगणं संपत नाही. 

मात्र दुःखाचा अनुभव घेतल्यावर माणूस हा कष्टी, उदास होणारच. ते त्याच्या स्वभावातच आहे. सगळे काही स्थितप्रज्ञ होऊ शकत नाहीत, हेही तितकंच खरं. सुख आणि दुःख दोघांचे जे विशिष्ट परिणाम असतात, ते घडणारच. म्हणूनच, ग़ालिब जरी दुःखाचं अस्तित्व मान्य करून त्याला सामोरं जाण्याची भाषा करतो, तरी दुःख मनाला व्य़थित करतं, हेही मान्य करतो. एका शेरमध्ये तो म्हणतो, ‘हे माझं हृदयच आहे, एखादा दगड किंवा वीट नव्हे. त्याला दुःखानं भरून येणारच. मी हजार वेळा आक्रोश करीन. मला का म्हणून कोणी त्रास द्यावा?’ 
दिल ही तो है न संग-ओ-ख़िश्त दर्द से भर न आए क्यूँ
रोयेंगे हम हज़ार बार कोई हमें सताए क्यूँ

याच ग़ज़लमधल्या आणि एक शेरमध्ये तो म्हणतो, ‘माणसाला मिळालेली जीवनरूपी सज़ा आणि त्याचं दुःख या गोष्टी मुळातून एकच आहेत. मृत्यूवाचून माणसाची दुःखातून सुटका नाहीच...’
क़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म अस्ल में दोनों एक हैं
मौत से पहले आदमी ग़म से निजात पाए क्यूँ

तर आणखी एका शेरमध्ये तो याच तऱ्हेची भावना व्यक्त करताना म्हणतो, ‘सतत चक्रात फिरत राहिल्यामुळं मन का म्हणून घाबरं होणार नाही? मी माणूस आहे, प्याला किंवा सुरई नव्हे.’ मद्याचा प्याला एका हातातून दुसऱ्या हातात अस सातत्यानं फिरत असतो, तसा माणूस जर सारखा दुःखांच्या तावडीत सापडला की त्याची स्थिती सैरभैर होते, हे स्वाभाविक आहे, असा त्याचा अभिप्राय... वेगळ्याच शैलीत ग़ालिबनं आपली भावना पेश केली आहे. 
क्यूँ गर्दिश-ए-मुदाम से घबरा न जाए दिल
इन्सान हूँ प्याला-ओ-साग़र नहीं हूँ मैं

अश्रू हे माणसाच्या आंतरिक वेदनेचं मूर्त रूप. पण अनेकदा डोळ्यातून एकही अश्रू आला नाही, तरी हृदयात खोलवर वेदना रुजलेली असते. अशी वेदना मग माणसाला छळत राहते, कुरतडत राहते आणि अखेरीस तिचं रूपांतर वादळात होतं. दुःख जर मनातच कोंडलं गेलं, तर ते जीवघेणं ठरू शकतं. माणसावर विनाशाची वेळ आणतं. म्हणून दुःखाला दाबून टाकू नये, कोंडून ठेवू नये. ते कधीच अव्यक्त राहू नये. अश्रूबिंदू हा दुःखाचा निचरा होण्याचाही मार्ग असतो. त्याच्या रूपानं वेदना बाहेर पडू दिली पाहिजे, असं तो सुचवतो...
दिल में फिर गिरिया ने एक ज़ोर उठाया ‘ग़ालिब’
आह! जो क़तरा न निकला था, सो तूफ़ाँ निकला

जीवन म्हटलं की सुख आणि दुःख दोन्ही असणारच त्यामुळंच तर जगण्यात काही हलचल आहे. गती आहे. ते तर जिवंतपणाचं लक्षण. असा आशय प्रकट करताना ग़ालिब लिहितो, ‘कोणत्याही घराची शोभा ही तिथं होणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असते. जर त्या घरातून आनंदभरी गाणी ऐकायला नाही आली, तरी काही चिंता नाही. एखादं दर्दभरं गीत ऐकू आलं, तरी ते त्या घराचं अस्तित्व कायम ठेवत असतं.’
एक हंगामे पै मौक़ूफ़ है घर की रौनक 
नौहा-ए-ग़म ही सही नग़्मा-ए-शादी न सही

गतिहीन जीवन हे मृत्यूसारखं असतं. त्यात ना आनंद असतो, ना दुःख. काहीतरी घडत असणं जीवनाला पुढं नेतं. त्याचं चैतन्य जागं ठेवतं, असं ग़ालिब सुचवतो. सुख आणि दुःख दोन्ही जगण्यातले माणसाचे साथीदार असतात आणि जोवर जीवन आहे, तोवर ते सोबत असणारच, हे दोन्ही नसतील, तर ते जीवन कसलं? ते तर मरणच. हा यातला साधा-सरळ विचार...

तर कधी ग़ालिबचा स्वाभिमानी स्वभाव उसळी मारून वर येतो आणि म्हणतो, ‘माझी व्यथाही स्वाभिमानी आहे. म्हणूनच तिला औषधोपचाराचा उपकार घेणं पसंत नाही. यामुळं मी बरा झालो नाही हे खरं, पण झाली गोष्ट काही वाईट झाली नाही.’
दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ
मैं न अच्छा हुआ बुरा न हुआ

मनाचं दुःख मित्रापाशी बोलल्यावर हलकं होतं. पण बरेचदा मित्र असे निघतात की ते दुःखावर उतारा देण्याऐवजी काहीतरी उपदेश करत बसतात. जे दुःख आहे, अडचण आहे, ती तशीच राहते आणि वेदनाही. अशा आशयाचा एक ग़ालिबचा शेर आहे-
ये कहाँ की दोस्ती है कि बने हैं दोस्त नासेह
कोई चारासाज़ होता कोई ग़मगुसार होता

आयुष्यात अनेक अडचणी आणि दुःखांचा सामना करावा लागल्यामुळं, ग़ालिब एकूणच मानवी दुःखाबद्दल विचार करतो आणि दुःख हा जगण्याचा भागच कसा आहे, हे वारंवार आपल्या काव्यात नोंदत राहतो. एका शेरमध्ये  म्हणतो, ‘दुःख हे जिवाला पीडा देत असलं, तरी त्यापासून बचाव करण्याचा मार्ग उपलब्ध नाही. कारण माझ्याजवळ हृदय आहे आणि ते अनेक आकांक्षांनी वेढलेलं आहे. यामुळं ते कोणत्या ना कोणत्या तरी दुःखाच्या कारणानं व्याकुळ राहणारच. ते मग प्रेमातील विफलतेमुळं असो की जगण्यासाठीच्या, उपजीविकेसाठीच्या धडपडीमुळं असो...’
ग़म अगरचे जाँ गुसल है पै कहाँ बचें कि दिल है
ग़म-ए-अिश्क़ गर न होता ग़म-ए-रोज़गार होता

आयुष्यात मला इतकी दुःखं दिलीस, तर मग हृदयंही अनेक द्यायला हवी होतीस, ईश्वरा, असंही ग़ालिब एके ठिकाणी म्हणतो-
मेरी क़िस्मत में ग़म गर इतना था
दिल भी या रब, कई दिए होते

मिळालेल्या दुःखांनी त्रस्त आणि उदास झाल्यावर ग़ालिब म्हणतो, ‘इतकी दुःखं अनुभवली आहेत, की मी आता संवेदनाहीन झालो आहे. मग डोकं जरी उडवलं, तरी त्याचं दुःख नाही. समजा आता ते देहापासून विलग झालं नसतं, तरी ते दुखातिरेकाच्या शोकामुळं गुडघ्यावर टेकलेलंच असतं...’  
हुआ जब ग़म से यूँ बेहिस तो ग़म क्या सर के कटने का
न होता गर जुदा तन से तो ज़ानू पर धरा होता

दुःखात पूर्ण बुडालेल्या व्यक्तीचं प्रभावी चित्रण या शेरमध्ये ग़ालिबनं केलं आहे. दुःखाची अशी वेगवेगळी रूपं ग़ालिबनं शायरीतून अभिव्यक्त केली. दुःकाचं महाकाव्यच त्याच्या वेगवेगळ्या ग़ज़लांमधून पसरलेलं आहे. 

ग़ालिबनं एका शेरमध्ये दुःखाबद्दल म्हटलं आहे, ‘प्रत्येक जलबिंदूला समुद्रात सामावून जाण्यात आनंद वाटतो. तसं दुःख जेव्हा आपली मर्यादा सोडतं, तेव्हा त्याचा रूपांतर उपचारात/औषधात होतं.’ म्हणजे, दुःख जेव्हा चरमसीमेला पोचतं, तेव्हाच त्याला ओहोटी लागते. त्यानंतरच ते कमी होणार असतं, ही भावना ग़ालिब वेगळ्याच शैलीत मांडतो. 
अिशरत-ए-क़तरा है दरया में फ़ना हो जाना
दर्द का हद से गुज़रना है दवा हो जाना

संबंधित बातम्या